Holi Recipe 2024: यंदा होळीसाठी बनवा 'गुलकंद गुजिया' ही चविष्ट आणि समर फ्रेंडली रेसेपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:13 IST2024-03-19T13:12:59+5:302024-03-19T13:13:35+5:30
Holi Recipe 2024: उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यात होळी येऊ घातलीय, तेव्हा पुरणपोळीला जोड द्या गुलकंद गुजियाची!

Holi Recipe 2024: यंदा होळीसाठी बनवा 'गुलकंद गुजिया' ही चविष्ट आणि समर फ्रेंडली रेसेपी!
यंदा २४ मार्च रोजी होळी आणि २५ मार्च रोजी धूलिवंदन! महाराष्ट्रात होळी आणि पुरणपोळी हे समीकरण असतेच. मग धूलिवंदन आणि रंगपंचमीला पुन्हा काय वेगळे बनवायचे असा प्रश्न पडला असेल तर ही मस्त रेसेपी नक्की ट्राय करा.
गुलकंद गुजिया ही रेसेपी बनवायला सोपी, चविष्ट आणि पौष्टिक आहे. शिवाय त्यात गुलकंद वापरल्यामुळे उन्हाळ्यात ही रेसेपी तुमच्या तना-मनाला नक्कीच थंडावा देईल. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिसळून गुलकंद तयार केला जातो आणि तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. गुलकंद घरी तयार केला नसेल तरी बाजारातील विकतचा गुलकंद आणून ही रेसेपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. वाचा संपूर्ण रेसेपी-
सर्व प्रथम गुजियाची अर्थात करंजीची पारी तयार करण्यासाठी पीठ मळून घ्या. यासाठी एका परातीत दोन वाट्या मैदा घेऊन त्यात वितळलेले तूप घालून चांगले मळून घ्या. जेव्हा तुम्ही पीठ हाताने घासता तेव्हा ते ब्रेडक्रंबसारखे दिसू लागते.
आता थोडं थोडं पाणी घालून छान आणि गुळगुळीत पीठ मळून घ्या. लक्षात ठेवा की आपले पीठ खूप घट्ट किंवा खूप मऊ नसावे. २० मिनिटे पीठ झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून ते सेट होईल.
यानंतर तुम्ही गुजीयाच्या आतले मिश्रण तयार करा. कढईत २५० ग्राम मावा घ्या आणि ढवळत शिजवा. जेव्हा मावा थोडा कोरडा आणि हलका रंग दिसू लागतो तेव्हा समजून घ्या की तुमचा मावा भाजला गेला आहे. मावा थंड होऊ द्या.
आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये गुलकंद, बडीशेप, किसलेले खोबरे आणि मावा घालून व्यवस्थित एकत्र करा. २० मिनिटांनंतर, १ मिनिट पुन्हा पीठ मळून घ्या. एका वाटीत एक चमचा मैदा घालून त्यात गरजेनुसार पाणी घालून पातळ पेस्ट बनवा.
पिठाचे छोटे गोळे तयार करून पुरीच्या आकारात लाटून घ्या. या पुऱ्या गुजियाच्या साच्यात ठेवा आणि १ चमच्याने गुलकंद सारण भरून घ्या. कडांवर पातळ पेस्ट लावा आणि साचा बंद करा. कडा वरून जास्तीचे पीठ काढा.
त्याच पद्धतीने सगळ्या गुजिया तयार करून प्लेटमध्ये ठेवा. मिश्रण जास्त किंवा कमी नसावे हे लक्षात ठेवा. जास्त भरले तर गुजिया फाटते आणि कमी भरली तर रिकामी राहते.
आता एका कढईत तेल गरम करा आणि हळूहळू या गुजिया घाला आणि दोन्ही बाजूंनी गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि गार झाल्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करून सर्व्ह करा.