APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:53 IST2025-09-02T08:52:13+5:302025-09-02T08:53:56+5:30
शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित; ‘आधार’च्या तांत्रिक अडचणीचा परिणाम

APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाशी निगडित अपार आयडी तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विविध अडचणींमुळे अद्याप राज्यभरातील तब्बल १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी फेल असल्याचे अपार स्टेटस अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे शासकीय शिष्यवृत्ती मिळण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाकडील माहितीनुसार, राज्यात एकूण २ कोटी ३२ लाख ४ हजार ४१७ विद्यार्थी असून, यापैकी १ कोटी ६३ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट (८०.३७ टक्के) झाले आहेत. पण उर्वरित सुमारे १ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी फेल झाले आहेत. आधार नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे अपार आयडी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून शाळांनी दिलेले बोनाफाईड प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागेल, असे शिक्षक, मुख्याध्यापकांना वाटत आहे. मात्र, अपार आयडी सक्तीचा नाही. काही अडचण असेल तर दूर करू. अपार आयडीमुळे शैक्षणिक कामगिरीची नोंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्था बदलणे, अभ्यासक्रम निवडणे, पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे सोपे होते, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
अपार आयडीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. पालकांचे मोबाइल नंबर बदलल्याने ओटीपी मिळत नाही. नावांतील चुकांमुळेही समस्या येत आहे. त्यामुळे या अडचणींकडे लक्ष द्यावे, असे मुख्याध्यापक संघटनाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले म्हणाले. अपार आयडीची नोंद स्वेच्छेने पालकांनी करायची आहे. कुठे अडचण आली असेल, त्यावर शिक्षण विभाग उपाय करेल. मात्र ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, असे शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले.
१ सप्टेंबरपर्यंत अपार स्थिती
इन ॲक्टिव्ह: १६,२८६
नॉट अप्लाईड: ३८ लाख ५१ हजार
जनरेटेड पासआऊट: १ कोटी १० लाख ९३ हजार