बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसाठी आता चार वर्षांचाही अभ्यासक्रम; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:05 AM2023-11-03T09:05:16+5:302023-11-03T09:06:12+5:30

बहुविद्याशाखीय पदवीतून नावीन्यपूर्ण विषय शिकण्याची संधी

Mumbai University Big Decision as B.A., B.Com., B.Sc will now also have four year course | बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसाठी आता चार वर्षांचाही अभ्यासक्रम; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसाठी आता चार वर्षांचाही अभ्यासक्रम; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सीच्या तीन वर्षांच्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बदल करण्याचा निर्णय घेत मुंबई विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय क्लस्टर आणि लीड महाविद्यालयांच्या सहकार्याने सहा वेगवेगळे बहुविद्याशाखीय पदवीचे पर्यायही देण्यात आले असून त्यात काही नावीन्यपूर्ण विषय शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत लवचिकताही असेल.

विद्यापीठाकडून स्वायत्तता मिळवलेल्या ६२ महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांमध्ये या वर्षीपासूनच हा पर्याय देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सर्व ८१२ संलग्नित महाविद्यालयांतही हा पर्याय खुला होईल. नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी.ला तीनसोबतच चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली. अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार करण्यात आला असून २०२४-२५ पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम शिकता येतील. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या समितीच्या अहवालातील शिफारशी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि सरकारचे निर्णय याचा सर्वंकष विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

क्लस्टर आणि लीड महाविद्यालयांची मदत

  • क्लस्टर आणि लीडचा दर्जा मिळवत विद्यापीठापासून वेगळे झालेल्या ८ ते १० महाविद्यालयांच्या सहकार्याने विद्यापीठाने यासाठी विशेष नियोजन केले आहे. ही सगळी अ श्रेणीची महाविद्यालये आहेत. 
  • क्लस्टर महाविद्यालयांकडून विद्यापीठाला अध्यापक, संसाधनांच्या आदीचे सहकार्य मिळेल. यातून काही नावीन्यपूर्ण, बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक पद्धतीचे अभ्यासक्रम तयार करण्याची योजना आहे. 
  • हे लघु (मायनर), ओपन इलेटीव्ह, मूल्यशिक्षण, को-करिक्युलर अभ्यासक्रम असतील. यात सहा वेगवेगळे बहुविद्याशाखीय पदवीचे पर्यायही आहेत. विद्यार्थ्यांना काही टप्प्यांवर ब्रेक घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मोकळीक असेल.


व्यावसायिक अभ्यासक्रमातही लवकरच लवचिकता

बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी.च्या पारंपरिक अभ्यासक्रमांनंतर उर्वरित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमही लवकरच नव्याने तयार केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण, प्रगत, बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील.
-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: Mumbai University Big Decision as B.A., B.Com., B.Sc will now also have four year course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.