And SDO of Aheri became teacher | अन् अहेरीचे एसडीओ बनले शिक्षक
अन् अहेरीचे एसडीओ बनले शिक्षक

ठळक मुद्देतीन विभागांचा प्रभार सांभाळून अध्यापन

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी येथील एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक नसल्याने अहेरीचे एसडीओ राहूल गुप्ता (भाप्रसे) यांनी शिक्षकाची जबाबदारी स्वीकारत बाराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, गुप्ता हे अहेरीचे एसडीओ आहेत, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा तसेच अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्याचाही प्रभारी त्यांच्याकडे आहे. या सर्व व्यस्त कामातून त्यांनी वेळ काढून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य सुरू केले आहे.
आदिवासी विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणारा बनावा, या उद्देशाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नावाने सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू केली. या शाळेत ६ ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. ३३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बारावीत यावर्षी एकूण १९ विद्यार्थी आहेत. मात्र भौतिकशास्त्राच्या शिक्षक पदासाठी अनेक वेळा जाहिरात देऊनही शिक्षक मिळाला नाही. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन एसडीओ गुप्ता हे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. मोबाईल प्रोजेक्टर अशा विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्यापन करीत आहेत. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत अध्यापन करीत असल्याने त्यांचे हे कार्य इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: And SDO of Aheri became teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.