स्वतःसाठी आवाज उठवणं, आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलणं हा व्यक्ती म्हणून आपला अधिकार आहे. गप्प राहिल्याने आपण फक्त जिवंत राहातो; पण आतून संपलेलो असतो. हे अनुभवाचे बोल आहेत चीनमधील लोकप्रिय अभिनेत्री झाओ लुसी हिचे. चीनमधील चित्रपटसृष्टीत ती रोझी म्हणून ओळखली जाते. २०१७मध्ये अभिनयाला सुरुवात केलेल्या झाओने पुढील तीन-चार वर्षातच आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं.
व्यावसायिक पातळीवर यशाची एकेक पायरी चढत जाणारी झाओ वैयक्तिक पातळीवर मात्र कोलमडून पडत होती. आपल्याला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत ती काम करत राहिली. त्याचा परिणाम म्हणजे २०२४ मध्ये संपूर्ण वर्ष झाओला अभिनयापासून दूर राहावं लागले. २०२५ मध्ये जानेवारीत झाओ दिसली ते थेट व्हीलचेअरवरच. चार पावलं चालण्याचे त्राण हरवून बसलेली झाओ नैराश्याशी लढतेय हे तेव्हा जगाला समजलं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाओने एक व्हिडीओ शेअर केला. त्यात ती तिला झालेल्या त्रासाबद्दल, तिला कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल बोलली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलं, तर काहींनी तिच्यावरच टीका केली. हे सर्व झाओसाठी वेदनादायक असलं तरी आपण आपल्याला जे खुपलं ते बोललो याचं मात्र तिला समाधान वाटत आहे.
झाओने व्हिडीओद्वारे तिला आलेलं नैराश्य आणि तिला करावा लागणारा संघर्ष जगजाहीर केला. नैराश्याच्या काळात तिची टॅलेण्ट एजन्सी तिच्यासोबत कशी क्रूर वागली, त्यातून तिचा आजार कसा बळावला, त्यातून ती कशी बाहेर येतेय याबद्दल झाओ मोकळेपणानं बोलली. तियानजिन गॅलेक्सी कुल एंटरटेनमेंट कल्चर मीडिया को.लि. या एजन्सीद्वारे झाओने चीनच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावलं. पण याच एजन्सीने झाओचं पावलोपावली खच्चीकरण केलं. २०१९ मध्ये एका ऑडिशनमध्ये झाओ अपयशी ठरली. त्यावरून ५५ किलो वजन असलेल्या झाओला 'तू जाड आहेस, आघाडीची नायिका म्हणून काम करण्याची तुझी लायकी नाही' असं म्हणत रात्री २ वाजता एजन्सीच्या अधिकाऱ्याने दोन तास तिला फटकारलं. चीनच्या चित्रपटसृष्टीत आघाडीची नायिका बनण्यासाठी तरुण, बारीक आणि रंगाने गोरं असणं अनिवार्य आहे.
अभिनयात चुणूक दाखवूनही झाओला बॉडी शेमिंगचा सामना सतत करावा लागला. चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी एजन्सी तिच्यावर सतत मानसिक दडपण टाकत होती. तिला मुख्य नायिकेची भूमिका मिळवण्यात अडचणी निर्माण करत होती. हळूहळू तिला नैराश्याची लक्षणं जाणवू लागली. भीती, उदासीनतेने तिच्या मनाचा ताबा घेतला. पण अधिकाऱ्यांनी तिला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याऐवजी तिला हॉटेलच्या खोलीत बंदिस्त केलं. एका तांत्रिकाला बोलवून जादूटोण्याचे उपचार तिच्यावर केले. या सर्वामुळे झाओ मानसिकरीत्या उद्ध्वस्त झाली. तिचं वजन अवघं ३६ किलो झालं. झाओच्या पालकांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. एक वर्ष अभिनयापासून दूर राहिलेल्या झाओने आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल नुकतीच पहिल्यांदा वाच्यता केली; पण त्याचीही 'शिक्षा' तिला भोगावी लागतेय..