आपल्या अवतीभवतीच्या पाणथळ परिसंस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:46 IST2025-10-06T10:46:18+5:302025-10-06T10:46:36+5:30
नांदूरमधमेश्वर, लोणार, उजनी, धामापूर आदी पाणथळी आपल्यापैकी काहींना ऐकून माहीत असतील; तर काहींनी अशा पाणथळींना भेटीही दिल्या असतील.

आपल्या अवतीभवतीच्या पाणथळ परिसंस्था
- रेश्मा जठार
पर्यावरण संशोधक
महाराष्ट्रात अडीच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या म्हणजे मोठ्या पाणथळी २३ हजारांहून अधिक आहेत. त्यातील किमान १३ पाणथळी नवी मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आहेत, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले होते.
नांदूरमधमेश्वर, लोणार, उजनी, धामापूर आदी पाणथळी आपल्यापैकी काहींना ऐकून माहीत असतील; तर काहींनी अशा पाणथळींना भेटीही दिल्या असतील. पाणथळ ही आपल्या अवतीभवती सहज आढळणारी परिसंस्था आहे. भारतात नैसर्गिक पाणथळी या हिमालय, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांची गाळाची मैदाने व त्रिभुज प्रदेश आणि किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत.
बांधबंधारे, धरणे-जलवाहिन्या बांधल्यामुळे, रस्ते-लोहमार्ग बांधण्यासाठी घातलेल्या भरावामुळे पाणी अडल्यामुळे, मिठागरे, तळी-तलाव, मत्स्यपालनाकरिता टाक्या बांधल्यामुळे मानवनिर्मित पाणथळी तयार झाल्या आहेत. उथळ पाणीसाठा, त्या साठ्यात पाणी शिरण्यासाठी आणि त्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग, या मार्गांनी ठराविक नियमितपणे होणारी पाण्याची ये-जा व त्यामुळे पाण्याच्या स्तरात होणारे बदल या घटकांवर पाणथळीचे चलनवलन अवलंबून असते.
पाणीसाठा उथळ असल्यामुळे पाण्याच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकतो, पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर मिसळला जातो. प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करण्यासाठी वनस्पतींना हे दोन मुख्य घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पाणथळींमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नोत्पादन होते. त्यावर अवलंबून गुंतागुंतीच्या अन्नसाखळ्या निर्माण होतात. मोठ्या संख्येने विविध वनस्पती, पशुपक्षी इथे जगू शकतात. याउलट, खोल समुद्र आणि प्रचंड मोठ्या धरणांच्या खोल जलाशयांमध्ये जीवांचे फारसे वैविध्य व संख्याही नसते. पाणथळ असलेल्या परिसरात भूजल स्तर चांगला राहतो. पुराच्या वेळी पाण्याचा लोंढा प्रथम पाणथळीत शिरतो. त्यामुळे पुराचा जोर ओसरतो आणि जीवित व वित्तहानीवर नियंत्रण येते. महाराष्ट्रात अडीच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या म्हणजे मोठ्या पाणथळी २३ हजारांहून अधिक आहेत. त्यातील किमान १३ पाणथळी नवी मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आहेत. राज्य शासनाने २०२२ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली. याखेरीज, हजारोंच्या संख्येने लहान पाणथळीही आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती वेगळी होती. पर्यावरणतज्ज्ञ आणि पक्षी निरीक्षक प्रा. प्रकाश गोळे यांनी केलेली एक नोंद पाहा; ते लिहितात, ‘‘एके काळी महाराष्ट्रात फारशा पाणथळी नसाव्यात. स्थलांतर करून भारतात येणारी विविध प्रकारची बदके महाराष्ट्र ओलांडून कर्नाटकात जात. कारण तिथे सिंचन योजनांमार्फत बांधलेले अनेक पाणीसाठे होते. बार-हेडेड गूस हा पक्षी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात क्वचितच दिसत असे, नंतरच्या काळात मात्र तो हिवाळ्यात मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आढळू लागला.’’ मात्र, पाणथळींची संख्या वाढली म्हणजे निसर्ग संवर्धन झाले असे नव्हे; यातील बहुसंख्य पाणथळी दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये प्लास्टिकसह इतर घनकचरा टाकणे, कारखान्यांतील दूषित पाणी, मानवी वसाहतीतील सांडपाणी सोडणे, शेतांमधून वाहून आलेली रसायने पाणथळीतील पाण्यात मिसळणे, या नित्याच्या बाबी आहेत. पाणथळींसह इतर जलीय परिसंस्था या मानवनिर्मित कचरा रिचवण्यासाठीच असल्याचा आपला समज आहे. हा कचरा रिचवला जातो की केवळ दृष्टीआड जातो, याविषयी पुढच्या खेपेस.