आता नोकरी करतानाच व्हा डॉक्टर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:42 IST2025-10-06T10:42:42+5:302025-10-06T10:42:56+5:30
टीआयएसएसमध्ये सद्य:स्थितीत पूर्णवेळ पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यातून नोकरी सांभाळून संशोधन अभ्यासक्रम करणे अनेकांना शक्य होत नाही.

आता नोकरी करतानाच व्हा डॉक्टर !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा समाजविज्ञान संस्थेतून आता नोकरी करताना पीएच.डी.ची पदवी घेता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नोकरदारांसाठी एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे नोकरदारांसाठी पीएच.डी. सुरू करणारी टीआयएसएस ही देशातील पहिली सोशल सायन्स शाखेतील संस्था ठरणार आहे. पूर्णवेळ नोकरी करणाऱ्यांनाही टीआयएसएस सारख्या नामांकित संस्थेत संशोधन करता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. बद्री नारायण तिवारी यांनी दिली.
टीआयएसएसमध्ये सद्य:स्थितीत पूर्णवेळ पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यातून नोकरी सांभाळून संशोधन अभ्यासक्रम करणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र कामाच्या ठिकाणांवरील अनुभवाच्या आधारे आणि त्यात संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून टीआयएसएसमध्ये आता नोकरदारां साठी पीएच.डी. करता येणार आहे. त्याला टीआयएसएस अकॅडमिक कौन्सिलमध्ये मान्यता देण्यात आली आहे. आता एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये मान्यतेसाठी याचा प्रस्ताव ठेवला जाईल.
टाटा समाजविज्ञान संस्था नेमणार संशाेधनासाठी ‘इंडस्ट्री एक्सपर्ट ‘
नोकरदार विद्यार्थ्यांना संशोधनात साहाय्य करण्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, इंडस्ट्री एक्सपर्ट नेमण्याचा विचार आहे. यातून या नोकरदार विद्यार्थ्यांना संशोधनात थेट इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल.
या पीएच.डी. प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टीआयएसएसमध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने बदल घडविण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या टीआयएसएसमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी., डिप्लोमा यांसारखे अभ्यासक्रम राबविले जातात. तसेच विविध घटकांसाठी प्रशिक्षण राबविले जातात. विविध क्षेत्रांत संशोधन आणि धोरण निर्मितीत संस्था योगदान देत आहे.