विधिमंडळात अजितदादांच्या मृत्यूची चर्चा का नाही? ना रोहित पवार बोलत, ना सरकार... असं का?

By यदू जोशी | Updated: March 20, 2026 09:47 IST2026-03-20T09:45:18+5:302026-03-20T09:47:59+5:30

‘तो घातपात तर नव्हता ना?’ अशी शंका रोहित पवार यांनी तयार केलीच आहे. विधिमंडळात या शंकेचे निरसन करण्याची संधी सरकार का साधत नसावे?

Why is there no discussion about Ajit pawar death in the legislature | विधिमंडळात अजितदादांच्या मृत्यूची चर्चा का नाही? ना रोहित पवार बोलत, ना सरकार... असं का?

विधिमंडळात अजितदादांच्या मृत्यूची चर्चा का नाही? ना रोहित पवार बोलत, ना सरकार... असं का?

यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत

मिळेल त्या व्यासपीठावर जाऊन गेले काही दिवस रोहित पवार हे ‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नाही तर घातपात होता’ हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते संयुक्त राष्ट्रसंघाकडेही जातील कदाचित. मृत्यूनंतर दादांना ते इतके जपत असतात, आधीच जपले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. 

राजकारणात ज्यांचे ऐकले नाही त्यांच्याबद्दल मोठा आवाज करून बोलले जात आहे. गेल्यानंतरच माणसाबद्दल आदर वाटू लागतो वा त्याची किंमत कळते असे आपण म्हणतोच ना..! ‘आपण दीर्घकाळ ज्या सभागृहात राहिलो, महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, तिथे आपल्याच मृत्यूची चर्चा का होत नसेल’, असा प्रश्न अजितदादांनाही स्वर्गात पडला असेल.

सरकारलाही संधी
आरोपांची राळ ज्यांनी उठविली आहे ते रोहित पवार विधानसभेचे सदस्य आहेत, सभागृहात हा विषय आला तर ते आणखी मोठे गौप्यस्फोट करतील असे त्यांच्या जवळची एक व्यक्ती परवा सांगत होती. हा अपघात होता की घातपात? हे उद्या ‘सीबीआय’पासून तत्सम चौकशांमधून समोर येईलच; पण त्याबाबत संशयाचे धुके रोहित यांनी नक्कीच तयार केले आहे. या धुक्यात तर विधिमंडळातील चर्चा हरवली नाही ना अशी शंका येत आहे. तो घातपातच होता असे लोकांना अजूनही वाटत नाही; पण ‘तो घातपात तर नव्हता ना?’ अशी शंका लोकांच्या मनात रोहित यांनी निर्माण केली आहे. या शंकेचे निरसन करण्याची संधी या विषयावर विधिमंडळात चर्चा घडवून आणत सरकारला साधता येऊ शकते.

अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने आधीच घेतली आहे. त्यासाठी एक प्रक्रिया असते. राज्य सरकारने केंद्राला तसे पत्र पाठवावे लागते, ते अद्याप पाठविलेले नाही, असा रोहित पवार यांचा आरोप आहे. सीबीआय चौकशीच्या अनुषंगाने आतापर्यंत काय-काय झाले ते सरकारला सभागृहाच्या माध्यमातून राज्याला सांगता येऊ शकेल. चर्चा घेतलीच नाही तर शंकांना उगाच बळ येईल, ते होऊ द्यायचे का ते सरकारने ठरवायला हवे. 

मुख्यमंत्र्यांचे  पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची पारदर्शक, कालबद्ध आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यात आ. रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंकांचाही उलगडा व्हायला हवा अशी भूमिका घेतली आहे. चाैकशी यंत्रणांना आपले सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी हमी या पत्रात देण्यात आली आहे. फडणवीस आणि अजितदादांची एक वेगळीच केमिस्ट्री होती, दोघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास होता. ‘अपघाताच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक मुद्यातील तथ्य समोर आणलेच जाईल,’ असे फडणवीस यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांनाही सांगितले आहे. 

सगळे नेमके कशासाठी? 
अपघातासंदर्भात एक संशयाचे जे वातावरण तयार केले जात आहे त्याद्वारे मुख्यत्वे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. पक्षाची सूत्रे प्रस्थापित नेत्यांकडे राहू नयेत, त्यांना बाजूला केले जावे असे वाटणाऱ्या ज्या व्यक्ती दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आहेत त्या या मोहिमेत अग्रेसर आहेत. आरोपांमध्ये तथ्य नाही असे समोर आले तर विशिष्ट नेत्याला बदनाम करण्याचाच केवळ हेतू होता हे आणखीच स्पष्ट होईल. बरेचदा अशा दुर्घटनांच्या निमित्ताने काही जणांची राजकीय वाट रोखली जाते, राजकारण बिघडविले जाते, तथ्य समोर येते तेव्हा त्यांची कारकीर्द संपून गेलेली असते. 

अजितदादांच्या मृत्यूने असे काही घडू द्यायचे नसेल तर सरकारनेही तथ्य तातडीने समोर आणले पाहिजे. कारण शंका उपस्थित करायला सत्याचा आधार घ्यावाच लागतो असे नाही. शंका-कुशंकांच्या आधारे कोणाला घेरले जात असेल तर ते योग्य नाहीच; पण उद्या शंकाच सत्य निघाल्या तर त्या मागील सूत्रधारांनाही सोडता कामा नये या दोन्ही बाबींचा विचार करून विधिमंडळात चर्चा होणे आणि अपघातप्रकरणाची सीबीआय चौकशी तातडीने होणे गरजेचे आहे. 

ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या निमित्तानेही असेच काही जणांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, त्यात काही तथ्य नसल्याचे नंतरच्या काळात स्पष्ट झाले. इतिहासातही अनेक मोठ्या नेत्यांच्या अपघाती मृत्यूमागे षडयंत्राची थिअरी मांडली गेली होती. असे म्हणतात की पुणे-बारामतीत घर असलेल्या एका वैमानिकाने अजितदादांच्या अपघातासंबंधीचा घटनाक्रम, हवाई वाहतुकीचे तांत्रिक मुद्दे, ‘त्या’ विमानातील तांत्रिक कच्चे दुवे, त्यावेळचे हवामान या आधारे ‘अपघात नाही घातपात’ अशी मांडणी केली आहे. रोहित पवार यांच्यासह एक-दोन नेत्यांकडे त्याने हे सगळे पोहोचविले आहे. रोहित पवार हे त्यातल्याच बहुतेक मुद्यांची मांडणी करत असतात, जोडीला त्यांनी अन्य काही तज्ज्ञांकडूनही इनपुट घेतले आहेत. पुणे-बारामतीच्या त्या व्यक्तीला वैमानिक होण्यासाठी अजितदादांनीच मदत केली होती, अशी माहिती आहे.
yadu.joshi@lokmat.com

 

Web Title : विधानमंडल में अजित पवार की मृत्यु पर चर्चा क्यों नहीं?

Web Summary : रोहित पवार का आरोप है कि अजित पवार की मृत्यु दुर्घटना नहीं थी। संदेह बरकरार है। सरकार को अटकलों को दूर करने और सच्चाई प्रकट करने के लिए विधायी चर्चा और सीबीआई जांच के माध्यम से स्पष्ट करना चाहिए।

Web Title : Why no discussion of Ajit Pawar's death in legislature?

Web Summary : Rohit Pawar alleges Ajit Pawar's death was not accidental. Doubts linger. Government should clarify through legislative discussion and CBI inquiry to dispel speculation and reveal the truth.