रानटी हत्तीने घेतला आणखी एक बळी
By संजय तिपाले | Updated: April 25, 2024 17:51 IST2024-04-25T17:49:34+5:302024-04-25T17:51:55+5:30
Gadchiroli : भामरागडच्या कियर जंगलातील थरार; तीन आठवड्यांत तिघांना पायाखाली चिरडले

Wild Elephant killed one more person
गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यास पायाखाली चिरडले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
गोंगलू रामा तेलामी (४६,रा. कियर ता. भामरागड) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिराेली जिल्ह्याच्या हद्दीत परतला होता. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर २४ एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला. या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी यांची जमीन आहे. २५ रोजी ते शेतात काम करत होते. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. यात त्यांचे शरीर छिनविछिन्न झाले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही माेठी गर्दी झाली आहे. हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
'उत्तर'मध्येही हत्तींचा कळप
'दक्षिण' गडचिरोलीतील भामरागड, अहेरी तालुक्यात एकच रानटी हत्ती असून त्याने २१ दिवसांत तेलंगणातील दोन व कियरमधील एक अशा तीन शेतकऱ्यांचे बळी घेतले. पिकांसह घरांचेही नुकसान केले. दुसरीकडे 'उत्तर'मध्येही गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, आंबेशिवणी या परिसरात रानटी हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. संख्येने सात ते आठ असलेल्या या हत्तींमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.