-मोहिनी घारपुरे-देशमुख
थोडंस स्टायलिश दिसायचं तर नवनवीन आऊटफीट ट्राय करायलाच हवेत नाही का.. पण हे नवनवीन आऊटफीट बनवताना अनेकदा फॅशन ब्रँड्स खरंतर जुन्याच फॅशन आयडीयाजमध्ये नवा टविस्ट देत असतात. अशातलीच एक फॅशन म्हणजे रफल्स.
तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी आपल्यापैकी अनेकजणींकडे फ्रीलचा म्हणजे झालरचा किमान एखादा तरी फ्रॉक होताच. हीच फ्रील केवळ बाह्यांनाच नव्हे तर संपूर्ण ड्रेसलाच लावली तर नवा आऊटफीट तयार होतो. हीच स्टाईल म्हणजे रफल्स. उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा अशा कोणत्याही ॠतूत रफल्स स्टाईलचे कपडे छानच दिसतात. त्यांच्यामुळे आपला लूक एकदम बदलून जातो.
खरंतर इंटरनॅशनल रँपवरही या रफल्सच्या कपड्यांची आजवर वेगळी नोंद घेतली गेली आहे हे विशेष. पूर्वी आजी, आई आपल्या हातानं शिवलेल्या कपड्यांवर अशी फ्रील जोडून त्याला एक वेगळाच विकत आणलेल्या ड्रेससारखा टच देत असत.
अलिकडे असे रफल्सवाले फ्रॉक, मॅक्सीज, कुर्तीज बाजारात ब्रँडेड शोरूम्समध्ये हमखास उपलब्ध असतात. त्यातही रफल्सच्या फ्रॉकलाच (मोठ्या मुलींसाठी बरं का) जास्त मागणी आहे. काहीसा रोमँटीक आऊटफीट टच देण्यासाठी फॅशन डिझायनर्स झिगझॅग आकारात कापलेले रफल्स डे्रसला जोडण्यास पसंती देतात. फ्लोरल प्रिंट्स, लेस वर्क हे रफल्सला जास्त शोभून दिसतात. रफल्सच्या फ्रॉकबरोबर शक्यतो हाय हील्सच वापरलेल्या अधिक चांगल्या.