ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी; उपाशीपोटी छळणाऱ्या तरुण स्वप्नांची अस्वस्थ कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:08 IST2025-02-15T07:07:59+5:302025-02-15T07:08:13+5:30
नवनव्या संधी आणि स्वप्ने मुला-मुलींना मोठ्या शहरांकडे ओढून घेतात; मात्र तिथे वाट्याला येणारी उपासमार, अस्वस्थता त्यांना नैराश्याकडे ढकलते आहे!

ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी; उपाशीपोटी छळणाऱ्या तरुण स्वप्नांची अस्वस्थ कहाणी
प्रमोद मुजुमदार, विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
पुण्यात महाराष्ट्राच्या खान्देश, मराठवाडा, विदर्भ आणि अन्य मागास भागातून इयत्ता बारावीनंतर पदवी, पदविका शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ७० ते ७५ हजार इतकी आहे, हे कालच्या पूर्वार्धात पाहिले. यातील ५० ते ६० टक्के विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या वंचित समाजघटकांतील आहेत. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील शिक्षणप्रसारामुळे आधुनिक शिक्षणाचे महत्त्व जाणणारा हा समाजगट आहे. राष्ट्र सेवा दल आणि ‘स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स’तर्फे यातील ६०० विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वेक्षण आणि फूड स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेल्या ५५० विद्यार्थ्यांच्या मुलाखतींमधून या विद्यार्थ्यांच्या बिकट परिस्थितीचे काही पैलू पुढे येतात.
आरोग्य सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थिनींतील ४१ टक्के मुली ॲनिमिक आहेत. तर ५६ टक्के मुलींच्या रक्तातील एक किंवा अधिक घटक अनियमित आढळले; तसेच ७९ टक्के विद्यार्थिनींना मासिक पाळीचा त्रास होतो, ६५ टक्के विद्यार्थ्यांनी इतर शारीरिक तक्रारी नोंदल्या आहेत. सुमारे ५० टक्के मुलींनी छातीत धडधडणे, निराशा येणे, निरुत्साही वाटणे, भावनिक उद्रेक होणे, आत्मविश्वास कमी होणे, अपयशाची भीती वाटणे या तक्रारी नोंदवल्या आहेत.
आरोग्य सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी २३ टक्के विद्यार्थी ॲनेमिक आहेत, तर ३३ टक्के विद्यार्थ्यांच्या रक्तात एक किंवा अधिक घटक अनियमित आढळले. सहभागी विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्के विद्यार्थ्यांनी अन्य शारीरिक आजार किंवा तक्रारी नोंदल्या आहेत. ‘आपल्याला खूप भूक लागते’ (म्हणजे पोटभर खायला मिळत नाही.) अशी तक्रार ४२ टक्के मुलांनी नोंदली आहे. तरुण वयातील मुला-मुलींना भूक लागणे ही अतिशय स्वाभाविक गोष्ट; परंतु अर्धपोटी राहणाऱ्या या मुला-मुलींसाठी भूक लागणे ही शारीरिक तक्रार बनते, ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी होय.
या मुलांच्या अपुऱ्या आहाराबरोबरच समतोल चौरस आहाराचा अभाव हा गंभीर घटक आहे. योग्य आणि पुरेशा आहाराभावी या मुलांचे व्यापक कुपोषण होत आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या या तरुणांच्या बौद्धिक क्षमता कुंठणे, एकाग्रता कमी होणे, आकलन क्षमता कमी होणे हे परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक अपयश हे या मुलांना संपूर्ण जीवनासाठी अपयशी ठरवणार. प्रश्न आहे की, राज्यातील या मोठ्या तरुण गटाला आपण हळूहळू नैराश्याकडे ढकलत आहोत, याचा आपण कसा विचार करणार?
पुण्यासारख्या शहरात नव्या वातावरणात, नव्या संस्कृतीत जुळवून घेणे इंग्रजी माध्यमात टिकणे, तुटपुंज्या निवासी व्यवस्था यामुळे हे मानसिक तणाव वाढतातच. अत्यंत केविलवाण्या परिस्थितीत ही मुले जगतात आणि संघर्ष करतात. या विद्यार्थ्यांना गावाहून येणारी आर्थिक मदत अनियमित असते. शेती उत्पन्न आणि उत्पन्नातील अनियमितता यामुळे घरून पैसे कमी येतात तेव्हा या मुलांवरील ताण वाढतो. आर्थिक चणचण असतेच; परंतु त्याच वेळेस आपल्या कुटुंबात काय स्थिती असेल; या विचाराने ही मुले अधिक अस्वस्थ असतात. या मुला-मुलींना आपल्या परिस्थितीचे पूर्ण भान असते. त्यामुळेच भावनिक दडपण आणि ताण वाढत असतो.
हे सर्वेक्षण आणि त्याचे निष्कर्ष अत्यंत मर्यादित सॅम्पल साइजवर आधारित आहे, हे मान्य केले तरीही एका मोठ्या वर्गाचे हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. प्रसारमाध्यमांतून शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या नवनव्या संधींची शक्यता या तरुण-तरुणींच्या मनात पेरल्या जात असतात. शिक्षणासाठी सरकारतर्फे सवलतींच्या घोषणा केल्या जातात. यातून उभे राहणारे चित्र या मुला-मुलींना पुण्या-मुंबईसारख्या शहरांकडे ओढून घेतात; मात्र या वास्तवाची भ्रामकता या मुलांना नैराश्याकडे ढकलते.
भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे; मात्र या तरुणांसाठी शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी देण्यासाठी कोणतेही धोरण नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पुणे शहरात येणाऱ्या या स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या अन्न आणि निवारा या मूलभूत गरजाही भागत नाहीत! म्हणजेच किमान मानवी प्रतिष्ठान त्यांना नाकारली जाते. दर्जेदार शिक्षण आणि प्रगती हे तर मृगजळ ठरते. (उत्तरार्ध)
mujumdar.mujumdar@gmail.com