माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद
By संजय तिपाले | Updated: February 6, 2026 20:15 IST2026-02-06T20:14:10+5:302026-02-06T20:15:52+5:30
दोन दिवसांच्या धुमश्चक्रीत सी-६० कमांडोंचा थरार : मोठा शस्त्रसाठा जप्त , माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे कंबरडे मोडले

7 people including Maoist leader 'Prabhakar' killed, soldier Deepak Madavi martyred in thrilling battle
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रणसंग्रामात पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी मोठी कामगिरी बजावली आहे. गडचिरोली विभागीय कमिटीचा प्रभारी आणि २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता प्रभाकर याच्यासह एकूण ७ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. मात्र, या थरारक युद्धात अहेरी तालुक्यातील मांड्रा गावचे सुपुत्र दीपक चिन्ना मडावी (३८) हे जवान शहीद झाले असून, एका जवानावर उपचार सुरू आहेत.
भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील घनदाट जंगलात माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे सदस्य तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ३ फेब्रुवारी रोजी उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १४ सी-६० पथकांनी जंगलात कूच केली. ४ फेब्रुवारीला माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. कमांडोंनी चोख प्रत्युत्तर देत माओवाद्यांचा घेराव आवळला. घनदाट झाडी आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत माओवाद्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण जवानांच्या जिद्दीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, प्रभाकर सारख्या जहाल नेत्यासह एकूण सात जणांचा खात्मा झाल्याने कंपनी क्र. १०चे कंबरडे मोडले असून पोलिस दलाच्या नोंदीनुसार आता केवळ दोनच माओवादी शिल्लक आहेत.
मोठा शस्त्रसाठा जप्त
या मोहिमेत पोलिसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले असून घटनास्थळावरून युद्धसदृश साहित्य जप्त केले आहे. यात
०३ एके- ४७ रायफल्स,०१ एसएलआर रायफल,०१ .३०३ रायफल,मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिट्टू यांचा समावेश आहे.
शौर्याची पराकाष्ठा, जवान दीपक मडावींनी टिपले दोन माओवादी
सी-६० चे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांनी या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवले. दोन माओवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर, शत्रूची गोळी लागल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या निधनाने अहेरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दुसरे जवान जोगा मडावी यांच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.
"आमच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून हे ऑपरेशन फत्ते केले आहे. प्रभाकरसारखा बडा नेता मारला जाणे, हा माओवादी चळवळीला बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे."
- नीलोत्पल , पोलिस अधीक्षक, गडचिरोली