हरिद्वार: उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान शेकडो साधूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याचं आवाहन केलं. मात्र आता सोशल मीडियावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं एक पत्र व्हायरल झालं आहे. डोवालांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल प्रशासनाचं कौतुक केल्याचा दावा या पत्राचा संदर्भ देऊन केला जात आहे.अजित डोवाल यांच्या नावानं सोशल मीडियावर शेअर करण्यात येणारं पत्र बोगस आहे. केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांनीच हे पत्र खोटं असल्याची माहिती दिली. व्हायरल झालेल्या पत्रात कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल अजित डोवालांनी उत्तराखंडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. याबद्दल केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हे पत्र खोटं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी असं कोणतंही पत्र लिहिलेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:52 IST