गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:07 IST2025-06-11T18:06:36+5:302025-06-11T18:07:57+5:30

Gadchiroli : सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीला शासनाच्या आदेशाने लगाम लागला आहे.

All schools in Gadchiroli district will reopen on the same day | गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी होणार सुरू

All schools in Gadchiroli district will reopen on the same day

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाची तारीख राज्य शिक्षण विभागाने निश्चित केली असून विदर्भ विभागातील शाळा २३ जूनपासून सुरू होणार आहेत. २०२५-२६ या सत्रात जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे तापमान अधिक असल्याने २३ ते २८ जून या कालावधीत सहा दिवस शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत.


राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक कामकाजात एकवाक्यता येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या तारखा निश्चित झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधील वेळापत्रकाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. विदर्भविभागातील शाळांचे पूर्णवेळ नियमित कामकाज ३० जूनपासून सुरू करण्यात येईल. संपूर्ण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये किमान २३५ दिवसांचे कामकाज होणे बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे, याची नोंद सर्व शाळांना घ्यावी लागेल, असे शासनाने परिपत्रकात नमुद केले आहे. 


राज्य शिक्षण विभागाने जाहीर केलेले हे वेळापत्रक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शाळांना लागू आहे. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका संचालित शाळांसह सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांचाही समावेश होतो. स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार सुट्टया घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे, परंतु यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. कोणत्याही परिस्थितीत एकूण कामाचे दिवस २३५ पेक्षा कमी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. 


पहिल्याच दिवशी गणवेश अन् पुस्तके येणार हाती
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांसह वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या पात्र सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळास्तरावर पाठ्यपुस्तके यापुर्वीच पोहचविण्यात आली आहेत.


शाळा प्रवेशात्सवाची जोरदार तयारी

  • २३ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
  • याबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांच्या बैठका मे महिन्यात पार पडल्या. पुन्हा २० जूनपुर्वी नियोजनात्मक व तयारीच्या आढावा बैठका होतील.


"शासनाच्या निर्देशानूसार २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळाएकाच दिवशी २३ जूनपासून भरविण्यात येणार आहेत. याबाबत कार्यालयाच्या वतीने पत्र काढण्यात येणार आहे."
- वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, गडचिरोली.

Web Title: All schools in Gadchiroli district will reopen on the same day