शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आजचा अग्रलेख: उजेडाच्या पावलांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 08:02 IST

नागपूरजवळच्या बनवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कृतिशील पाऊल उचलले. 

आधी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड आणि पाठोपाठ जिथे राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी ऐतिहासिक अस्पृश्य परिषदेत एकमेकांच्या महत्तेचा गौरव केला, त्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने विधवा प्रथांना मूठमाती देण्याचा ठराव घेतला. विधवांच्या पदरात प्रतिष्ठेचे, सन्मानाचे जगणे टाकणारे असे निर्णय सगळ्याच ग्रामपंचायतींनी घ्यावेत, असे आवाहन राज्य सरकारने केले. नागपूरजवळच्या बनवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कृतिशील पाऊल उचलले. 

पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र किंवा काळ्या मण्यांची पोत तोडणे, कुंकू पुसणे, हातातल्या बांगड्या फोडणे हा प्रकार प्रत्यक्ष अंत्यसंस्कारावेळी थांबविला. स्त्रियांच्या वाटेवर आपल्या समाजाने जो युगानुयुगे सारा अंधार पसरवला आहे, त्याचा विचार करता या गावांनी उजेडाच्या दिशेने टाकलेली पावले आहेत. काहीही दोष नसताना केवळ निसर्गनियमाने, अपघाताने ज्यांच्या आयुष्यात वैधव्य येते, अशा महिलांना नंतर स्वत:चे असे काही आयुष्य उरतच नाही. कधी काळी त्यांनी केशवपन करावे, पांढरी साडीच नेसावी, पाहुण्यारावळ्यांपुढे जाऊ नये, घराच्या अंधारल्या कोनाड्यात बसून राहावे, असे निर्बंध होते. महात्मा ज्योतीराव फुले व इतरांनी अगदी नाभिकांचा संप घडवून केशवपन प्रथा बंद पाडली. विधवांचे शारीरिक शोषण हा आणखी वेगळा प्रश्न होता. गर्भवती विधवा व त्यांच्या मुलांसाठी आश्रम काढून सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांनी क्रांतीची आणखी एक मेढ रोवली. त्यानंतर केसाला तेल नाही, कंगवा नाही, साजशृंगार नाही, अशी पुढची बंधने विधवांवर आली. ती थोडी सैल झाली तर पतीच्या अंत्यसंस्कारावेळीच सौभाग्याची चिन्हे म्हणून अंगावर जे अलंकार असतील ते उतरविण्याचे कर्मकांड सुरू झाले.  

समाजसुधारकांनी व त्यांच्या अनुयायांनी अशा प्रत्येक निर्बंधाविरुद्ध आवाज उठविला. परिवर्तनाच्या वाटेवर एकेक पाऊल टाकले गेले. या सुधारणांचा संबंध माणूस म्हणून विधवांच्या अप्रतिष्ठेशी आहे. पतीचा मृत्यू हा पत्नीचा दोष नसतोच. तेव्हा त्यांचा सन्मान राखला जावा. इतर महिलांसारखेच त्यांनाही प्रतिष्ठेने जगता यावे, यासाठी अशा विचारांची, त्यावर कृतीची नितांत गरज होती, आहे व स्त्री-पुरुष समानतेचा विचार करता पुढेही राहील. भारतीय समाजाला स्त्री केंद्रबिंदू असलेल्या सामाजिक सुधारणांचा किमान दोनशे वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. राजकीय दृष्टीने आपण राष्ट्र म्हणून उभे राहिलो ते या सामाजिक उत्थानाच्या बळावरच. राजा राम मोहन रॉय यांची रविवारी अडीचशेवी जयंती आहे. त्यांनी सतीप्रथेविरुद्ध मोहीम उघडली होती.. ती प्रथा थांबली तेव्हा मरण टळलेल्या विधवांचे काय करायचे म्हणून बंगालमध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाहाला मान्यतेसाठी प्रयत्न केले. 

डॉ. रखमाबाई राऊत, पंडिता रमाबाईंनी बालविवाहांविरुद्ध आवाज उठविला. सामाजिक बंधनांच्या, पारतंत्र्याच्या बेड्या निखळून पडल्या,  मुली-महिलांना कर्तृत्वाचे आभाळ खुले झाले, पंखांमध्ये आत्मविश्वासाचे बळ भरले गेले. सामाजिक क्रांतीच्या अशा एकेक ठिपक्यांची माळ झाली. ती माळ आता सर्वच क्षेत्रांमधील कर्तबगार महिलांच्या गळ्यात शोभते आहे. आता आपण एकविसाव्या शतकात, अतिप्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. तरीदेखील गावोगावी वैधव्यावर अप्रतिष्ठेचा डाग असावा, हे काही प्रगत समाजाचे लक्षण नाही. काही समंजस मुलेमुलीच वडिलांच्या निधनानंतरही आईची प्रतिष्ठा जपतात. काही कार्यकर्ते विधवांनाही सवाष्णींसोबत बोलावतात, साडीचोळी देतात, हळदी-कुंकवाचा मान देतात. तथापि, ही रीत बनत नाही. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी १८५५ मध्ये विधवा विवाहांना मान्यता देण्यासाठी ब्रिटिश सरकारसमोर दाखल केलेल्या याचिकेवर जनमत चाचणी झाली होती. अनुकूल एका मताला प्रतिकूल बारा मते, असा तिचा कल होता. त्यावर याचिकेचे विधेयकात रूपांतर करणारे जे. पी. ग्रांट म्हणाले होते, ‘विधवा विवाह हवे म्हणणारी सुधारणेच्या बाजूने पाच हजार मते हेच खरे जनमत आहे. कारण, त्या प्रत्येकाला कुटुंबात सौख्य हवे आहे, अधिक चांगले जगण्याची इच्छा आहे. प्रत्येक मतामागे शंभर जणांची तीच भावना असेल. सुधारणा नको म्हणणाऱ्यांबाबत मात्र खात्रीने तसे म्हणता येणार नाही.’ बहुसंख्य म्हणतील तेच सत्य समजण्याच्या दिवसांत चांगली गोष्ट ही, की आता सुधारणांची भावना अल्पमतात नाही. हेरवाड, माणगाव किंवा बनवाडीसारख्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावांनी घेतलेले निर्णय हेच सांगतात. त्यांचे खुल्या दिलाने स्वागत करू या!

टॅग्स :State Governmentराज्य सरकार