ठळक मुद्देतब्बल २५ वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून काम केल्यानंतर भुजबळांनी शिवसेना का सोडली होती?शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता.भुजबळ शिवसेनेत अधिकच प्रभावी व्हायला लागलेत, असा समज झाल्यानं त्यांचे पंख छाटण्याची खेळी खेळली गेली.

>> संदीप प्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. १९९१ साली शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' करण्याची धमक दाखवून खळबळ उडवून देणारे भुजबळ 'घरवापसी' करत असतील, तर चर्चा होणारच. परंतु, 'घड्याळा'ची जागा 'शिवबंधन' घेणार का, हे अजून पक्कं ठरत नाहीए. कारण, भुजबळांना पुन्हा घ्यायचं का, यावरून शिवसेनेतच दोन गट असल्याचं कळतंय. त्यामुळे पक्षप्रमुख काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचंच आहे. मात्र, या चर्चा सुरू असताना थोडं इतिहासात डोकावणं रंजक ठरेल. तब्बल २५ वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून काम केल्यानंतर भुजबळांनी शिवसेना का सोडली होती?, असं काय झालं होतं की त्यांनी थेट 'रिमोट कंट्रोल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंशीच 'पंगा' घेतला होता?, शिवसैनिक राज्यभर शोधत असताना भुजबळ नेमके कुठे लपले होते?, ते शरद पवारांना 'खास' का आणि कसे झाले?, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाती पर्वाकडे घेऊन जाणारीच आहेत.

भुजबळांचे 'अच्छे दिन'

शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे, मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ  १९८५च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर ते हल्लाबोल करत होते. असा घणाघात तेव्हा विधिमंडळासाठी नवा होता. कारण तेव्हापर्यंतचे विरोधक अगदीच नेमस्त होते. भूखंड घोटाळ्यावरून तर छगन भुजबळांनी सभागृहात 'राडा'च केला होता, असं म्हणायलाही हरकत नाही. सभागृहात न बोलण्याची शिक्षा झाली होती, तेव्हा हातवारे करत भुजबळांनी भाषण केलं होतं. त्यानंतर दोन दिवस सभागृहाचं कामकाज झालं नव्हतं.  

एकीकडे छगन भुजबळ विधानसभा गाजवत होते आणि दुसरीकडे मुंबईचे महापौर म्हणूनही चमकत होते. तेव्हा, वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दोन माणसं झळकत होती - एक होते राजीव गांधी आणि दुसरे छगन भुजबळ. हा आयुष्यातील सगळ्यात सुखाचा, आनंदाचा काळ होता, असं भुजबळ स्वतः सांगतात. बहुधा, त्यालाच कुणाची तरी दृष्ट लागली असावी. कारण, पुढच्या वर्षभरात जे घडलं, तर त्यांच्यासाठी अकल्पित, अनाकलनीय आणि भयंकर होतं. 

धक्का आणि दे धक्का!

छगन भुजबळांनी इतक्या वर्षांमध्ये अनेक निष्ठावंत शिवसैनिक हेरले होते. १९९० ची विधानसभा निवडणूक येताच, या मंडळींना तिकीट मिळावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतलं. बाळासाहेबांनीही भुजबळांवर विश्वास ठेवून या शिलेदारांना उमेदवारी दिली. तेव्हाच, एका इंग्रजी दैनिकात हेडलाइन आली आणि त्यानंतर सगळीच गणितं बदलली. 'भुजबळ शिवसेनेला मुंबईबाहेर घेऊन जात आहेत, मराठवाड्यात सेनेला यश मिळण्याची शक्यता', अशा आशयाची ती बातमी होती. त्यातून 'मातोश्री'वर वेगळाच 'मेसेज' गेला. भुजबळ शिवसेनेत अधिकच प्रभावी व्हायला लागलेत, असा समज झाल्यानं त्यांचे पंख छाटण्याची खेळी खेळली गेली. १९९०च्या निवडणुकीत शिवसेनेचे शिलेदार निवडून आणण्यासाठी भुजबळांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु, विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशींना दिलं गेलं. हा भुजबळांसाठी पहिला धक्का होता. स्वाभाविकच, ते दुखावले, नाराज झाले. 

अन्याय सहन न करण्याची शिकवण ज्या शिवसेनेनं दिली, त्यांनीच आपल्यावर अन्याय केल्याची भुजबळांची भावना झाली. त्याविरोधात त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला. आपण ओबीसी असल्यानं आपल्यावर अन्याय झाला आणि मनोहर जोशी ब्राह्मण असल्यानं त्यांना पद देण्यात आलं, अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मंडल आयोगाचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे भुजबळांनी शिवसेनेवर, बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांना हवाच मिळाली. परंतु, त्यामुळे बाळासाहेब चिडले. कारण, जात-पात न मानणारा पक्ष अशीच शिवसेनेची ओळख होती. त्याला भुजबळांमुळे तडा जात होता. 

या पार्श्वभूमीवर, एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेबांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना लक्ष्य केलं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते रामराव आदिक उपस्थित होते. त्यांना उद्देशून बाळासाहेब म्हणाले, 'आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा.' हे वाक्य भुजबळांच्या जिव्हारी लागलं. त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ही अवस्था शरद पवारांनी अचूक हेरली आणि लोणावळ्यातील पहिल्या भेटीत त्यांनी भुजबळांना काँग्रेसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं.  

शिवसेनेला धक्का देण्याचा इराद्यानं छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये जायचं ठरवलं. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना आणखी काही आमदार फोडावे लागणार होते. त्यामुळे त्यांनी १८ जणांना तयार केलं. त्यापैकी अनेकांना भुजबळांनीच तिकीट मिळवून दिलं होतं. पण, तरीही १८ पैकी १२ जण मागे फिरले. कारण, शिवसेनेचा तेव्हाचा दरारा प्रचंड होता. हे बंड परवडणारं नाही, बाळासाहेबांच्या एक आदेशाने काहीही होऊ शकतं, अशी भीती त्यांना वाटली. परंतु, सहा जण भुजबळांसोबत राहिले आणि १९९१च्या नागपूर अधिवेशनादरम्यान त्यांनी शिवसेना सोडली. इतका धाडसी निर्णय सेनेतच काय, पण राज्याच्या राजकारणातही आधी कुणी घेतला नव्हता. 

'मिशन बदला!'

शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या सैनिकांसाठी हे दुःसाहस होतं. बाळासाहेबांनी 'लखोबा लोखंडे' म्हणून भुजबळांना धारेवर धरलं होतं. त्यामुळे, 'तेरी ये मजाल' म्हणत राज्यभरातील सैनिक अक्षरशः भुजबळांच्या मागावर होते. ते सापडले असते, तर काय झालं असतं, याची कल्पना आपण करू शकतो. 

या काळात छगन भुजबळ गायब झाले होते. ते काही काळ नागपूरच्या पॉवर हाऊसमध्ये राहिले होते आणि नंतर पद्मसिंह पाटील यांच्या बंगल्यात होते. ते तिथे असल्याची कुणकुण काही शिवसैनिकांना लागली आणि ते बंगल्यावर धडकलेही. परंतु, भुजबळांनी प्रसंगावधान दाखवून स्वतःला वाचवलं. शिवसैनिक घरभर शोधत असताना, भुजबळ एक चादर अंगावर ओढून बाकड्यावर पडून राहिले होते आणि मोठंच संकट टळलं.

माझगाव टू येवला!

हळूहळू वातावरण शांत होत गेलं. भुजबळ काँग्रेसवासी झाले. जबरदस्त सुरक्षा त्यांच्या अवतीभवती असायची. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांना एक पत्रही पाठवलं होतं. त्यामुळे तणाव आणखी निवळला. आता प्रश्न होता, तो पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा. १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत भुजबळ माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, शिवसेनेची मुंबईतील ताकद बघता, ते पुन्हा तिथून निवडून येतील का, याबद्दल शंकाच होती. त्यावेळी पवारांनी आपली पॉवर वापरली. येवला मतदारसंघातील आपल्या माणसांना त्यांनी बोलावून घेतलं आणि भुजबळांना निवडून देण्याचा आदेश दिला. त्यानंतर, पुढची अनेक वर्षं येवला मतदारसंघ आणि छगन भुजबळ हे समीकरणच होऊन गेलं. शरद पवारांचं हे ऋण भुजबळांच्या बोलण्यातून कायम जाणवतं. म्हणूनच, पवारांनी काँग्रेसला राम-राम ठोकून राष्ट्रवादीची स्थापना केली, तेव्हा त्यांच्यासोबत भुजबळ भक्कम उभे होते. आजही, त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना, त्यांचं उत्तर अजून तरी 'नाही' असंच आहे. आता पुढे काय होतं, ते येत्या काही दिवसांत समजेलच! 

'सबसे बडी भूल...'

छगन भुजबळ शिवसेनेत असताना त्यांनी एक गंभीर विधान केलं होतं. महात्मा गांधींचे पुतळे उखडून टाका आणि नथुराम गोडसेंचे पुतळे बसवा, असं ते जाहीरपणे म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादळच आलं होतं. त्यानंतर काही वर्षांनंतरची गोष्ट.

शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ बराच काळ मुंबईपासून दूरच होते. शिवसेनेशी केलेल्या बंडानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले, ते एका चर्चासत्रासाठी. विषय होता, गांधी विरुद्ध गोडसे. फारुख अब्दुल्ला, मुफ्ती मोहम्मद सईद, एम जे अकबर यांच्यासारखे वक्ते या कार्यक्रमात आले होते. पण सगळ्यांच्या नजरा होत्या भुजबळांवर. ब्लॅक कॅट कमांडोंचं कवच घेऊन ते आले होते. आता ते काय बोलणार, नथुराम गोडसेंचे पुतळे बसवायला सांगणार की गांधीजींचे, याकडे सगळ्यांचे कान लागले होते. तेव्हा, माझं ते विधान म्हणजे सगळ्यात मोठी चूक होती, अशी जाहीर माफी मागून भुजबळांनी वादावर पडदा पाडला होता. 

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

'या' नेत्यामध्ये तरूण बाळासाहेब दिसतात; संजय राऊतांनी केलं भरभरून कौतुक 

शरद पवार यांच्या संतापावर कन्या सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आदित्य फॉर्म्युला: सत्तेसोबत युतीही हवी, पण भाजपवर टीका ही करायची

Video: आमदार राष्ट्रवादीचा, प्रवेश करणार भाजपात अन् गाणं वाजलं मनसेचं

Web Title: Why did Chhagan Bhujbal leave Shiv Sena Balasaheb Thackeray in 1991?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.