ट्रम्पच्या सेक्रेटरीनं साठीच्या वृद्धाशी लग्न का केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:15 IST2025-11-25T10:14:51+5:302025-11-25T10:15:26+5:30
Doanld Trump's secretary: डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्रेटरी कॅरोलिन लेविट आणि तिचा पती निकोलस रिक्किओ यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या सोशल मीडिया भरून वाहत आहे. खरं तर हे लग्न आताचं नाही. या लग्नाला आता जवळपास दहा महिने झाले आहेत, त्यांना एक मुलगाही आहे, पण ज्यावेळी त्यांचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली नव्हती, तेवढी आता होते आहे!

ट्रम्पच्या सेक्रेटरीनं साठीच्या वृद्धाशी लग्न का केलं?
डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्रेटरी कॅरोलिन लेविट आणि तिचा पती निकोलस रिक्किओ यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या सोशल मीडिया भरून वाहत आहे. खरं तर हे लग्न आताचं नाही. या लग्नाला आता जवळपास दहा महिने झाले आहेत, त्यांना एक मुलगाही आहे, पण ज्यावेळी त्यांचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली नव्हती, तेवढी आता होते आहे!
काय आहे त्याचं कारण? - अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची सचिव म्हणजेच व्हाइट हाउसची प्रेस सेक्रेटरी दिसायला अतिशय सुंदर आहे, तरुण आहे, तिचं वय आहे केवळ २८ वर्षं, पण आपल्या वयापेक्षा तब्बल ३२ वर्षांनी मोठ्या असलेल्या साठीच्या व्यक्तीशी तिनं लग्न केलं! तिच्या पतीचं वय तिच्या आईपेक्षाही जास्त आहे! लग्नाच्या आधीच म्हणजे १० जुलै २०२४ रोजी त्यांना मुलगा झाला आणि त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी लग्न केलं!
तिचे पती निकोलस रिक्किओ न्यू हॅम्पशायर येथील रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. त्यांनी लग्न केल्यानंतर कॅरोलिनला अनेकांनी विचारलं, एवढ्या मोठ्या वयाच्या व्यक्तीशी तू का लग्न केलंस? - पण त्यावेळी तरी तिनं पत्रकारांना आणि तिला हा प्रश्न विचारणाऱ्यांना याबाबत काही खुलासा केला नव्हता.
याच प्रश्नावर तिला आता पुन्हा छेडल्यानंतर मात्र तिनं आता खुलेपणानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकारांनी जेव्हा तिला मजेत विचारलं, लग्नासाठी तुला तुझ्या वयाचा कोणी परिपक्व पुरुष भेटला नाही का, तेव्हा लेविटनंही हसत उत्तर दिलं, तुम्हाला खरं जाणून घ्यायचं असेल आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर ‘नाही’!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी काही दिवस आधी जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी लग्न केलं. लेविट सांगते, २०२२ मध्ये मी रिक्किओला भेटले, तेव्हा न्यू हॅम्पशायरमधून मी निवडणूक लढवत होते. त्यानंतर आमच्या भेटी आणि आमच्यातली जवळीकही वाढत गेली. आधी बराच काळ आम्ही फक्त मित्र होतो. नंतर या नात्यातून प्रेम निर्माण झालं. आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. आम्ही मुलाला जन्म दिला आणि माझ्या स्वप्नातल्या पुरुषाशी मी लग्न केलं, पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. सुरुवातीला माझ्या कुटुंबातूनच मला थोडा विरोध झाला. माझे आई-वडील सुरुवातीला या नात्याबद्दल साशंक होते, पण नंतर सगळं कही सुरळीत झालं.
आई-वडिलांची रिक्किओशी भेट झाली. त्यांच्याही भेटी वाढत गेल्या. ते एकमेकांना ‘ओळखू’ लागले, त्यानंतर मात्र त्यांनी रिक्किओला लगेचंच स्वीकारलं. त्याचा स्वभाव पाहून आणि तो माझ्यावर किती प्रेम करतो हे समजल्यावर त्यांचा विरोध आपोआपच मावळला आणि मग सगळंच सोपं झालं. आज दोन्ही कुटुंबांमध्ये अतिशय जवळीक आहे. सगळा परिवार एकत्र वेळ घालवतो.
नवऱ्याबद्दल बोलताना लेविट म्हणते, तो खूप इन्ट्रोव्हर्ट आहे. सोशल मीडियापासून कायम चार हात दूर राहतो. तो सेल्फ-मेड बिझनेसमन आहे आणि यशस्वी रिअल इस्टेट उद्योजक आहे. स्वतःचं करिअर उभं केल्यानंतर आता माझ्या राजकीय कारकिर्दीत तो खंबीरपणे माझ्यासोबत उभा आहे.