आसामात हेमंत ऋतू! हिमंता यांना माघार हा शब्दच माहीत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:11:35+5:30

नव्वदच्या दशकात विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून राजकीय बाळकडू घेतलेल्या हिमंता सर्मा यांना माघार हा शब्दच माहीत नाही. सलग दीड दशक जलुकबारी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.

Winter season in Assam! Himanta doesn't even know the word back ... | आसामात हेमंत ऋतू! हिमंता यांना माघार हा शब्दच माहीत नाही...

आसामात हेमंत ऋतू! हिमंता यांना माघार हा शब्दच माहीत नाही...

Next

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे अश्विन आणि कार्तिक महिन्यात म्हणजे हिवाळ्यात हेमंत ऋतू असताे. निसर्गाच्या सावटाखाली सतत असणाऱ्या आसाम प्रांतात ग्रीष्मामध्ये अर्थात उन्हाळ्यात हेमंत ऋतू साेमवारी अवतरला आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे महाकाय पात्र, चहाचे मळे आणि जैवविविधतेने नटलेल्या आसामचे नेतृत्व हिमंता बिस्वा सर्मा यांच्याकडे आले आहे. आजच्या घडीला ईशान्य भारतातील सात प्रदेशांना सेव्हन सिस्टर्स (सात बहिणी) म्हटले जाते. त्या विभागातील विकासाचा नवा चेहरा, एक राजकीय शक्ती हिमंता बिस्वा सर्मा यांच्या रूपाने उदयास आली आहे. 

नव्वदच्या दशकात विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून राजकीय बाळकडू घेतलेल्या हिमंता सर्मा यांना माघार हा शब्दच माहीत नाही. सलग दीड दशक जलुकबारी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यापैकी तेरा वर्षे कृषी, अर्थ, नियाेजन, आराेग्य, सार्वजनिक बांधकाम आदी खात्यांचा यशस्वी कार्यभार सांभाळला. काँग्रेस पक्षाचे नेते आणि आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गाेगई यांच्या घराणेशाहीच्या परंपरेला छेद देण्यासाठी बंडाच्या तयारीत असणाऱ्या हिमंता सर्मा यांना भाजपने २०१५ मध्ये हेरले. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यातील राजकीय धडाडीचे गुण हेरून भाजपमध्ये प्रवेश दिला. तेव्हाच काँग्रेससाठी घसरणीची वेळ आली हाेती. गाेगई हे आपल्या चिरंजीवाचे नेतृत्व पुढे यावे, यासाठी प्रयत्नशील हाेते. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ताेडगा काढला नाही. आसामचे मुख्यमंत्री हाेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सलग वीस वर्षे आमदार तसेच त्यापैकी अठरा वर्षे मंत्रिमंडळात धडाडीने काम करणाऱ्या हिमंता बिस्वा सर्मा यांना न्याय दिला गेला नाही. 

आसामचे मावळते मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्या मंत्रिमंडळातही अर्थ आणि आराेग्य खात्यांची जबाबदारी पाच वर्षे सांभाळताना हिमंता बिस्वा सर्मा यांनी उत्तम कामगिरी करीत काेराेनाच्या पहिल्या लाटेवर मात केली हाेती. एकावन्न वर्षांचे हिमंता बिस्वा सर्मा यांना काँग्रेसने नेतृत्वाची संधी दिली नाही तशी चूक भाजपने केली नाही, अन्यथा भाजपमध्ये बंडाची ठिणगी पडली असती. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापैकी केवळ आसाममध्येच भाजप सत्ताधारी पक्ष हाेता. ही सत्ता पुन्हा आणण्यात हिमंता बिस्वा सर्मा यांच्या कार्याची माेठी मदत झाली. काेराेना संसर्गाच्या कालावधीत त्यांनी गाेरगरिबांना आणि असंघटित मजुरांना तसेच चहा-काॅफीच्या मळ्यातील मजुरांना तातडीने मदत दिली. त्यासाठी  विविध याेजना आखल्या. त्या प्रभावीपणे राबविल्या. परिणामी भाजपला स्वबळावर सत्तेवर जाण्याइतपत बळ जनतेने दिले. काँग्रेसने महाआघाडी करताना परकीय नागरिकत्व कायद्याचा माेठा प्रचार केला हाेता. मात्र, सरकारच्या उत्तम कामगिरीच्या जाेरावर  भाजपने पुन्हा सत्ता खेचून आणली. विधानसभा निवडणुकीत भाजपने  सर्वानंद साेनाेवाल हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील हे मात्र सांगितले नव्हते. याचाच अर्थ हिमंता बिस्वा सर्मा यांनी बंड करण्याची तयारी केली नसती, तर सर्वानंद साेनाेवाल यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली असती. राजकारणाबराेबर एक धडाडीचा संघटक, अशी हिमंता बिस्वा सर्मा यांची प्रतिमा आहे. अखिल भारतीय बॅडमिंटन असाेसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आसाम क्रिकेट असाेसिएशनचे पदाधिकारी आहेत. 

आसामशिवाय ईशान्येकडील राज्यांच्या समस्यांची उत्तम जाण असलेला नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. राज्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुवाहटी विद्यापीठातून पीएच.डीदेखील केली आहे. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी आसाम गण परिषदेचे ज्येष्ठ नेते भृगकुमार फुकन यांचा पराभव करून दमदार प्रवेश केला हाेता. आसामला आता  विकासाची नवी आशा आणि हेमंत ऋतूचा गारवा यांची उत्सुकता लागून राहिली आहे. आसामशिवाय तामिळनाडू आणि पुडुचेरी प्रदेशाचे मुख्यमंत्री बदलले आहेत. तामिळनाडूत मुख्यमंत्रिपदाच्या रांगेत जवळपास दाेन दशके असलेले द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांची निवड अपेक्षित हाेती. मात्र, त्यांनी एम. करुणानिधी यांच्या सहा दशकांच्या राजकीय वटवृक्षाच्या छायेत दाेन दशके उमेदवारी केली आहे. गेली दहा वर्षे ते विराेधी पक्षनेते हाेते. नगरसेवक, महापाैर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आदी पदांवर काम केलेल्या स्टॅलिन यांच्याइतका तामिळनाडूला ओळखणारा दुसरा नेता नाही. पुडुचेरीत प्रथमच स्थानिक पक्षाबराेबर भाजप सत्तेवर येत आहे. एन. रंगासामी यांचा चेहरा पुडुचेरीला नवा नाही. भाजपबराेबर आघाडी करून ते  सत्तेवर येत आहेत. हेच तेथील वैशिष्ट्य आहे.
 

Web Title: Winter season in Assam! Himanta doesn't even know the word back ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.