राही श्रु. ग. , सीनिअर रिसर्च फेलोजवाहरलाल नेहरू विद्यापीठ
भारतात मुली मन लावून शिक्षण घेतात. उच्चशिक्षणासाठी त्यांना उत्साह असतो. शिक्षणासाठी अनेकींना कराव्या लागणाऱ्या संघर्षातून वाढलेल्या शिक्षणाच्या गोडीशिवाय यामागं भारतीय मुलींचं एक गुपित आहे. ‘लग्न’ हा ज्या संस्कृतीत प्रत्येकासाठी अनिवार्य मुद्दा आहे, तिथं उच्चशिक्षण ही लग्नाचा आवश्यक राक्षस शक्य तितका लांबवण्यासाठीची सोपी युक्ती आहे. शिवाय या लग्नाच्या बाजारात वाटाघाटींसाठी मुलींना मिळणारं महत्त्वाचं भांडवल म्हणजे त्यांचं शिक्षण. त्यामुळं बहुतेक लोक उच्चशिक्षणाकडं पुढील आयुष्यातल्या रोजगारासाठीचं भांडवल म्हणून पाहत असले, तरी शिक्षणाचं मोल मुलींसाठी कितीतरी अधिक असतं.
महाविद्यालयं मुलींना स्वतःचा आवाज शोधायची संधी देतात; पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासाठी होस्टेलला राहणाऱ्या अनेकींना पहिल्यांदाच स्वतःसाठी स्वतंत्र वेळ मिळतो. स्वातंत्र्याची ही निरनिराळी रूपं नव्यानं हाती लागलेल्या जेन-झींच्या उच्चशिक्षणामध्ये लॉकडाऊनचा स्पीडब्रेकर आला आणि ‘ब्रेक के बाद’ घरी गेलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणातून ‘पर्मनंट ब्रेक’ ठरला. महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद होण्याचा तब्बल ३२ कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. जसजसे लॉकडाऊनमध्ये महिन्यांमागून महिने जाऊ लागले, तशी बहुतेकांनी शिक्षणासाठी परतण्याची आशा सोडून दिली. अनेक मुलींनी शिक्षणाचा निरोप घेतला आणि या काळात त्यांचा विवाह उरकला गेला. या काळात कितीतरी जणींच्या वाट्याला लगोलग गरोदरपणही आलं.
ग्रामीण भागातील आणि विविध परिघांवरच्या समूहांसाठीही लॉकडाऊन हा पर्मनंट ब्रेक ठरला. वाढलेल्या आर्थिक ओझ्याला तोंड देताना अनेक तरुण शिक्षण सोडून पैसे कमवायला लागले. सुरुवातीचा काही काळ सुरू असलेली होस्टेलं बंद झाली, तसं अनेकांसाठी शिक्षण अशक्य झालं. घर ही प्रत्येकासाठी अभ्यास किंवा कामासाठीची जागा असू शकत नाही. कमी जागा आणि इतर अडचणींमुळं अनेकांना एरवीही ‘वर्क फ्रॉम होम’ अवघड असतं. लॉकडाऊन काळात शिक्षण ‘डिजिटल’ झाल्यावर यातल्या अडचणी आणखी वाढल्या. घरात एखादा स्मार्टफोन असला तरी त्यावर अधिकार मुख्यतः कमावत्या पुरुषांचा होता. अनेक मुलं, मुली असलेल्या घरांमध्ये एखाद दुसरा फोन असताना डिजिटल शिक्षणाची संधीच नव्हती.
ज्यांच्याकडं डिजिटल शिक्षणासाठी सोयी उपलब्ध होत्या, त्यांनादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. इंटरनेट कमीअधिक असणं, रेंज जाणं, वीज नसणं याचा सामना करावा लागला. शिकण्या- शिकवण्याच्या अनेक पद्धती या काळात कुचकामी ठरल्या. वर्गात शिकवण्याची सवय असलेल्या शिक्षकांनादेखील या माध्यमातील शिक्षणाशी जुळवून घेण्यासाठी बरेच कष्ट पडले. या काळात विद्यार्थी- शिक्षक यांच्या नात्यातील वाढलेल्या ताणांचे परिणाम आजही दिसत आहेत. ज्यांना ऑनलाइन शिक्षणाची सवय झाली अशा कितीतरी जेन झी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात एकाग्रतेने ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम झाला.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक शिक्षणाचं वेगानं खासगीकरण होण्यात लॉकडाऊनचा मोठा हातभार लागला. शिक्षणाची गुणवत्ता आणि सर्वांसाठीची उपलब्धता वेगानं कमी झाली. मोफत, सक्तीचं आणि सर्वांसाठीचं शिक्षण आता लॉकडाऊनच्या ब्रेकनंतर वेगानं आक्रसतं आहे. ते प्रत्येकाच्या वाट्याला असेलच अशी शाश्वती नाही. या बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन जेन झींच्या आयुष्यातल्या पुढच्या टप्प्यांचा विचार करावा लागेल. raheeshrutiganesh@gmail.com
Web Summary : The COVID-19 lockdown disrupted education, especially for girls and marginalized groups. Many faced permanent breaks, early marriages, and financial hardships. Digital divide, strained teacher-student relations, and privatization further impacted learning outcomes, demanding attention to Gen Z's future.
Web Summary : कोविड-19 लॉकडाउन ने शिक्षा में बाधा डाली, खासकर लड़कियों और हाशिए के समूहों के लिए। कई लोगों को स्थायी विराम, जल्दी विवाह और वित्तीय कठिनाइयों का सामना करना पड़ा। डिजिटल विभाजन, तनावपूर्ण शिक्षक-छात्र संबंध और निजीकरण ने सीखने के परिणामों को और प्रभावित किया, जिससे जेन जेड के भविष्य पर ध्यान देने की आवश्यकता है।