श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ आता कुठे मंदावलेला असतो. भवतालाने हिरवा शालू ल्यालेला असतो. सृष्टीमध्ये नवे चैतन्य असते. अशावेळी गणरायांचे आगमन होते. जगणे तसे काही सोपे नाही. दुःख कमी नाही. विघ्नाची वार्ता नित्याची. अशावेळी गणरायांचा आधार वाटतो. तो सुखकर्ता, विघ्नहर्ता भासतो. गणपतीचे वैशिष्ट्य असे की, देव असूनही तो मित्र वाटतो. सोबती वाटतो. अगदी चिमुकल्यांनीही ‘माय फ्रेंड गणेशा’ म्हणावं, असं त्याचं रूप. जगभरातल्या चित्रकारांना या रूपाने आकृष्ट केले आहे. गणरायाची रेखाटने करताना कलावंत अगदी मग्न होतात. गणपती ही कलेची देवता. विद्येची देवता. गणेशोत्सव आला की, एक वेगळाच उत्साह संचारतो. परदेशातील मंडळी तेवढ्यासाठी भारतात येतात. मुंबईतले नोकरदार आपल्या कोकणात जातात. लोकशक्तीचा- संस्कृतीचा असा हा विलक्षण उत्सव आहे. गणेशोत्सव आणि मराठी माणूस हे समीकरण एवढे जैव आहे की, जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे तिथे गणेशोत्सव आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय अशा दृष्टीनेही गणेशोत्सवाकडे पाहायला हवे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप मिळाले. स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटवण्यासाठी लोकांनी एकत्र येणे आवश्यक होते. श्रद्धेच्या पायावर ही उभारणी अधिक सहजपणे होते. त्यादृष्टीने लोकमान्य टिळकांनी लोकशक्ती संघटित करण्यासाठी गणेशोत्सवाकडे पाहिले.
आता तर गणेशोत्सव ही मराठी माणसाची ओळख झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संगीताच्या मैफली आयोजित केल्या जातात. गणेशोत्सव व्याख्यानमाला अनेक शहरांमध्ये दिसतात. गणेशोत्सव ही कलावंतांसाठी पर्वणी असते. अनेक मूर्तिकार तन्मयतेने छान मूर्ती घडवत असतात. गणरायांची आरास करण्यासाठी सर्वदूर तयारी सुरू असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे दिसतात. कलावंत परिश्रमपूर्वक तयारी करत असतात. गणेशोत्सव असतो अवघ्या दहा दिवसांचा, मात्र त्यासाठी जी गणेशोत्सव मंडळे स्थापन होतात, ती वर्षभर काम करत असतात. आपत्तीच्या वेळी हे कार्यकर्ते धावून जातात. अनेक रचनात्मक कामे त्यातून उभी राहतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेत्यांसाठीची कार्यशाळा आहे. गणेशोत्सव मंडळातील अनेक कार्यकर्ते पुढे राजकारणामध्ये दिसतात. जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात तर गणेशोत्सवाला नवा चेहरा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि परंपरा हे सारे जगभर जाऊन पोहोचले आहे. काळाच्या ओघात गणेशोत्सव बदलला. त्याचे रूप बदलले. हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र, बदललेल्या स्वरूपाचा नीटपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. गणरायांच्या साक्षीने बौद्धिक, वैचारिक, कलात्मक, सांस्कृतिक अशा स्वरूपाचे कार्यक्रम व्हायला हवेत. अवघ्या शहराने-गावाने त्यात सहभागी व्हायला हवे. मात्र, डीजेच्या भिंती उभ्या राहतात. दणदणाट सुरू असतो. ध्वनिप्रदूषण टोक गाठते. प्रदूषित रंगांमुळे पाण्याचे नुकसान होते. वाहतूक कोंडीने जगणेच विस्कळीत होते. पैशांचा नाहक चुराडा होतो. विद्युत रोषणाईच्या अतिरेकाने डोळे दुखावतात. विसर्जन मिरवणुकीने शहरांचे स्वास्थ्य बिघडते. उत्सव असा असेल तर व्यक्तीचे आणि समाजाचेही आरोग्य धोक्यात येते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे उभे करणे चांगलेच, पण हा उत्सवच दिखाऊपणे साजरा होऊ लागला तर त्यातली भक्ती संपून जाईल. थोडे भान बाळगले तर गणेशोत्सवासारखा उत्सव नाही. भक्ती, शक्ती, संस्कृती यांचा असा मिलाफ अन्यत्र कुठेही नाही.
गणरायांचे आगमन आज घराघरांत होते आहे. जिकडे तिकडे लगबग आहे. ‘सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥’ अशा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सर्वत्र होते आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेकविध प्रयोग होत असतात. ‘लोकमत’ने बारा वर्षांपूर्वी ‘ती’चा गणपती सुरू केला. त्यामध्ये कल्पना अशी होती की, आरतीमध्ये ‘ती’ आहे; गणपतीमध्ये ‘ती’ आहे. तर, सार्वजनिक गणेशोत्सवालाही ‘ती’चा चेहरा मिळणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुष समतेसाठीचे एक पाऊल म्हणून ‘ती’चा गणपती ही कल्पना पुढे आली. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षस्थानी महिलाच असते. या प्रयोगाला यश आले. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्याचे अनुकरण केले. गणेशोत्सव मंडळांमध्ये आता महिला पदाधिकारीही दिसू लागल्या आहेत. परिवर्तनाचा श्रीगणेशा करण्यासाठी गणेशोत्सवासारखे औचित्य नाही. गणरायांचे आगमन होत असताना, समता आणि सलोख्याच्या अशा वाटा चोखाळण्याचा संकल्प आपण करूया. गणपती बाप्पा मोरया!