50,000 Devotees will come at Gadchiroli | ५० हजारांवर भाविक गडचिरोलीत येणार
५० हजारांवर भाविक गडचिरोलीत येणार

आजपासून उत्सवास प्रारंभ : ट्रस्टच्यावतीने जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हजरत सय्यद अहमद जिलानी (बाबा) च्या जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सय्यद अहमद जिलानी बाबा ट्रस्ट गडचिरोलीच्या वतीने येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्थानिक रामनगरात होणाऱ्या या दोनदिवसीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यातील ५० हजारांवर भाविक हजेरी लावतात. जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्याची तयारी ट्रस्टच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे
जिलानीबाबा जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ १८ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून होत आहे. आज दुपारी धार्मिक प्रचवन तसेच धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला सकाळी ९ वाजता परचम कुशाई व फातेहा ख्वानी अर्थात झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जिलानी बाबाचा गडचिरोली शहरातून शाही जुलूस काढण्यात येणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता बाबांची गुलपोशी करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता फैजे लंगर (महाप्रसादाचा) कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ९ वाजता गुलाम वारीस व जुनेद सुलतानी यांचा दुरंगी कवाली मुकाबला होणार आहे. पोटेगाव मार्गावरील खुल्या मैदानात सदर जन्मोत्सव सोहळा कवाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली आहे. त्यादृष्टीने जिलानी बाबा ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहेत.
सदर जन्मोत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातील मुस्लिम तसेच सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमस्थळी शाही मंडप टाकण्यात आला असून विद्युतीकरण करण्यात आले आहे. गडचिरोली शहरातीलही हजारो भाविक येथे हजेरी लावणार आहेत. सदर कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. संपूर्ण पोटेगाव मार्गावर तोरण व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी दुपारपासून येथे भाविक दाखल होत असून मंगळवारी येथे हजारोंची गर्दी होणार आहे.

भाविकांचे जत्थे व दुकानदार दाखल
हजरत सय्यद अहमद जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. याशिवाय आंध्रप्रदेश व तेलंगणातूनही भाविक येणार आहेत. सोमवारी सकाळपासून दूरवरचे बरेच भाविक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. गडचिरोली जिल्ह्यासह इतर भागातील अनेक दुकानदारांनी येथे हजेरी लावली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने येथे आलेले लोक आपले दुकान लावत असल्याचे सोमवारी दुपारच्या सुमारास दिसून आले. कपडे, महिला व मुलींचे साहित्य, मुला, मुलींच्या खेळणी व इतर सर्व वस्तूंची दुकाने येथे लागणार आहेत. कोणत्याही व्यवसायिकाची तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने जिलानी बाबा ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. व्यवसायासाठी आलेल्या दुकानदारांना जागा निश्चित करून दिली जात आहे.

जिल्हा स्टेडियम व पोटेगाव बायपास मार्गावर वाहन पार्र्किं गची व्यवस्था
विदर्भासह महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक जिलानी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी हजेरी लावतात. चारचाकी वाहनाने भाविक येथे येत असतात. भाविकांच्या वाहनांसाठी पार्र्किं गची व्यवस्था जिल्हा स्टेडियमवर तसेच पोटेगाव मार्गावर दूरवर तसेच खुल्या जागेत करण्यात आली आहे, अशी माहिती जिलानी बाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: 50,000 Devotees will come at Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.