२० दिवसांनंतर वृद्धाचा सापडला फक्त सांगाडा ! बैल शोधण्यासाठी गेले होते जंगलात, वाघाने केली शिकार
By संजय तिपाले | Updated: April 11, 2026 20:25 IST2026-04-11T20:24:26+5:302026-04-11T20:25:09+5:30
Gadchiroli : आरमोरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौशीखांब येथील बेपत्ता वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

After 20 days, only the skeleton of the old man was found! He had gone to the forest to find a bull, but was hunted by a tiger
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौशीखांब येथील बेपत्ता वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. धर्माजी पांडुरंग कस्तुरे (७७) असे मृत वृद्धाचे नाव असून, त्यांचा सांगाडा ११ एप्रिल रोजी गडचिरोली ठाण्याच्या हद्दीतील मौशी चक जंगल परिसरात आढळून आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, धर्माजी कस्तुरे हे २ फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील हरवलेले बैल शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर आरमोरी ठाण्यात त्यांच्या बेपत्ताची तक्रार नोंदवण्यात आली होती.
११ एप्रिल रोजी मौशी चक परिसरातील जंगलात, गावापासून ३ किमी अंतरावर शेत शिवारात एक मानवी सांगाडा व विखुरलेले अवशेष आढळून आले. माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर मृताचे कपडे, बैल बांधण्याची दोरी आणि कमरेचा करदोडा पडून होता. या वस्तूंच्या आधारे त्यांच्या मुलाने व नातेवाईकांनी हा सांगाडा धर्माजी कस्तुरे यांचाच असल्याची ओळख पटविली.
वन्यप्राण्यांचा वावर; परिसरात दहशत
ज्या भागात हा मृतदेह आढळला, तिथे वाघ आणि बिबट्याचा मोठा वावर आहे. कस्तुरे यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला करून त्यांना फरफटत नेले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा केला असून, हाडाचे नमुने न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.