श्रद्धा अन् सबुरीचे फळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:19 IST2025-03-18T09:17:44+5:302025-03-18T09:19:18+5:30
माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते.

श्रद्धा अन् सबुरीचे फळ
विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्टच आहे. भाजपचे तीन, शिंदेसेनेचे एक आणि अजित पवार गटाचे एक असे पाच जण ज्येष्ठांच्या सभागृहात जातील. माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना भाजपने दिलेली संधी ही निष्ठेचे फळ म्हटले पाहिजे. केचे यांनी आर्वी मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकविलेच होते आणि त्यांच्या बंडाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती सुमित वानखेडे अडचणीत आले असते हे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑपरेशन केले.
केचेंना विशेष विमानात टाकले आणि थेट अहमदाबादेत नेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर उभे करून बंडापासून रोखले. त्याचवेळी केचेंना आमदारकीचा शब्द दिला आणि तो पाळला देखील. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील, समरजित घाडगे यांनी भाजपमध्ये बंड केले आणि महायुतीच्या विरोधात लढून हरले. त्यांच्यापेक्षा केचे शहाणे निघाले म्हणायचे. संदीप जोशी हे संघाचे स्वयंसेवक, त्यांचे वडील विधानपरिषदेचे आमदार होते. ते स्वत: नागपूरचे महापाैर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती. नागपुरात फडणवीसांच्या जवळचे असलेल्यांना या ना त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांत संधी मिळाली; काहींना तर ती जरा जास्तच मिळाली; पण संदीप हे आमदारकीपासून वंचित होते; आता त्यांना चौदा महिन्यांची का होईना; पण आमदारकी मिळाली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या इतक्या वर्षांच्या पक्षनिष्ठेला अखेर आमदारकीचे फळ मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरसेवक, उपमहापौर, पक्षाचे शहर अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सध्या भाजपअंतर्गत त्यांची ओळख ही फडणवीस यांचे निकटवर्ती अशीच आहे. केणेकर यांना खरेतर आधीच आमदारकी मिळायची; पण संधीने त्यांना हुलकावणी दिली, अखेर ते आता विधानपरिषदेत पोहोचणार आहेत. केणेकर आणि जोशी यांना पक्ष व नेतृत्वनिष्ठेचे बक्षीस मिळाले तर केचे यांना त्यांनी दाखविलेल्या राजकीय समयसूचकतेने विधानपरिषदेची संधी दिली.
अजित पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू संजय खोडके यांना आमदारकी दिली. एकत्रित राष्ट्रवादीत सुरुवातीपासून पक्षाचे म्हणून जे काही ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ असते ते संजय खोडके करत आले आहेत. खरेतर ते अनेक पत्रकारांचे जिवलग मित्र; पण पक्षाचे, नेतृत्वाचे कोणतेही गुपित पत्रकारांना अजिबात कळू न देण्याची खबरदारी त्यांनी नेहमीच घेतली आणि योग्यवेळी नेतृत्वाच्या परवानगीने त्यांनी बातम्याही दिल्या. पत्नीला प्रत्यक्ष राजकारणात उतरवून स्वत: नेहमीच पडद्यामागे राहिले. शरद पवार, छगन भुजबळ, आर.आर.पाटील आणि अजित पवार यांचे ते अत्यंत विश्वासू. पडद्याआड राहून पक्षासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या एका सहकाऱ्याला विधान परिषदेवर पाठविले पाहिजे हे मनाचे मोठेपण अजित पवार यांनी दाखविले आणि संजूभाऊ विधानपरिषदेवर पोहोचले. अमरावतीच्या राजकारणात आता पती-पत्नीची आमदार जोडगोळी हे आधीपेक्षा अधिक प्रभावी सत्ताकेंद्र असेल. एकीकडे खोडके दाम्पत्य, दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि तिसरीकडे भाजप अशा स्थितीत महायुतीतील पक्षांमध्ये कसा सलोखा राहतो यावर अमरावतीचे पुढचे राजकारण अवलंबून असेल. एकनाथ शिंदे यांनी नंदुरबारमधील नेते चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषदेवर पाठविले. रघुवंशी हे मूळ काँग्रेसचे. नंदुरबारच्या राजकारणात त्यांचे आणि डॉ. विजयकुमार गावित यांचे हाडवैर खूप जुने आहे.
जिल्ह्यातील सगळेच विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने रघुवंशी विधानसभेसाठी लढू शकत नाहीत. काँग्रेस सोडून ते शिंदेसेनेत गेले तेव्हापासून त्यांना विधानपरिषदेवर पाठविणार अशा बातम्या वेळोवेळी आल्या; पण शेवटी आज ते विधानपरिषदेच्या बसमध्ये बसले. त्यांना आमदारकी देण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळला. गावित यांच्या परिवारातील कोणीही आता आमदार, खासदार नसताना रघुवंशी यांना आमदारकी मिळणे या परिस्थितीमुळे नंदुरबारच्या राजकारणाचे काही संदर्भ नजीकच्या काळात बदलू शकतील. एकूण पाचही उमेदवारांचा विचार करता राजकारणात श्रद्धा आणि सबुरी किती आवश्यक असते, हेच दिसून येते.