‘अर-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:25 IST2025-10-11T07:25:12+5:302025-10-11T07:25:24+5:30
झोहो या भारतीय कंपनीने व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून तयार केलेलं ॲप वापरायला सोपं आहे; पण ते स्वीकारलं जाईल?

‘अर-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल?
-प्रसाद शिरगावकर, मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचे
प्रशिक्षक आणि वक्ते
अर्-ट्टाय (Arattai) नावाचं मेसेजिंग ॲप सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे. झोहो नावाच्या भारतीय कंपनीने व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून हे ॲप तयार केलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोनच आठवड्यांपूर्वी देशातील जनतेला स्वदेशी ॲप्सचा वापर करायचं आवाहन करताना अर्-ट्टाय ॲपचा उल्लेख केल्यामुळे अर्-ट्टायविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण होऊन लाखो लोकांनी ते डाउनलोड केलं. व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ॲप. भारत ही व्हॉट्सॲपसाठीची जगातली सर्वांत मोठी बाजारपेठ. भारतात व्हॉट्सॲपचे पन्नास कोटी वापरकर्ते आहेत. व्हॉट्सॲप हे भारतीयांच्या आयुष्याचं अविभाज्य अंग बनलं आहे.
व्हॉट्सॲप हे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्यांच्या मालकीचे आहेत अशा ‘मेटा’ या अमेरिकन कंपनीच्या मालकीचं आहे. वापरकर्त्यांच्या वावराचा सर्व डेटा स्वतः वापरण्याचे आणि तो पार्टनर कंपन्यांना वापरू देण्याचे हक्क व्हॉट्सॲपने स्वतःकडे ठेवले आहेत. या डेटाचा वापर आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टार्गेटेड जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. इतर कंपन्यांना हा डेटा कशा प्रकारे उपलब्ध केला जातो याविषयी कसलीही पारदर्शकता नाही. व्हॉट्सॲपच्या वापराचा आपल्याला कधीही न दिसलेला हा सगळ्यात मोठा धोका आहे.
त्यावर मात करण्याकरिता झोहो या भारतीय कंपनीने अर्-ट्टाय हे मेसेजिंग ॲप तयार केलं. अर्-ट्टाय हा तमिळ शब्द आहे, त्याचा अर्थ होतो गप्पा! झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर बेंबू म्हणतात, भारतीयांसाठी भारतीय भाषांमध्ये व्यवस्थित चालेल असं हे मेसेंजर ॲप आहे. या ॲपच्या वापरकर्त्यांचा डेटा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जाहिरातीसाठी व अन्य कारणांसाठी वापरणार नाही.
अर्-ट्टाय ॲपमध्ये व्हॉट्सॲपमध्ये असलेल्या सर्व सुविधा, म्हणजे टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडीओ मेसेजेस, कॉल्स, स्टेटस अपडेट, ब्रॉडकास्ट लिस्ट्स, ग्रुप्स, चॅनल्स इत्यादी आहेतच. त्याचबरोबर, दोन लक्षणीय अशा सुविधाही आहेत. त्यातली एक म्हणजे पाकीट नावाची सुविधा. या सुविधेनुसार आपण आपल्याला हव्या त्या फाइल्स किंवा मेसेजेस अर्-ट्टायच्या पाकीट विभागात साठवून ठेवू शकतो. या गोष्टी अर्-ट्टायच्या क्लाउडवर सुरक्षित राहतात. दुसरी लक्षणीय सुविधा म्हणजे ‘मीटिंग्ज’. या सुविधेनुसार आपण वन-टू-वन किंवा ग्रुपबरोबरच्या मीटिंग्जचं अर्-ट्टाय ॲपमधूनच नियोजन करू शकतो आणि प्रत्यक्ष मीटिंगदेखील अर्-ट्टाय ॲपमधूनच घेता येऊ शकते. म्हणजे हे काहीसं गुगल मीट किंवा झूम यांच्यासारखं फीचर आहे.
गेल्या तीन-चार आठवड्यांमध्ये अर्-ट्टायचे सुमारे पन्नास लाख डाउनलोड झाले आहेत. अर्-ट्टायबद्दल वापरकर्त्या लोकांच्या बऱ्यावाईट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बहुसंख्य लोकांना हे वापरायला खूप सोपं वाटतं. पॉकेट आणि मीटिंगसारख्या नव्या सुविधांचं लोक स्वागत करत आहेत. मात्र ‘हे ॲप वारंवार क्रॅश होतं’ अशी अनेकांची तक्रार आहे. सगळ्यांत मोठी तक्रार टेक्स्ट मेसेजेसना Encryption नसणे ह्याबद्दल आहे. अर्-ट्टायमध्ये सध्या ऑडिओ आणि व्हिडीओ मेसेजेस इंक्रिप्टेड आहेत, मात्र टेक्स्ट मेसेजेस मात्र इंक्रिप्टेड केलेले नसतात. वापरकर्त्यांना हे अत्यंत धोक्याचं वाटतं. असे मेसेजेस झोहो कंपनीला वाचता येणं आणि त्याचा गैरवापर होणं हे शक्य आहे. त्यामुळे encryption असल्याशिवाय अर्-ट्टाय वापरण्याला अनेक तज्ज्ञांचा विरोध आहे. ‘या फीचरवर आम्ही काम करत आहोत आणि लवकरच ते ॲपमध्ये उपलब्ध होईल’, असं झोहो कंपनीचं म्हणणं आहे.
इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सच्या विश्वात सध्या व्हॉट्सॲप, वुईचॅट, टेलिग्राम, सिग्नल, डिस्कॉर्ड, स्नॅपचॅट ही आघाडीची ॲप्स आहेत. जगभरात शेकडो कोटी लोक ही ॲप्स वापरतात. व्हॉट्सॲपचे सध्या जगभरात तीन अब्ज वापरकर्ते आहेत, तर वुई चॅटचे सव्वा ते दीड अब्ज! या तूलनेत अर्-ट्टायचे पन्नास लाख युजर्स नगण्य आहेत. सर्व आघाडीच्या ॲप्सना टक्कर देऊन स्वतःचं नवं स्थान निर्माण करणं हे अर्-ट्टायसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कोणतीही व्यक्ती नियमितपणे वापरत असलेलं मेसेजिंग ॲप तिच्या रोजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेलं असतं. ते ॲप सोडून नव्या ॲपवर जायचं तर आपले काँटॅक्ट्स आणि ग्रुप्स तिथे असावे लागतात. शिवाय, जुनं सोडून नवं मेसेजिंग ॲप वापरायचं तर त्यासाठी अत्यंत प्रबळ कारण असावं लागतं. अर्-ट्टाय हे स्वदेशी आहे, आपल्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर करणार नाही असं त्यांनी वचन दिलं आहे आणि इतर मेसेजिंग ॲपमध्ये नसलेल्या एक-दोन अधिकच्या सुविधा त्यात आहेत या तीन गोष्टी, आपलं रोजच्या सवयीचं मेसेजिंग ॲप सोडून अर्-ट्टाय वापरण्यासाठीची प्रबळ कारणं लोकांना वाटतात का, याचं उत्तर येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल.
prasad@aadii.net