वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 10:14 IST2019-07-03T10:08:49+5:302019-07-03T10:14:49+5:30
आपल्या न्यूट्रिशनल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स व्हॅल्यूमुळे ग्रीन टी ना केवळ वजन कमी करून लठ्ठपणा तर कमी करतेच सोबतच आतड्यांना हेल्दीही ठेवते.

वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी?
(Image Credit : Fitness-Spell)
गेल्या काही वर्षांपासून चहाचा पर्याय म्हणून ग्रीन टी चं सेवन करण्याचा ट्रेन्ड वेगाने वाढतो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ चहा म्हणून नाही तर याचं सेवन एका औषधीप्रमाणेही केलं जात आहे. कारण ग्रीन टी सेवन करण्याचे एक नाही अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणे. काही रिपोर्टनुसार तर पाण्यानंतर ग्रीन टी हा दुसरा सर्वात फेमस पेय पदार्थ झाला आहे.
आपल्या न्यूट्रिशनल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स व्हॅल्यूमुळे ग्रीन टी ना केवळ वजन कमी करून लठ्ठपणा तर कमी करतेच सोबतच आतड्यांना हेल्दीही ठेवते. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचं सेवन किती दिवस आणि किती वेळा करावं? या प्रश्नाच्या उत्तरासोबतच ग्रीन टीचे फायदेही जाणून घेऊ.
मेटाबॉलिज्म प्रोसेस मजबूत करते
मेटाबॉलिज्म एक अशी प्रोसेस आहे ज्यात आपण जे खातो किंवा पितो ते एनर्जीमध्ये बदलण्यात आपल्या शरीराची मदत करते. ग्रीन टी मुळे शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस वेगवान होते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत मिळते. पण तुम्ही जर विचार करत असाल की, केवळ ग्रीन टी सेवन करून वजन कमी होईल. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. ग्रीन टीसोबतच नियमित एक्सरसाइज करणे, हेल्दी डाएट, फळं, हिरव्या भाज्यांचंही सेवन करावं लागेल. तेव्हा कुठे वजन कमी होण्यास मदत होईल.
दररोज २ कप ग्रीन टी पुरेशी
जसे की तुम्हाला माहीत असेल कोणत्याही गोष्टी अति केल्यास नुकसान होतं. ही बाब ग्रीन टी ला सुद्धा लागू पडते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅंड मेडिकल सेंटरच्या एका रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज केवळ २ कप ग्रीन टीचं सेवन करणं पुरेसं आहे. एका दिवसाता यापेक्षा अधिक ग्रीन टीचं सेवन करू नये.
कधी प्यावी ग्रीन टी?
अनेकांना असाही प्रश्न पडतो की, ग्रीन टीचं सेवन कधी करायला पाहिजे? जर तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीन टी सेवन करत असाल तर चांगल्या परिणामांसाठी जेवण केल्यावर लगेच ग्रीन टीचं सेवन करावं. तुमचं पोट फार जास्त सेन्सीटिव्ह असेल तर असं करू नका. कारण ग्रीन टीमध्ये अल्कालाइन असतं. त्यासोबतच सकाळी आणि सायंकाळी ग्रीन टीचं सेवन करू शकता.
तयार करण्याची योग्य पद्धत
ग्रीन टी ची टेस्ट चांगली असावी आणि फायदेही भरपूर मिळावे यासाठी गरजेचं आहे की, ग्रीन टी योग्य पद्धतीने तयार केली जावी. पाणी फार ओव्हर हीट करू नका नाही तर ग्रीन टीमधील कॅटेचिन्स नष्ट होऊ शकतात. चांगल्या परिणामांसाठी पाणी गरम करून १० मिनिटे तसंच ठेवा. नंतर पाण्यात ग्रीन टीची पाने टाका आणि १ मिनिटांसाठी सेटल डाउन होऊ द्या. त्यानंतर चहा गाळून सेवन करा.