२६ हजार वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती
By Admin | Updated: April 2, 2017 01:45 IST2017-04-02T01:45:34+5:302017-04-02T01:45:34+5:30
आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास याबाबतची माहिती

२६ हजार वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती
गडचिरोली मंडळातील स्थिती : वीज खंडितची मिळणार माहिती
गडचिरोली : आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास याबाबतची माहिती भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे दिली जाते. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील २६ हजार ३२७ ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत.
महावितरणने मोबाईल अॅप तयार केले. सदर अॅप वीज ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल अॅप डाऊनलोड केला. या अॅपद्वारे आतापर्यंत राज्यातील ४८ हजार ९६७ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. अॅप बरोबरच एसएमएसद्वारे माहिती देण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. महावितरणच्या या सुविधेचा लाभ राज्यभरातील १ कोटी २१ लाख ग्राहक उचलत आहेत. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी ज्यांनी महावितरणकडे केली आहे. अशा ग्राहकांना मीटर रिडींग, वीज बिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणी अर्ज व त्याची सद्य:स्थिती मीटर वाचन घेतल्याचा व देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडीत करणे आदी बाबतच्या सूचना एसएमएसद्वारे दिल्या जात आहेत. गडचिरोली मंडळातील २६ हजार ३२७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये २२ हजार १९६ घरगुती, २ हजार १८० वाणिज्य, ३६२ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. चंद्रपूर मंडळातील सुमारे ५७ हजार १७७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे. गडचिरोली मंडळातील १ हजार ६६१ घरगुती, १५३ वाणिज्य तसेच ६० औद्योगिक ग्राहकांनी ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोली मंडळातील १ हजार ३६३ शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांकाची व २८ शेतकऱ्यांनी ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे.नोंदणी केल्यानंतर विजेबाबतची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा त्रास वाचला आहे. त्यामुळे मोबाईल नोंदणी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)