Which direction is Jalgaon going? | जळगाव कोणत्या दिशेने चाललेय ?
जळगाव कोणत्या दिशेने चाललेय ?

- मिलिंद कुलकर्णी
जळगावातील गेल्या काही दिवसांमधील घटना बघीतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाला चिंता वाटते आहे. सर्वच क्षेत्रातील मंडळी भयग्रस्त आहेत. कारण मातब्बर मंडळींविषयीच्या या घटना आश्चर्यकारक आणि अनाकलनीय अशाच आहेत. उघडपणे कोणीही बोलत नाही, पण कुजबूज मात्र वेगाने सुरु आहे. दबलेल्या आवाजाचा परिणाम किती होतो माहित नाही, मात्र जळगाव बदलतंय यावर बहुतेकांचे एकमत होत आहे.
गोरजाबाई जिमखान्यात सर्वसामान्य माणूस फारसा जात नाही. त्यामुळे तिथे काय चालते, याची त्याला माहिती नाही. माजी महापौर ललित कोल्हे यांनी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना त्याच जिमखान्याच्या परिसरात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेनंतर तेथे भेट देऊन पाहणी केली. पहिल्यांदा जिमखान्यातील छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली. सोशल क्लब म्हणून नोंदणी झालेला हा जिमखाना १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटीश जिल्हाधिकारी सिमकॉक्स याने स्थापन केला होता. समाजातील प्रतिष्ठित मंडळी त्याचे सभासद आहेत. ललित कोल्हे यांचे वडील माजी नगरसेवक विजय कोल्हे हे त्या जिमखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याठिकाणी ही घटना घडली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हाणामारी कैद झाल्याने त्याचा डीव्हीआर गायब झाला होता. दुसºया दिवशी त्याच परिसरातील झुडपांमध्ये तो आढळला. साहित्या आणि कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीचा विषय असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. साहित्या हे अधिक उपचारासाठी मुंबईला रवाना झाले असून भाजपचे मनपातील सभागृह नेते असलेले कोल्हे फरार आहेत. साहित्या आणि कोल्हे हे पूर्वी एकमेकांचे मित्र होते. अचानक वितुष्ट येण्याचे कारण काय याविषयी कुजबूज आहेच.
दुसरी घटना तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला एकमेकांना तीळगुळ देऊन ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून कटुता विसरण्याचा अनोखा संदेश दिला जातो. भारतीय संस्कृतीमधील गोडवा या सणाने अधोरेखित होतो. मात्र एका महिलेच्या जीवनात हा दिवस भयप्रद ठरला. घर भाड्याने हवे आहे, म्हणत घरी आलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेने या घरमालक महिलेला विवस्त्र करीत बांधून ठेवले. मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. रोकड, सोन्याचे दागिने आणि प्रॉपर्टीशी संबंधित स्टॅम्प पेपर लांबविले. सणाच्या दिवशी भर दुपारी भरवस्तीत हा प्रकार घडतो हेच मुळी धक्कादायक आहे. अपार्टमेंट संस्कृती अजून जळगावात रुळलेली नसताना हे घडणे म्हणजे भयसूचक घंटा आहे. महानगरांमधील गुन्हेगारी जळगावकरांच्या उंबरठ्यापाशी तर आली नाही ना, असा प्रश्न पडतो. पोलिसांना या प्रकरणातही अद्याप छडा लागलेला नाही. मात्र आरोपींच्या संवादातील मालमत्ता हडपण्याचा उल्लेख आणि स्टॅम्प पेपरची चोरी हे विषय कळीचे ठरु शकतात.
पत्रकाराला समाजाचे जागल्या म्हणून मानले जाते. नुकतेच ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा करताना पत्रकारांना पुन्हा एकदा या असिधारा व्रताची आठवण करुन देण्यात आली. व्रत की व्यवसाय अशी मतभिन्नता असली तरी हे क्षेत्र आमुलाग्र बदलत आहे, हे मान्य करायला हवे. जळगावातील पत्रकार प्रमोद बºहाटे यांच्याविरुध्द खंडणी मागितल्याचा दाखल झालेला गुन्हा, अटक आणि पाच लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हारयल झालेला व्हीडीओ धक्कादायक आहे. वाळू व्यावसायिक अजय बढे यांनी तक्रार केली आणि दुसºया दिवशी पत्रकार परिषद घेऊन आणखी आरोप केले. पाचोºयाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार कैलास तावडे यांची नावे तक्रारीत आहेत. पोलीस अधिकारी त्यांनाही चौकशीसाठी बोलाविणार आहे. वाळू व्यवसायाचे अर्थकारण आणि त्याच्याशी आता पत्रकाराचे जोडलेले गेलेले नाव हा विषय गंभीर असाच आहे.
केळी, कापूस आणि कवितेचे गाव, सांस्कृतिक गाव, केशवसूत-बालकवी-बहिणाबाई-महानोरांसारख्या कवींचे गाव, बालगंधर्वाचा पुनीत स्पर्श झालेले गाव, दाल उद्योग, पाईप उद्योग, सुवर्णबाजाराने दिलेली वेगळी ओळख, वांग्याचे भरीत, मेहरुणची बोरे ही वैशिष्टये, या सगळ्यांचा अभिमान बाळगत असणाºया आम्हा जळगावकरांना पुन्हा एकदा बदनामीच्या, गुन्हेगारीच्या कालखंडाकडे जावे लागणार आहे का, असा अस्वस्थ प्रश्न भेडसावत आहे.

Web Title:  Which direction is Jalgaon going?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.