गुरे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा पतीसमोर वाघाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 05:13 PM2022-08-31T17:13:53+5:302022-08-31T17:15:30+5:30

चुरचुरा जंगलातील घटना : गुरे चारायला नेणे बेतले जीवावर

A woman returning home with cattle was killed by a tiger in front of her husband | गुरे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा पतीसमोर वाघाने घेतला बळी

गुरे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा पतीसमोर वाघाने घेतला बळी

Next

आरमोरी (गडचिरोली) : आपल्या पतीसह जंगलात गुरे चारून घरी परत आणत असताना वाघाने गुराखी महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ३ मध्ये मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव पार्वता नारायण चौधरी (५५ वर्ष) रा.चुरमुरा असे आहे.

पार्वता व तिचा पती नारायण चौधरी हे दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी चुरचुरा गावातील गुरे चारण्यासाठी सकाळी चुरचुरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३ या राखीव जंगलात गेले होते. दिवसभर गुरे चारण्याचे काम करून सायंकाळी गुरे घरी परत आणत हाेते. गुरे इतरत्र भटकू नयेत म्हणून पती समोर होते तर पत्नी ही गुरांच्या मागे होती. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वताबाईवर झडप घालून तिला ठार केले.

ही घटना पतीच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती चुरचुरा येथे दिली. ही घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. माहिती मिळताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, क्षेत्रसहायक अरुण गेडाम, चुरचुराचे क्षेत्रसहायक कालिदास उसेंडी, मरेगावचे क्षेत्रासहायक कैलास अंबादे, वनरक्षक दिनेश पोपडा व अन्य वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

पार्वता नारायण चौधरी ही महिला मूळची आरमोरी तालुक्याच्या चुरमुरा येथील रहिवासी आहे. मात्र, पाच सहा वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासह रोजगाराच्या शोधात त्यांनी गाव सोडले व ते चुरचुरा येथे राहात होते. पती व दोन मुले असा तिचा परिवार आहे.

सावधानतेच्या इशाऱ्याकडे कानाडाेळा

वडसा वनविभागातील आरमोरी, पोर्ला आणि वडसा वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरातील गावात अनेक वाघांचा वावर आहे. त्यामुळे वनविभागाच्यावतीने गावागावात मुणादी देऊन, पत्रके वितरीत करून, ठिकठिकाणी बोर्ड लावून तसेच वन कर्मचाऱ्यांद्वारा लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सावधानतेचा इशारा देण्यात आला हाेता. तरीही लोक जंगलात जात आहेत. नागरिकांनी जंगलात जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: A woman returning home with cattle was killed by a tiger in front of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.