‘युद्ध नको म्हणणारे जग आपण का पाहत नाही?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 04:54 IST2026-01-10T04:54:18+5:302026-01-10T04:54:18+5:30
१९३पैकी २२ देशांकडे सैन्यच नाही, तरी त्यांच्यावर कधीही हल्ले झालेले नाहीत. दोन तृतीयांश जग युद्धविरोधी आहे, ही वस्तुस्थितीच आपल्याला माहीत नाही.

‘युद्ध नको म्हणणारे जग आपण का पाहत नाही?’
मुलाखत आणि शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, लोकमत
‘युद्ध नाकारणारे जग’ या पुस्तकाची कल्पना कशी सुचली?
- ‘अ वर्ल्ड विदाउट वॉर’ या माझ्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. परिमल माया सुधाकर यांनी केलेला मराठी अनुवाद ‘युद्ध नाकारणारे जग’ या शीर्षकाने राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाची कल्पना जून २०१९ मध्ये रुजली. त्या वेळी आम्ही सहा जणांनी मिळून ‘नॉर्मंडी मॅनिफेस्टो फॉर वर्ल्ड पीस’ हा जाहीरनामा सादर केला. यात चार शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते, ब्रिटनमधील एक नामवंत तत्त्ववेत्ता आणि मी होतो. या चर्चांमधून एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती ही की, जगावर युद्धाचा धोका आहे, पण तो आपल्याला रोजच्या बातम्यांत स्पष्टपणे दिसत नाही. दैनंदिन जीवन सुरळीत असले, तरी मानवी संस्कृतीसमोर अतिशय गंभीर संकट उभे आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देताना या विचारांचा विस्तार करण्याचा आग्रह झाला. कोविड काळात मिळालेल्या निवांत वेळेत झालेल्या चिंतनातून हे पुस्तक साकार झाले.
पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र कसे विकसित झाले?
- मी जगभरातील विचारवंत, राजकीय नेते, अभ्यासक यांच्याशी सखोल चर्चा केली आणि त्यातून हे लक्षात आले की, जागतिक महायुद्ध ही केवळ काल्पनिक शक्यता नाही. ते कधीही होऊ शकते. अणुयुद्ध झाले तर पृथ्वीवरील सृष्टीच नष्ट होण्याची शक्यता आहे. मग यातून बाहेर कसे यायचे... त्यासाठी काय काय बदल करायला पाहिजेत याचा साकल्याने विचार केला. एकीकडे राजकीय व धार्मिक अतिरेकी विचार तीव्र होत आहेत, तर दुसरीकडे एआयमुळे अधिकाधिक स्वयंचलित होत चाललेली शस्त्रास्त्रे आहेत. या दोन्हींचे मिश्रण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या पुस्तकात मी युद्धाच्या शक्यतेचे आणि त्यामागील कारणांचे विश्लेषण केले आहे, तसेच त्यातून बाहेर पडण्याचे ऐतिहासिक व तात्त्विक मार्गही मांडले आहेत.
युद्ध नाकारणाऱ्या जगाच्या उभारणीत सामान्य लोकांची ठोस भूमिका असू शकते का?
- नक्कीच असते. मागच्या ५० वर्षांत शस्त्रास्त्रांची स्पर्धा कमी करण्यामध्ये आणि युद्ध थांबवण्यामध्ये सामान्य लोकांचा खूप मोठा सहभाग होता. गंमत म्हणजे त्यांनाच हे माहिती नाही. मागील पन्नास वर्षांत सामान्य नागरिकांनीच अनेक ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत. भूसुरुंगविरोधी जागतिक करार असो वा अण्वस्त्रविरोधी चळवळी.. या सर्वांचे नेतृत्व सत्ताधाऱ्यांनी नव्हे, सामान्य स्त्री-पुरुष, अभ्यासकांनी केले. विशेष म्हणजे जगातील १९३ देशांपैकी २२ देशांकडे सैन्यच नाही, तरी त्यांच्यावर कधीही हल्ले झालेले नाहीत. दोन तृतीयांश जग युद्ध नाकारणारे आहे, ही वस्तुस्थितीच आपल्याला माहीत नाही.
युद्धनीतीचा मुळातून फेरविचार व्हायला हवा असे वाटते का?
- होय. सुमारे १५० देशांना युद्ध नको आहे; संघर्ष फक्त ३०–४० देशांत केंद्रित आहेत. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही युरोपीय राष्ट्रेही पुन्हा युद्धखोर झाली आहेत. युद्ध अपरिहार्य नसते. अलिप्ततावाद आणि शांततावादी धोरणांमुळे अनेक संघर्ष टाळता येतात. पौर्वात्य तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुंबकम’ याच सूत्राभोवती गुंफलेले आहे. परंतु, पाश्चिमात्य देशांमधील तत्त्वज्ञान हे केवळ ‘स्वातंत्र्य’ या कल्पनेभोवती बेतलेले आहे. आपण आपले तत्त्वज्ञान केवळ घोषणा देण्यासाठी वापरतो. सांस्कृतिक दुराभिमान म्हणून नाही, पण पौर्वात्य देशांचे तत्त्वज्ञानच जगाला दिशा देऊ शकते.
भारत युद्ध टाळणारे सक्षम असे जागतिक मॉडेल उभे करू शकतो असे वाटते का?
- आपल्याला महान राष्ट्र व्हायचे आहे, अशी ज्यावेळेला कल्पना केली जाते, तशी महत्त्वाकांक्षा जन्म घेते तेव्हाच तो देश पुढे येतो. पण, महासत्ता होण्याचे डोहाळे लागले, तर देशाचा विकास होत नाही. त्यामुळेच भारताने सर्वप्रथम एक महान राष्ट्र बनण्याची आस धरली पाहिजे, महासत्ता बनण्याचा विचार बाजूला ठेवला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी, सुरक्षित आणि सन्मानाचे झाले, तर देश आपोआपच मजबूत होतो.
एआयच्या युगात ‘युद्ध नाकारणे’ अधिक अवघड झाले आहे का?
- सायबर आणि ड्रोन यांची मला फारशी काळजी वाटत नाही, पण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी नियंत्रण सुटण्याचा धोका वाढला आहे. एआयची क्षमता पाहता येत्या पाच वर्षांमध्ये एआय स्वतःच युद्ध लावेल. आण्विक युद्ध करू शकेल आणि सर्व जगाचा सर्वनाश करू शकेल. यासाठी जागतिक पातळीवर तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
durgesh.sonar@lokmat.com