विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळांची पिछाडी; नोंदणीची गती वाढविण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:14 IST2025-10-07T08:14:17+5:302025-10-07T08:14:24+5:30
राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळांची पिछाडी; नोंदणीची गती वाढविण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळा मागे असल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रोजच्या हजेरीसाठी स्मार्ट चॅटबोट उपलब्ध करून दिला आहे. तरीही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी वेगाने होत नसून, नोंदणीची गती वाढविण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, ऑनलाईन माहिती भरल्यावरही रोज अर्जाच्या हार्ड कॉपी तीन प्रति शिक्षण विभाग मागविणे थांबवणार आहे का, असा सवाल शिक्षकांनी केला आहे.
राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे. या मंचावर सरकारी, तसेच खासगी शाळांची नोंदणी करून इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची रोजची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, यंदा सप्टेंबरअखेरपर्यंतही नोंदणीची गती मंद असल्याचे शिक्षण आयुक्तांनी कनिष्ठ अधिकारी व शाळांना कडक निर्देश जारी केले.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत नियमित आढावा घ्यावा. राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी अहवालामध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या डिजिटल नोंदणीसाठी स्वतंत्र गुणांकन दिले जाते.
त्यामुळेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजच्या उपस्थितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
शाळांना प्रगती पुस्तकावर उपस्थिती नोंद करण्यासाठी सहामाही आणि वार्षिक अहवाल मिळणार किंवा नाही. हे होणार नसेल तर दुहेरी काम करावेच लागेल. मग शिक्षकांचे काम सोपे कसे होणार.
महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना.