Shiv Jayanti 2026: कवी भूषणाची शिवस्तुती: मरगळ झटकून चैतन्य देणारा 'विजयमंत्र'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:44 IST2026-02-18T15:42:49+5:302026-02-18T15:44:07+5:30
Shiv Jayanti 2026: आपण रोजच्या देवपूजेत जसे श्लोक म्हणतो, तशी ही शिवस्तुती प्रत्येक शिवभक्ताने रोज म्हटलीच पाहिजे!

Shiv Jayanti 2026: कवी भूषणाची शिवस्तुती: मरगळ झटकून चैतन्य देणारा 'विजयमंत्र'!
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती(Shiv Jayanti 2026) आहे! आपल्या पराक्रमाने दाही दिशा उजळून टाकणाऱ्या आणि भारतभूमीचे सौभाग्य ठरलेल्या महापराक्रमी शिवसूर्याचा जन्मदिवस. महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही, तर भारतमातेचा सुपुत्र कसा असावा, याचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व जगासमोर उभे केले.
शिवजयंती म्हणजे केवळ 'जय शिवराय'च्या घोषणा देण्याचा दिवस नसून, महाराजांच्या चरित्राची आणि विचारांची उजळणी करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने कवी भूषण यांनी रचलेली ती प्रसिद्ध शिवस्तुती आपल्याला सळसळते चैतन्य देते. कवी भूषणाची शिवस्तुती आपण अनेकदा ऐकली असेल, तिचा अर्थही जाणून घेऊ!
कवी भूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना पौराणिक योद्धे, निसर्गातील शक्ती आणि देवांच्या तेजाशी केली आहे.
इंद्र जिम जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥
याचा भावार्थ अत्यंत तेजस्वी आहे:
ज्याप्रमाणे इंद्राचा जंभासुरावर विजय होता, समुद्राच्या अग्नीचा पाण्यावर प्रभाव असतो आणि प्रभू श्रीरामांनी गर्विष्ठ रावणाचा नाश केला; ज्याप्रमाणे ढगांना वारा पांगवतो, महादेवाने कामदेवाला भस्म केले आणि परशुरामाने सहस्रबाहूचा वध केला; ज्याप्रमाणे वणवा झाडांना कवेत घेतो, चित्ता हरणांच्या कळपावर झडप घालतो आणि सिंह हत्तीवर नियंत्रण मिळवतो; ज्याप्रमाणे सूर्य अंधाराचा नाश करतो आणि श्रीकृष्ण कंसाचा वध करतो... अगदी त्याचप्रमाणे मुघल राजवटीचा नाश करण्यासाठी 'शिवराज' हा प्रत्यक्ष सिंहासारखा धावून आला आहे!
स्वामी समर्थ तारक मंत्र: संकल्पाची 'ही' पद्धत बदलू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य; गुरुवारी करा सुरुवात!
केवळ स्तुती नाही, तर हा 'धडा' आहे!
ही शिवस्तुती म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तो एक वस्तूपाठ आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात आणि कार्यक्षेत्रात स्थान कसे निर्माण करायचे, याचा धडा महाराज आपल्या कृतीतून देतात:
नैराश्यावर मात: जसा सूर्य अंधार नाहीसा करतो, तसे महाराजांचे विचार मनातली मरगळ दूर करून जिद्द निर्माण करतात.
नैतिकतेचा विजय: महाराजांचे आचरण आणि शुद्ध विचार आपल्याला सांगत राहतात की, विजय मिळवायचा असेल तर तो नैतिकतेनेच मिळवावा.
व्यक्तिमत्त्वाची छाप: शत्रूसाठी कर्दनकाळ आणि रयतेसाठी 'जाणता राजा' कसे असावे, याचा हा आदर्श आहे.
ज्याप्रमाणे आपण रोज देवाचे श्लोक म्हणतो, तसे कवी भूषणाचे हे स्तोत्र आपण नित्य पठन करायला हवे. अजय-अतुल यांनी दिलेली सुंदर चाल आणि लता दीदींच्या सुरांनी नटलेली ही शिवस्तुती ऐकण्याबरोबरच ती तोंडपाठ असणे गरजेचे आहे. कारण जेव्हा हे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात, तेव्हा शरीरातील अणुरेणूत चैतन्य निर्माण होते.
चला तर मग, शिवरायांप्रमाणे आपली कृती आणि आचरण शुद्ध ठेवून स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण करूया!
जय भवानी, जय शिवाजी!