परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या घरात, मनात सध्या काय चालू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 04:52 IST2026-01-08T04:52:09+5:302026-01-08T04:52:09+5:30

जगभरात राहणारी मराठी माणसे काय अनुभवतात? हे परदेशस्थ आप्त नवी संकटे आणि नव्या संधी यांचा तोल कसा साधतात, याचा शोध घेणारा साप्ताहिक स्तंभ

what is currently going on in the homes and minds of Indians living abroad | परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या घरात, मनात सध्या काय चालू आहे?

परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या घरात, मनात सध्या काय चालू आहे?

‘अमुकतमुक हे उच्च शिक्षणासाठी परदेशी रवाना’, असे बातमीचे शीर्षक आणि सोबत गळ्यात घातलेल्या हारांच्या भाराने दबून गेलेल्या बावरलेल्या उत्साही चेहऱ्याचा एक फोटो, असे सारे वर्तमानपत्रात छापून येत असे, ते दिवस आता कितीतरी मागे गेले. 

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून किंवा कर्ज काढून परदेशी जाणे, नोकरीच्या शोधात परदेशी जाऊन पुढे तिथेच स्थिरावणे, लग्न करून विदेशस्थ नवऱ्याच्या सोबतीने संसार थाटायला देशाचा उंबरठा ओलांडून जाणे हे सारे टप्पे मराठी मध्यमवर्गाने कधीच पार केले. आता परदेशी जाण्यात फार नवलाई उरलेली नाही, तिथे एकदा पाय रुजले की, तिथेच स्थिरावण्यातही फार अपूर्वाई वाटेनाशी झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे असे स्थलांतर करणाऱ्या आधीच्या पिढ्यांनी विदेशी भूमीत सोसलेला सक्तीचा एकटेपणा आता पूर्वीइतका टोचत नाही.
कारण?- अर्थातच टेक्नॉलॉजी.  

भारतात राहिलेले आई-वडील-भावंडे हल्ली सदासर्वकाळ रोज व्हिडीओ कॉलवर दिसतात-बोलतात. पूर्वी ‘स्वदेशातल्या जीवलगांशी संपर्क करता येत नाही’,  हे परदेशस्थ काळजातले दुःख होते, आता ते चित्र पार उलटेपालटे होऊन अतीसंपर्क ही अनेकांसाठी अडचण होऊन बसली आहे. आपल्या ओळखीच्या चवीचे अन्न मिळत नाही, ओळखीची गाणी ऐकता येत नाहीत, सिनेमा-नाटके पाहता येत नाहीत, असे सारे वाट्याला आलेले पूर्वीचे परदेशस्थ लोक ‘माझिये जातीचा मज भेटो कोणी’, अशी आस धरून असत. तेही आता उरले नाही. 

चितळ्यांच्या बाकरवडीपासून मालवणी मसाल्यापर्यंत आणि भेळ-पाणीपुरीपासून उकडीच्या मोदकांपर्यंत सगळे युरोप-अमेरिकेत जगभरात बहुतेक ठिकाणी मिळते. महाराष्ट्र मंडळात नाटके होतात, सिनेमे आणि गाणी तर काय हातातच आली आहेत, आता मोबाइलच्या स्क्रीनमधून. नकाशावरली अंतरे कायम असली, तरी टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक जुन्या रेषा पुसल्या गेल्या. विदेशात जाणे-राहणे यातले मानसिक ताण हलके झाले. परक्या भूमीवर ‘आपल्या माणसां’ची सोबत सहज मिळू लागली. पण म्हणून सारे प्रश्न सुटले आहेत का? - नाही. 

बदलत्या काळाने बदलत्या संधी दिल्या, जुन्या गाठी सोडवल्या, तसे नवे प्रश्नही परदेशस्थ भारतीयांच्या पदरी घातले आहेत. जगभरातले राजकीय अस्थैर्य हा भारतीय स्थलांतरितांच्या नव्या पिढ्यांसाठी गुंतागुंतीचा विषय होऊन बसला आहे. वर्क-व्हिसा, ‘ग्रीनकार्ड’सारखे दीर्घकालीन वास्तव्याचे परवाने आणि सिटिझनशिपच्या जुन्या रुळलेल्या चाकोऱ्या गेल्या वर्षभरात वेगाने मोडून पडल्या आणि आठ-दहा वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानंतरही अनेक कुटुंबांचा पाया मुळापासून हादरला; त्याचे धक्के भारतातली अनेक मध्यमवर्गीय घरे सोसत आहेत. जे अमेरिकेत घडते आहे, त्याची चाहूल अन्य देशातल्या स्थलांतरितांनाही लागते आहेच. 

एकूणातच जग जितके जवळ आले, तितकेच दुरावताना दिसत आहे. अशा वातावरणात परदेशी वास्तव्यातल्या अनुभवांचा रंग बदलताना दिसतो का?, तिथे राहण्यातली सुख-दु:खे काय, कशी असतात? जगभरात राहणारी मराठी माणसे काय अनुभवतात?, काय विचार करतात? नवी संकटे आणि नव्या संधी यांचा तोल कसा साधतात?, हे त्यांच्याकडूनच समजून घेण्यासाठी आजपासून दर गुरुवारी ही खास जागा.
 

Web Title: what is currently going on in the homes and minds of Indians living abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.