Fifa World Cup 2022, Round 16 : लिओनेल मेस्सीच्याअर्जेंटिना संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. संघाचा स्टार खेळाडू मेस्सीचा हा १००० वा सामना होता आणि त्याने या सामन्यात गोल करून कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा विक्रम मोडला. या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले.
मेस्सीने ३५व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर उत्तरार्धातही अर्जेंटिनाने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवत ७७व्या मिनिटाला दुसरा गोल केला. ज्युलियन अल्वारेझने दुसरा गोल करत संघाला विजयपथावर आणले. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन संघाला गोल करता येत नव्हते, परंतु अर्जेंटिनाचा खेळाडू एन्झो फर्नांडिसने चुकून आपल्याच संघाविरुद्ध गोल केला आणि ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाचे स्वप्न पडू लागले. पण, अर्जेंटिनाने बचाव भक्कम केला.
ऑस्ट्रेलियाला हरवून अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नेदरलँड संघाने ऑफ-16 च्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ९ डिसेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने असतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"