चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 07:49 IST2025-10-07T07:48:25+5:302025-10-07T07:49:01+5:30
दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर यादरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील प्रगतीविषयी..

चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
- अविनाश शिरोडे,
निवृत्त अभियंता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
यंदा जागतिक अंतराळ सप्ताहाची संकल्पना आहे ‘अंतराळात जीवन.’ मानवाने केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अंतराळातही राहण्याच्या आणि काम करण्याच्या संधींचा हा शोध आहे. अंतराळ स्थानकांमध्ये राहणे, अंतराळातील भौतिक वातावरणाशी जुळवून घेणे, अन्न पाणी आणि ऊर्जा व्यवस्थापन, तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य यासंबंधीचे विज्ञान समजून घेण्यावर भर दिला जात आहे. मानवाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर आता पृथ्वीच्या बाहेर जाण्याचा विचार करावा लागेल. त्याची प्रेरणा अंतराळातील जीवनाच्या अभ्यासातून मिळते.
अंतराळयुगाची सुरुवात ४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने ‘स्फुटनिक १’ या यानाने आणि एक महिन्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी ‘स्फुटनिक २’च्या प्रक्षेपणाने केली. त्यावेळी ‘लायका’ नावाची कुत्री, हा पहिला जिवंत प्राणी त्या यानातून पाठवला गेला होता. १४ सप्टेंबर १९५९ रोजी हे पहिले मानवनिर्मित ‘ऑब्जेक्ट’ पाठवले गेले. १२ एप्रिल १९६१ रोजी ‘युरी गागारिन’ हा पहिला मानव अवकाशात पोहचला.
१२ सप्टेंबर १९६२ रोजी त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनडी यांनी अमेरिका सुद्धा या स्पर्धेत उतरेल आणि आपली स्वतःची चांद्रमोहीम कार्यक्रम राबवेल, असे घोषित केले. अमेरिकेने ‘अपोलो १० पर्यंत’ चांद्रमोहिमा राबवल्या. वेळोवेळी त्यांच्या ॲस्ट्रॉनॉट्सनी चंद्राबद्दल बरीच मूलभूत माहिती गोळा केली आणि ‘अपोलो ११’ या यानाद्वारे २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले.
त्यावेळी नील आर्मस्ट्रॉंग, बझ ऑल्ड्रिन यांनी त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी चंद्राच्या पृष्ठभागावरून संभाषण केले. पृथ्वी सोडून प्रत्यक्ष अंतराळातील मानवाशी केलेले हे पहिले संभाषण. त्यानंतर अनेक चांद्रमोहिमा राबवल्या गेल्या. १९७२ नंतर या मोहिमा थांबवण्यात आल्या. त्यानंतर आजतागायत कोणीही माणूस चंद्रावर उतरलेला नाही.
‘नासा’, ‘इस्त्रो’ यांच्यासह विविध देशांतल्या अंतराळ संशोधन संस्थांबरोबरच आता खासगी क्षेत्रातल्या कंपन्याही अंतराळ संशोधनात उतरल्या आहेत. पृथ्वीवरची संसाधने अतिशय मर्यादित आहेत; पण अवकाशात सूर्यमालेतील इतर ग्रहांवर ही संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. हवामान बदल आणि प्रदूषणाचे संकट यामुळे पृथ्वीवरील मानवी जीवन भविष्यात संकटात आल्यास मानवापुढे दोन पर्याय उरतात : ग्रहांवरील संसाधने पृथ्वीवर आणणे किंवा मानवाने पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर वस्ती करणे. रशिया आणि अमेरिकेनंतर इतर अनेक प्रगत देश स्पेस टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रगती करू लागले. अमेरिकेत रशियाच्या चांद्रमोहिमेनंतर या टेक्नॉलॉजीचा मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होऊ लागला. हवामानाच्या अंदाजापासून वाहतुकीच्या नियमनापर्यंत आणि दूरसंचार क्षेत्रापासून अगदी हवामान बदलाच्या अभ्यासापर्यंत अनेक क्षेत्रात अवकाश तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल झाले. ‘स्पेस टूरिझम’, ‘स्पेस सोलर पॉवर सेंटर’ आणि त्याचा उपयोग, शेती क्षेत्रातील प्रयोग हे पृथ्वीपेक्षा अवकाशात जास्त चांगल्या प्रकारे करता येतात. धोकादायक आण्विक कचरा अवकाशात विशिष्ट उंचीच्या वर टाकण्याचे प्रयोग, ग्लोबल वाॅर्मिंग कमी करण्यासाठी अवकाश आधारित ‘सन शेड’ म्हणजे ‘छत्री’ असे अनेक प्रयोग चालू झाले आहेत. आता मानव प्रथमत: चंद्र आणि नंतर मंगळ या ग्रहांवरच्या वस्तीसाठी सज्ज झाला आहे.
‘इंटरनॅशनल स्पेस सेंटर’ इथे शास्त्रज्ञांचे येणे-जाणे आणि जगात विविध प्रयोग नित्यनेमाने चालू आहेत. भारत काही बाबतीत त्यांच्याही पुढे प्रगती करत आहे. अगदी पहिल्या एसएलव्ही-३ रॉकेटपासून सुरुवात होऊन आज वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्चर्स, स्क्रॅम जेट इंजिनपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. ‘चांद्रयान ३’ नंतर ‘चांद्रयान ४’ची तयारी सुरू आहे. आदित्य मिशन, अवकाशात माणूस पाठवायचे प्रकल्प हे नजीकच्या भविष्यात साकार होतील
‘स्पेस टुरिझम’ अगदी नजीकच्या भविष्यात नित्याची बाब होणार आहे. १०० मैलांच्या उंचीपर्यंत सामान्य माणूस अवकाशात जाऊ शकेल. व्हर्जिन गॅलॅक्टिक यांचे प्रयोग कमालीचे यशस्वी झाले आहेत आणि स्पेसेक्स कंपनी तर २०३० पर्यंत अनेक लोकांना चंद्रावर घेऊन जायच्या तयारीत आहे. काही वर्षांनंतर ‘स्पेस ट्रॅव्हल’ ही नित्याची बाब होईल. हौशी लोकांसाठी स्पेस हॉटेल्स असतील. पुढचा काळ कसा असेल, याची कल्पनाही करवत नाही.