'आयटीआय'मध्ये मुलींचे फक्त १०% प्रवेश; २२ ते २६ ऑगस्टपर्यंत केंद्रीय समुपदेशन फेरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:42 IST2025-08-22T10:41:23+5:302025-08-22T10:42:14+5:30
आतापर्यंत राज्यभरात १४ हजार मुलींनी 'आयटीआय' साठी प्रवेश घेतल्याची माहिती

'आयटीआय'मध्ये मुलींचे फक्त १०% प्रवेश; २२ ते २६ ऑगस्टपर्यंत केंद्रीय समुपदेशन फेरी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील 'आयटीआय'त यंदा मुलांच्या ५१ टक्के प्रवेशाच्या तुलनेत मुलींचे प्रवेशाचे प्रमाण १० टक्के इतके कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. आतापर्यंत राज्यभरात १४ हजार मुलींनी 'आयटीआय' साठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, राज्यात २१ ऑगस्टपर्यंत आयटीआयच्या सर्व ट्रेडसाठी एकूण १,५०,०५२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी आतापर्यत ९१,०६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये मुलांचे प्रवेश ७६,१२२ तर मुलींचे अवघे १४,९३८ इतके झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण फक्त १० टक्के असून, मुलांचे ५१ टक्के प्रवेश झाले आहे. यात मेकॅनिक विषयाकडे सर्वात कमी कल असून फक्त २,२४२ प्रवेश झाले आहेत. त्यानंतर टर्नर २,३५३, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक २,८६१ इतके प्रवेश झाले आहेत. तर वायरमनसाठी ४,८६७, मेकॅनिक मोटर व्हेईकल ४,९०३, मेकॅनिक डिझेल ५,१९१ व कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंगसाठी ६,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
वेल्डरसाठी ९,१८८, फिटरकरिता १०,२८० तर इलेक्ट्रिशनसाठी सर्वाधिक १७,६२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सरकारी आयटीआयमध्ये एकूण ६९,७०७ प्रवेश, खासगी आयटीआयत त्या तुलनेत कमी म्हणजे २१,३५३ प्रवेश झालेले आहेत. पहिल्या कॅप फेरीत ४२,००० तर पाचव्या कॅप फेरीमध्ये फक्त एक हजारच प्रवेश झाले आहेत.
समुपदेशन फेरी
२२ ते २६ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी केंद्रीय समुपदेशन फेरी सुरू राहणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.
आयटीआय प्रवेशात मुलींची संख्या वाढावी, यासाठी समुपदेशन करणे आवश्यक आहेत. तसेच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था देखील करायला हवी.
- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक