विद्यार्थी शाळेत पण ऑनलाइन गैरहजर; यु-डायस नोंदणी प्रक्रियेत मुंबई सर्वात शेवटी, आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 07:05 IST2025-09-27T07:05:16+5:302025-09-27T07:05:37+5:30
स्वतंत्र पर्याय नसल्याने अडचण, विद्यार्थी शाळेत उपस्थित असला, तरीही ऑनलाइन मात्र तो गैरहजर असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थी शाळेत पण ऑनलाइन गैरहजर; यु-डायस नोंदणी प्रक्रियेत मुंबई सर्वात शेवटी, आकडेवारी समोर
मुंबई : शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार यु-डायस प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत करणे सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु यु-डायस नोंदणी प्रक्रियेत मुंबई सर्वात शेवटी असल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
महानगराच्या तुलनेत मुंबईत विद्यार्थ्यांची नोंदणी होताना दिसत नाही. नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र पर्याय या ऑनलाइन प्रणालीत उपलब्ध नसल्यामुळे शाळांची, तसेच शिक्षकांसह मुख्याध्यापकांची मोठी अडचण झाल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत उपस्थित असला, तरीही ऑनलाइन मात्र तो गैरहजर असल्याचे दिसत आहे.
यंदा महानगरात महापालिका आणि खासगी मिळून एकूण ४,११८ शाळा आहेत. त्यात १७ लाख ६२,८०७ विद्यार्थ्यांपैकी १६,५५,०४३ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र, १,०७,७६६ विद्यार्थ्यांच्या नोंदी अपूर्ण आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत मुंबई जिल्हा सर्वात तळाला तर जळगाव जिल्ह्याने ८ लाख २४ हजार ५९८ विद्यार्थ्यांपैकी आठ लाख ८ हजार ५२ नोंदणी पूर्ण केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
लाखो मुले शाळाबाह्य?
विद्यार्थी शाळेत उपस्थित प्रत्यक्षात असतो. परंतु, ऑनलाइन त्याची नोंद नसते. त्यामुळे संचमान्यता प्रक्रियेत शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. परिणामी, त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येण्याची भीती पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी व्यक्त केली. नवीन विद्यार्थी नोंदणीचा पर्याय नसल्याने ३० सप्टेंबरनंतर नोंदणीअभावी लाखो बालके शाळाबाह्य होण्याचा धोकासुद्धा शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी व्यक्त केला.
शिक्षण विभागाकडून याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याची चाचपणी सुरू आहे. - संजय यादव, संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.