शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

जातमानसीकता कधी बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:10 PM

तरुणाईला वेड लावलेले ‘सैराट’मधील परशा आणि आर्ची आजही सगळ्यांच्या काळजात घर करून असतील. पण, परशा आणि आर्चीच्या माध्यमातून समाजातील जातिव्यवस्थाचे वास्तव दिग्दर्शक नागराज

धनाजी कांबळे

तरुणाईला वेड लावलेले ‘सैराट’मधील परशा आणि आर्ची आजही सगळ्यांच्या काळजात घर करून असतील. पण, परशा आणि आर्चीच्या माध्यमातून समाजातील जातिव्यवस्थाचे वास्तव दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जे मांडलं. त्याकडे सोसीयस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. आज देश २१ व्या शतकात पोहोचला असताना, आजही जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली खून पाडले जात आहेत, याला आपल्याकडे काय उत्तर आहे. एकीकडे विज्ञानाने माणूस अंतराळात गेला असला, तरी जातीय अभिमान जपणारे लोक आजही तरुण मुला-मुलींच्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना पाठिंबा देताना दिसत नाहीत. वास्तवातील परशा आणि आर्ची आजही जातिव्यवस्थेचा बळी ठरत आहेत. अशा पद्धतीने हजारो प्रकरणे देशात घडत असतील, मात्र यातील काहीच प्रकरणांची पोलिसांत नोंद होते. मात्र, अशी अनेक प्रकरणे असतील ज्यांची सरकार दरबारी नोंदच होत नाही. त्यामुळे यातली तीव्रता आणि अमानुषता किती भयंकर आहे, हे लक्षात येऊ शकेल. तेलंगणा येथे घडलेले ऑनर किलिंग हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. 

‘जाती तोडा-माणूस जोडा’ असे म्हणून काही लोक प्रगतशील विचार मांडताना दिसतात. काही लोक जातिमुक्तीसाठी आंदोलने करतात. चळवळी करतात. त्यातून प्रबोधन करतात. मात्र, आजही समाजातील काही लोक बुरसटलेल्या रुढी-परंपरा आणि कल्पनांना कवटाळताना दिसतात. जात्याभिमान जपताना दिसतात. जातीला चिकटून सोवळं पाळणाºया अशा महाभागांना जातीनिर्मूलनासाठी काम करणाºया माणसांचा विचार पचत नाही. किंवा ते त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात, असे दिसते. भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र, खोट्या प्रतिष्ठेसाठी रक्ताच्या नात्यातील माणसांचा खून करायला देखील हे कोत्या मानसीकतेचे लोक कायद्यालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. 

कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे, हे कुणाच्या हातात नाही. तरीदेखील ज्या चातुवर्ण्य व्यवस्थेला आधार मानून माणसांचे शोषण केले जात आहे. हे शोषण आणि छळवणूक करणारे लोक कधीतरी स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत, हे मान्य करणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. आम्ही जात वगैरे काही मानत नाही, असे साळसूदपणाचा आव आणून सांगणारे लोक स्वत:च्या मुलाला किंवा मुलीला आंतरजातीय विवाह करायचा असल्यास त्यांना मान्यता देत नाहीत. जात आडवी येते. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कुंटुंबांमध्ये प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह या विषयी चर्चा होतात. त्यांना पाठिंबा दिला जातो. हे प्रमाण एव्हाना वाढायला हवे होते. मात्र, तरुण-तरुणीला त्यांच्या मनमर्जीप्रमाणे जगण्याचा, आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा देखील अधिकार दिला जात नाही, हे अतिशय अमानवीय आहे. 

भारत हा एकमेव असा देश आहे, ज्या देशात केवळ जात बघून व्यवहार ठरतो. हजारो वर्षांपूर्वीपासून आजतागायत जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था अस्तित्वात राहिलेल्या आहेत. जातिव्यवस्था विकासाच्या प्रवाहातील अडथळा आहे. त्यामुळे गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अनेकांनी जातिव्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजही जातिव्यवस्था कायम आहे.  जातिव्यवस्था हा  जर दलित, आदिवासी, कष्टकरी जनतेच्या विकासातील अडसर असेल तर तिच्या उच्चाटनासाठी जातिअंताची चळवळ सर्व शोषित समाजाला एकत्र घेऊन लढावी लागेल, याची जाणीव असलेली काही प्रमुख मंडळी यानिमित्ताने एकत्र आलेली आहेत. मात्र, जातिव्यवस्थेने इथल्या प्रत्येकाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि उत्पादन संबंधातले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.

