१८ गावातील विद्यार्थ्यांचा खड्डेमय मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:02 IST2018-09-13T00:01:01+5:302018-09-13T00:02:18+5:30
चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

१८ गावातील विद्यार्थ्यांचा खड्डेमय मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास
लोकमत न्यूज नेवटर्क
घोट : चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्गावर तीन फूट खोल व नऊ फूट लांबीचा मोठा खड्डा आहे. या खड्ड्यातूनच मानव विकास मिशनची बस दररोज आवागमन करते. त्यामुळे सदर मार्गाने विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. परिणामी या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.
राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास मिशनची बस सुभाषग्राम ते घोट-मुलचेरा अशी धावते. सदर बस घोट येथे मुक्कामी राहते. पहाटे ५.३० वाजता ठाकूरनगर, नरेंद्रपूर, मलकापूर, तुमडी, सुभाषग्राम, गुंडापल्ली या गावातून जाते. या भागातील १८ गावांतील १२५ वर विद्यार्थी दररोज मानव विकास बसने प्रवास करून शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. मात्र सदर मार्ग पूर्णत: खड्डेमय झाल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. मात्र संबंधित विभागाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. वसंतपूर-कोपरअल्लीपर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा संघर्ष अद्यापही कायम आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्ष आहे.
आमचे पाल्य शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी जातात. मात्र खड्डेमय मार्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावकरी व विद्यार्थी मिळून श्रमदानातून मुरूम टाकून सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे मुरूम अधिक दिवस टिकला नाही. गंभीर बाब असूनही प्रशासनाचे रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
- आकुल मंडल, सरपंच,
ग्रा.पं.कालीनगर, ता.मुलचेरा
आमच्या भागातील जवळपास १५ ते १८ गावातील १३० पेक्षा अधिक विद्यार्थी मानव विकास बसने शिक्षणासाठी दररोज प्रवास करीत आहेत. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या मार्गाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- तपन सरकार, सरपंच, ग्रा.पं.वसंतपूर, ता.चामोर्शी