१४ ते २९ या वयोगटातल्या ‘झूमर्स’ भारतीयांचं म्हणणं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:17 IST2026-01-05T05:17:39+5:302026-01-05T05:17:39+5:30

भारतातल्या ‘जेन झी’ची गुणवैशिष्ट्यं, त्यांची स्वप्नं, समस्या, वर्तन आणि प्राधान्यक्रमांचा शोध घेणाऱ्या नव्या साप्ताहिक स्तंभाचा प्रारंभ.

what do Indian zoomers aged 14 to 29 have to say | १४ ते २९ या वयोगटातल्या ‘झूमर्स’ भारतीयांचं म्हणणं काय आहे?

१४ ते २९ या वयोगटातल्या ‘झूमर्स’ भारतीयांचं म्हणणं काय आहे?

राही श्रु. ग., सीनिअर रिसर्च फेलो, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

प्रत्येक काळातल्या विशिष्ट घटनांचा गुंता इतका गहिरा असतो की अमुक एका गोष्टीमुळे तमुक घटना घडली, असं सरळ समीकरण मांडता येत नाही. इतिहासातल्या हजारो घटना, व्यवस्था आणि व्यक्तींमुळे प्रत्येक पिढी घडत असते. प्रत्येक पिढीला आपल्या आणि आपल्या आगल्यामागल्या पिढ्यांबद्दल आदर, अभिमान, राग, निराशा, कुतूहल, अपेक्षा अशा कितीतरी भावना असतात. शतकानुशतकं ज्येष्ठ मंडळी ‘तरुणांसाठी सगळं किती सोपं आहे; नाहीतर आमच्या काळी...’ असं म्हणत असतात... आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘आपल्या जुन्या जाणत्या माणसांना एवढं साधं कसं कळत नाही?’ असा वैताग तरुणांना येत राहतो.

या साऱ्यापलीकडे प्रत्येक पिढीला घडवणारी अर्थव्यवस्था, समाज, राजकारण काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं.  एखादी पिढी कशी विचार करते, तिच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम कोणते आणि का, या प्रश्नांची उत्तरं शोधताना खरी नाडी हाती लागते. 

गेल्या काही दशकांत, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक पिढीच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास सुरू झाला. तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि पत्रकारांनी याविषयी भाष्य करायला सुरुवात केली. लोकांनीही त्यामध्ये बराच रस घेतला. बेबी बूमर्स, जेन एक्स, जेन वाय/ मिलेनियल्स, जेन झेड/ झूमर्स आणि आता जेन अल्फा आणि जेन बीटा हे वर्गीकरण लोकांमध्ये बरंच लोकप्रिय झालं. 

या पिढ्यांपैकी ‘जेन झी’ही आजची तरुण पिढी. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेले सर्व या जेन झी मध्ये येतात. २०२६ मध्ये सर्वांत लहान जेन झी मुलंमुली १४ वर्षांचे होतील, तर सर्वांत मोठे जेन झी हे २९ वर्षांचे. या वयोगटाचं प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या एक पंचमांशापेक्षा जास्त आहे. भारतात तर हे प्रमाण ४० टक्क्यांच्या पुढे आहे. जवळपास निम्मी लोकसंख्या या वयोगटात असलेल्या आपल्या देशात मात्र ‘पिढी’ म्हणून या वयोगटाचा म्हणावा तेवढा अभ्यास झालेला नाही.  

ग्राहक किंवा मतदार म्हणून या पिढीचं वर्तन समजून घेण्यासाठी उद्योगविश्व आणि राजकारणी वारेमाप पैसा खर्च करत आहेत, मात्र इथल्या अर्थव्यवस्थेचं ओझं वाहणारे कामगार, नागरिक आणि माणूस म्हणून त्यांना समजून घेण्यासाठी फारसं काम होताना दिसत नाही. गेल्या एक-दोन वर्षांत बांगलादेश आणि नेपाळमधल्या जेन झींच्या व्यापक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आशियात पहिल्यांदाच या पिढीविषयी गांभीर्याने अभ्यास सुरू झाला.

मुळात पिढ्यांचं हे वर्गीकरण पाश्चात्य समाजांच्या संदर्भात उदयाला आलेलं. अर्थातच ते नैसर्गिक नाही. एका ‘जनरेशन’मधल्या काही जणांचं आधीच्या आणि काहींचं नंतरच्या पिढीशी जास्त जवळचं नातं असतं. १४ ते २९ हा वयोगटाचा पटही खूप मोठा आहे.  

हे पाश्चात्य  वर्गीकरण भारतात जसंच्या तसं लागू करून एखाद्या पिढीची सरसकट गुणवैशिष्ट्यं ठरवणंही अशक्य. अनेकदा अशा गुणवैशिष्ट्यांबद्दल बोलताना केवळ मोजक्या श्रीमंत, वर्चस्ववादी समूहांबद्दल बोललं जातं. प्रत्यक्षात, भारतातले बहुसंख्य ‘जेन झी’ हे खेड्यांमध्ये राहणारे, मोलमजुरी करणारे, अस्थिर परिस्थितीतले आहेत. ते शाळा- कॉलेज - विद्यापीठात जातात, नोकऱ्या करतात. त्यातल्या अनेकांची लग्नं झाली आहेत, ते आता पालकही आहेत.  इतकी विविधता आणि विषमता असलेल्या समूहाला एका रंगात कसं रंगवता येईल?

- तरीही त्यांची गुणवैशिष्ट्यं, त्यांच्या समस्या आणि स्वप्नं समजून घेतल्याशिवाय उद्याच्याच काय, आजच्या समाजाचीही कल्पना येणं अशक्य आहे. ‘मिलेनियल’ आणि ‘जेन झी’ यांच्या दरम्यानच्या उंबरठ्यावरून मी या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा या वर्षात प्रयत्न करणार आहे.  
    raheeshrutiganesh@gmail.com
 

Web Title: what do Indian zoomers aged 14 to 29 have to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.