२१ व्या शतकात जातीव्यवस्थेने आपल्या स्वरूपात बदल करवून घेतल्याने जातीव्यवस्थेचे अवशेष उघडपणे पाहायला मिळत नाहीत. मात्र, दृश्य-अदृश्य स्वरूपात जातिव्यवस्था तीव्र स्वरुप धारण करत आहे. गरीब लोक, खालच्या जातीतील लोक चारचाकी गाडीतून फिरतात. बंगल्यात राहतात, हेही काही लोकांना अजूनही पचत नाही. गौतम बुद्ध आणि तत्कालीन बौद्ध धम्माने जातिव्यवस्थेच्या अंताची पहिली मांडणी केली आहे. उगवत्या जातिव्यवस्थेच्या काळापासून सुरू झालेला हा संघर्ष सहाव्या-सातव्या शतकापर्यंत बौद्ध भिक्खूंचे सार्वत्रिक शिरकाण होईपर्यंत सुरू राहिल्याचे इतिहासात दिसते. ज्ञानावर मूठभरांची बंदिस्त मक्तेदारी व वर्ण-जाती विषमतेच्या ब्राम्हण्यवादी संस्कृतीविरुद्ध सर्वांना ज्ञानाची दारे मोकळी करून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही समतावादी विचार मांडणारी श्रमणसंस्कृती यांचा संघर्ष दक्षिण आशियाई उपखंडात हजारो वर्षांपासून सुरू आहे.

एकीकडे जातिव्यवस्थेचा प्रश्न असताना पितृसत्ताक व्यवस्थेत महिलांना दुर्लक्षितच ठरविण्यात आल्याचे दिसते. पितृसत्ताक जातीव्यवस्थेने सर्व जात-वर्गांतील स्त्रियांच्या वाट्याला हीन वागणूक दिली आहे. सर्वांत जास्त हिंसाही स्त्रियांच्याच वाट्याला आली आहे. त्यामुळे स्त्रियांचे दुहेरी शोषण होते. या भयानक परिस्थितीमुळेच भारतातील जातीव्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. जातीपद्धती केवळ श्रमाचे विभाजन नाही, तर ते श्रमिकांचेही विभाजन आहे, असे सांगून बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला आहे. तरी देखील जातव्यवस्था समूळ नष्ट झालेली नसल्याने मागास जातींचा तिरस्कार करणे, अवहेलना करणे त्यांना अपमानित करणे हे प्रकार आजही सर्रास घडतात. त्यासाठी गुजरातमधील उणा प्रकरण ताजे आहे. त्याआधी महाराष्ट्रात घडलेले खैरलांजी हत्याकांड असेल, अथवा खर्डा, जवखेडा, सोनईचे हत्याकांड असेल, जातीव्यवस्थेचे बळी ठरलेले लोक आजही आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील, इतके भयानक वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलीने दलित तरुणाशी विवाह केला म्हणून तेलंगणामध्ये दलित तरुणाची हत्या करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी एक कोटीची सुपारी दिली. यावरून जात किती मॅटर करते, हे स्पष्ट होते. ज्या मुलीच्या पतीची हत्या करण्यात आली आहे, त्या मुलीने जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. ‘देश बढ रहा है,’ अशा वल्गना केल्या जात आहेत. मात्र, याच देशात अमानुषपणे माणसे मारली जात आहे. कधी गोमांस बाळगल्या संशय, कधी घोड्यावर बसला म्हणून, कधी मिशी ठेवली म्हणून, तर कधी मुलं पळवणारे म्हणून जमावाकडून होणाऱ्या हत्या हे देश अधोगतीकडे जात आहे, याचे प्रतिक आहे. हे कधीतरी डोळे उघडे ठेवून बघावे लागणार आहे. कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर माणसे मारून समाज अस्थिर करणाºया संधीसाधू समाजकंटकांना कायद्याचा धाक आहे का नाही, अशी परिस्थिती देशात आहे. कुणी प्रेमविवाह केला म्हणून आपल्या मुलाला किंवा मुलीला अमानुषपणे मारतो, हे किती भयानक आहे. आता तरी जातीचा खोटा अभिमान गंगेत विसर्जित करून प्रत्येकाला माणूस म्हणून फुलू द्यायला हवे. जोपर्यंत आपल्याकडे जातीव्यवस्था आहे, तोपर्यंत देश कधीच महासत्ता बनू शकणार नाही, हे मान्य करून ‘जाती तोडा-माणूस, जोडा’ हा विचार घरोघरी पोहोचवला पाहिजे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाHonor Killingऑनर किलिंग