पुरामुळे ६ मार्ग पाण्याखाली, गडचिरोलीतील २० गावांचा तुटला संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:22 IST2025-07-02T13:21:09+5:302025-07-02T13:22:29+5:30
संततधार पावसाने दाणादाण : दक्षिण गडचिरोलीत नदी, नाले तुडूंब; पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाचे विशेष लक्ष

6 roads submerged due to floods, 20 villages in Gadchiroli lost connectivity
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. नद्यांना पूर आल्याने सहा मार्ग बंद झाले. २० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. कुरखेडातील सती नदीपात्रात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराच्या मदतीला पोलिस देवदूत बनून धावले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली, त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. धान पन्हे, तसेच आवत्या टाकण्यासाठीही अडचण झाली होती. मात्र, तीन दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली. संततधारेने सगळीकडेच रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. नद्या, नाले खळखळून वाहिले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने २० हून अधिक गावे संपर्काबाहेर आहेत.
मार्ग बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांना वळसा घालून जावे लागले. प्रशासनाचे आपत्तीग्रस्त गावांवर विशेष लक्ष असून, ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले.
देसाईगंज - ब्रह्मपुरीला मार्ग बंद, नागरिकांची त्रेधा
देसाईगंज ते ब्रह्मपुरी या मार्गावरील भूती नदीवरील पुलाचे काम दोन वर्षापासून अद्याप पूर्ण झालेले नाही. पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली, परिणामी नागरिकांना ३२ किलोमीटर वळसा घालून आरमोरीहून गांगलवाडीमार्गे ब्रह्मपुरीला जावे लागले. देसाईगंज हा चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेला तालुका आहे. येथून गोंदिया, भंडारा, नागपूर जाण्यासाठी मागील दोन वर्षांपासून भूती नदीपात्रावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, रपटा पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद झाला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली.
कोंजेड गावाजवळ रस्त्याचा झाला नाला
अहेरी तालुक्यातील कॉजेड गावाजवळील नाल्यावरील पूल तीन वर्षांपूर्वी वाहून गेला होता. यावर्षी पहिल्याच पावसात सिमेंट पाईप व भराव वाहून गेल्याने या ठिकाणी नाला तयार झाला. यामुळे परिसरातील गावांचाही संपर्क तुटला. जिमलगट्टा-देचलीपेठा-झिंगानूर मार्गावर कोंजेड गावाजवळील नाल्यावर तीन वर्षांअगोदर पाईप कलवट बनविण्यात आले, त्याच वर्षी आलेल्या पावसामुळे रस्ता वाहून गेला. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पाईप टाकून रस्ता बनविला होता. मात्र, यावर्षी पहिल्याच पावसात तो वाहून गेला.