२६ वर्षे झुंज, १०१ माओवादी केले ठार अनेक सन्मान, वासुदेव मडावी यांचा जंगलातील संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:18 IST2025-08-28T21:18:18+5:302025-08-28T21:18:38+5:30
गेल्या २६ वर्षांपासून सी-६० पथकात कार्यरत असलेल्या पाेलिस उपनिरीक्षक वासुदेव राजन मडावी यांनी आजवर तब्बल ५८ चकमकांमध्ये थेट सहभाग घेत १०१ माओवाद्यांचा खात्मा केला.

२६ वर्षे झुंज, १०१ माओवादी केले ठार अनेक सन्मान, वासुदेव मडावी यांचा जंगलातील संघर्ष
दिगांबर जवादे
गडचिरोली : गेल्या २६ वर्षांपासून सी-६० पथकात कार्यरत असलेल्या पाेलिस उपनिरीक्षक वासुदेव राजन मडावी यांनी आजवर तब्बल ५८ चकमकांमध्ये थेट सहभाग घेत १०१ माओवाद्यांचा खात्मा केला तर पाच जणांना जिवंत पकडले आहे. त्यांच्या या असाधारण कार्याचे काैतुक पाेलिस विभागाने केले. या शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत, त्यांचा पाेलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाेलिस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१० नोव्हेंबर १९७६ला जन्मलेले वासुदेव मडावी हे ४ एप्रिल १९९८ रोजी गडचिरोली पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाले. पहिल्याच दिवसापासून त्यांनी माओवादीविरोधी मोहिमांमध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांच्या शौर्य आणि चिकाटीमुळे पाेलिस दलाला अनेक माेहिमांमध्ये यश मिळाले. माओवाद्यांची गाेपनीय माहिती काढून त्यांना घेरून मारण्यात त्यांचा हातखंडा आहे. जंगलातील लढाई तशी साधी नसतेच. मात्र, अनेक माेहिमांमध्ये त्यांनी यश मिळविले आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच युवा पाेलिस जवानांना प्रेरित करणारे आहे.
माओवादविराेधी चळवळ नष्ट करण्यासाठी त्यांनी लढ्याची दखल घेत पाेलिस विभागाने त्यांना तीन जलद पदोन्नती दिल्या आहेत. सध्या ते पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. २६ वर्षांच्या या प्रवासात त्यांनी केवळ दलाचे नेतृत्वच केले नाही तर अनेक सहकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले.
या आहेत गाजलेल्या चकमकी
बोरिया कसनासूर येथील ऐतिहासिक चकमकीत ४० माओवादी ठार झाले. मर्दिनटोला चकमकीत २७ माओवादी ठार, गोविंदगाव चकमकीत सहा, कोपर्शी-कोढूर पाच ठार, कतरंगट्टा तीन ठार व नुकत्याच झालेल्या कोपर्शी चकमकीत चार जहाल माओवादी ठार झाले. या सर्व चकमकी देशभरात गाजल्या आहेत. या सर्व माेहिमांचे नेतृत्व वासुदेव मडावी यांनी केले हाेते.
सन्मान व पुरस्कार
त्यांच्या शौर्यपूर्ण कारकिर्दीची दखल घेत मडावी यांना आतापर्यंत अनेक मानाचे सन्मान प्राप्त झाले आहेत. यात राष्ट्रपतींकडून पोलिस शौर्य पदक, पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. तसेच तसेच, आणखी दोन पोलिस शौर्य पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.