व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो ‘नरकात’ जेरबंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 04:48 IST2026-01-07T04:47:50+5:302026-01-07T04:48:47+5:30
नार्को-टेररिझम, कोकेन तस्करी आणि शस्त्रगुन्हे याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप मादुरो यांच्यावर आहेत.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो ‘नरकात’ जेरबंद!
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं अटक केल्याच्या कारणावरून सध्या जगाचं राजकारण तापलं आहे. ३ जानेवारीच्या पहाटे अमेरिकेनं व्हेनेझुएलाविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली. डेल्टा फोर्सचे सैनिक कडेकोट सुरक्षा असलेल्या फोर्ट ट्युना मिलिट्री कॉम्प्लेक्समध्ये घुसले. मादुरो तसेच त्यांच्या पत्नीला त्यांनी बेडरूममधून अक्षरशः ओढत बाहेर काढलं आणि त्यांना ते देशाबाहेर घेऊन गेले.
नार्को-टेररिझम, कोकेन तस्करी आणि शस्त्रगुन्हे याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप मादुरो यांच्यावर आहेत. मादुरो यांनी २०१३ला सत्ता हातात घेतल्यापासून, त्यांच्यावर आर्थिक संकट, मानवाधिकार उल्लंघन आणि विरोधकांवर दडपशाही केल्याचे आरोप झाले; पण ज्या पद्धतीनं अमेरिकेनं मादुरो यांना पकडलं, त्याविरुद्ध चीन, उत्तर कोरिया यांसारख्या देशांनी अमेरिकेवर कठोर ताशेरे ओढले आहेत.
मादुरो यांच्या अटकेवरून तर जगभरात चर्चा आहेच, पण त्यांना अमेरिकेच्या ज्या तुरुंगात सध्या ठेवण्यात आलं आहे, त्या तुरुंगावरूनही जगभरात आणि सोशल मीडियावर चर्चेचे फड रंगले आहेत.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सध्या अमेरिकेच्या ब्रुकलिनमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये (MDC) ठेवण्यात आलं आहे. हा तुरुंग गुन्हेगारांसाठी अतिशय खतरनाक म्हणून ओळखला जातो. ‘पृथ्वीवरचा नरक’ (हेलहोल) म्हणूनच तो प्रसिद्ध आहे. अनेक बड्या, सेलिब्रिटी आणि नामचिन गुंडांना याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. हा तुरुंग अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त तुरुंगांपैकी एक मानला जातो. संघीय न्यायाधीश आणि मानवाधिकार संघटनांनी इथल्या स्थितीवर नेहमीच तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या तुरुंगातील स्थिती अतिशय अमानवीय आहे. संघीय न्यायाधीशांनी तुरुंगातील परिस्थिती अत्यंत रानटी, क्रूर, निर्दयी आणि धोकादायक असल्याचं स्पष्ट केलं आहे. येथील कैद्यांना अत्यंत कडाक्याच्या थंडीत वीज आणि हीटिंगशिवाय तिथे राहण्यासाठी मजबूर केलं जातं. या तुरुंगात किडे आणि माश्यांनी भरलेलं जेवण मिळण्याच्या गोष्टी तर अत्यंत सामान्य आहेत. येथील कोठड्यांमध्ये कायमच मोठमोठे उंदीर फिरत असतात.
स्वच्छतेच्या अभावामुळे आजार पसरण्याचं, कैदी आजारी पडण्याचं आणि त्यामुळे ते मरणपंथाला लागण्याच्या तक्रारींना तुरुंग प्रशासनानं कायमच कचऱ्याची टोपली दाखवली आहे. हिंसा आणि रक्तपात या गोष्टी येथे आम बात आहेत. मूलभूत वैद्यकीय मदतीसाठीही कैद्यांना अनेक आठवडे वाट पाहावी लागते. या तुरुंगाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे तुरुंग ‘हाय-प्रोफाइल’ कैद्यांचं महत्त्वाचं ठिकाण आहे. सॅम बँकमॅन-फ्राइड, आर. केली आणि घिस्लेन मॅक्सवेलसारखे प्रसिद्ध आणि वादग्रस्त लोकही या तुरुंगात होते. मादुरो यांचं नावही आता या यादीत जोडलं गेलं आहे.
या तुरुंगात अनेक कैद्यांना २४ तास पूर्णपणे एकटं, अंधाऱ्या कोठडीत डांबलं जातं. त्याला स्पेशल हाउसिंग युनिट (SHU) असं म्हटलं जातं. हा तुरुंग तेथील गैरसोयी आणि अमानवीय गोष्टींमुळे तर कुप्रसिद्ध आहेच, अनेक नामचिन गुंडांच्या टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांमध्ये तिथे मारामाऱ्या आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांचे सतत खून पडत असतात. याशिवाय तेथील छळाला कंटाळून आजपर्यंत अनेक कैद्यांनी आत्महत्याही केली आहे.