23 किमीची पायपीट; छत्तीसगडची महिला रुग्ण उपचारासाठी गडचिरोलीच्या लाहेरीत

By गेापाल लाजुरकर | Published: November 13, 2022 08:58 PM2022-11-13T20:58:28+5:302022-11-13T20:58:55+5:30

आराेग्यपथाच्या दुरवस्थेला मिळाले आप्तेष्टांच्या पायांचे बळ

23 km of walking; Female patient of Chhattisgarh in Laheri of Gadchiroli for treatment | 23 किमीची पायपीट; छत्तीसगडची महिला रुग्ण उपचारासाठी गडचिरोलीच्या लाहेरीत

23 किमीची पायपीट; छत्तीसगडची महिला रुग्ण उपचारासाठी गडचिरोलीच्या लाहेरीत

Next

लाहेरी (गडचिराेली): शिक्षण, आराेग्याच्या साेयी मिळण्यासाठी सतत झटणाऱ्या दुर्गम भागातील लाेकांचा अधिकाधिक काळ हक्क मिळविण्याच्या संघर्षातच जात आहे. हे केवळ राज्यातच नव्हे तर गडचिराेली-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातही दृष्टीस पडते. अशीच एक घटना ८ नाेव्हेंबर राेजी घडली. छत्तीसगड राज्याच्या मेटेवाडाच्या महिला रुग्णाला भामरागड तालुक्याच्या लाहेरी प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी आणण्याकरिता तिच्या नातेवाईकांना २३ किमीची पायपीट कावडीद्वारे करावी लागली. आराेग्यपथाच्या दुरवस्थेला जणूकाही आप्तेष्टांच्या पायाचे बळ मिळाल्याने त्या महिलेवर याेग्य उपचार हाेऊ शकले.

गडचिराेली जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या अहेरी उपविभागात जशा मूलभूत साेयीसुविधांचा अभाव आहे. त्याच पद्धतीने भामरागड तालुक्यातही समस्यांची भरमार आहे. भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील अतिदुर्गम गावे आजही रस्ते, वीज, पूल आदी साेयींपासून वंचित आहेत. दुर्गम गावांत पक्के रस्ते नसल्याने वाहन जाऊ शकत नाही. पायवाटेनेच प्रवास करावा लागताे. गंभीर रुग्ण असल्यास त्याला खाटेची कावड करून रुग्णालयापर्यंत आणावे लागते. छत्तीसगड राज्यातही हीच स्थिती आहे.

येथील सीमावर्ती गावातील मेटेवाडाची ५८ वर्षीय महिला पुसे मासा पुंगाटी ही गंभीर हाेती. त्या भागातही जवळपास उपचाराची साेय नव्हती, अखेर कुटुंबीयांनी सुमारे २३ किमीचा पायदळ प्रवास करून लाहेरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मेटेवाडा भागातील बहुतांश गावे महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. लाहेरी येथे पाेहाेचल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैतन्य इंगे यांनी उपचार केला. त्यामुळे सदर महिलेचा जीव वाचला. याप्रसंगी उपचारासाठी फार्मासिसट गजेंद्र रंधये, आर. के. सहारे, दाशिव निलम, संतोष सडमेक आदी कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.

नातेवाईक चालले सलग ९ तास
छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती मेटेवाडा गावातून पुंगाटी कुटुंबीय सकाळी ७ वाजताच खाटेची कावड करून लाहेरीमार्गाने निघाले. हा मार्गच घनदाट जंगल व दऱ्याखाेऱ्या तसेच नदीनाल्यांनी व्यापलेला आहे. घनदाट जंगल पार करून पुंगाटी कुटुंब लाहेरी येथे दुपारी ४ वाजता पाेहाेचले. सलग ९ तासांची पायपीट पुंगाटी कुटुंबाला करावी लागली.

Web Title: 23 km of walking; Female patient of Chhattisgarh in Laheri of Gadchiroli for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.