पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:32 IST2025-10-31T10:32:34+5:302025-10-31T10:32:45+5:30
Mass Extinction of Earth: मानवी गतिविधींमुळे पृथ्वीवर सहावा सामूहिक विलुप्तीकरण (Mass Extinction) होणार? नवीन अभ्यासानुसार विलुप्तीकरणाचा वेग कमी.

पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
निसर्गावरील मानवाच्या वाढलेल्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर सहावा सामूहिक विलुप्तीकरण (6th Mass Extinction) म्हणजेच 'महाविनाश' येत असल्याची भीती अनेक दशकांपासून वैज्ञानिक व्यक्त करत होते. वितळणारे हिमनग आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास पाहता जैवविविधतेचे मोठे संकट येऊ घातले आहे, असे मानले जात होते. मात्र, एका नवीन अभ्यासाने या धोक्याच्या तीव्रतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका मोठ्या संशोधनानुसार, पृथ्वीवरील प्रजातींच्या विलुप्तीकरणाचा वेग पूर्वीच्या अंदाजित वेगापेक्षा कमी आहे. हा अभ्यास 'प्रोसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी' नावाच्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
विलुप्तीकरण कधी वाढलेले? 
संशोधकांनी सुमारे २० लाख प्रजातींच्या विलुप्तीकरणाच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यांच्या मते, वनस्पती, कीटक आणि जमिनीवरील पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये विलुप्तीकरणाचा वेग १०० वर्षांपूर्वी सर्वात जास्त होता आणि तेव्हापासून तो कमी झाला आहे.
जैवविविधतेचे सर्वाधिक नुकसान बेटे किंवा वेगळ्या प्रदेशात झाले. येथे मानवाने आणलेल्या उंदीर, डुक्कर आणि शेळ्यांसारख्या बाह्य प्रजातींनी स्थानिक जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट केली. आता विलुप्तीकरणाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी बेटांवरील प्रजाती धोक्यात होत्या, पण आज मुख्य धोका हा खंडांवरील नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि प्रदूषण यामुळे आहे. हे संशोधन जैवविविधतेच्या संकटाचे गांभीर्य नाकारत नाही. जंगलांची तोड, पाण्याची शुद्धता आणि ग्लोबल वॉर्मिंग हे आजचे धोके अजूनही खूप गंभीर असल्याचे यात म्हटले आहे.