भाडेकरू घरातून निघत नाही.. काय करू?...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:12 IST2025-11-25T10:11:38+5:302025-11-25T10:12:35+5:30
Home Rent News: बऱ्याच जणांच्या बाबतीत हा प्रश्न येतो. यात अनेक गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. घर भाड्यानं दिलं तर तेवढेच काही पैसे हाताशी येतील म्हणून घर भाड्यानं तर दिलं जातं, पण त्याबाबतीत योग्य ती काळजी घेऊन कायदेशीर करार केला जात नाही.

भाडेकरू घरातून निघत नाही.. काय करू?...
भाडेकरू घरातून निघत नाही. त्याला कसे बाहेर काढावे? - विष्णू दातार, भंडारा
बऱ्याच जणांच्या बाबतीत हा प्रश्न येतो. यात अनेक गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. घर भाड्यानं दिलं तर तेवढेच काही पैसे हाताशी येतील म्हणून घर भाड्यानं तर दिलं जातं, पण त्याबाबतीत योग्य ती काळजी घेऊन कायदेशीर करार केला जात नाही. पर्यायाने भविष्यात अडचणी येऊ शकतात. भाडेकरू घराचा ताबा देत नसेल तर अनेक जण अस्वस्थ होतात, घायकुतीला येतात, त्यामुळे बऱ्याचदा चुकीचे, बेकायदेशीर निर्णयही घेतले जातात.
भाडेकरू जर घर खाली करीत नसेल तर भाडे नियंत्रण अधिकृत प्राधिकरणाकडे, न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करावा. ज्यात भाडेकरूचं नाव, पत्ता आणि त्याला काढण्याची कारणं स्पष्टपणे नमूद करावीत.
कोणत्या कारणांनी भाडेकरुला काढता येतं, याची कारणं कायद्यात नमूद आहेत. त्यातील काही कारणं म्हणजे भाडं न देणं, अवैध रीतीनं पोटभाडेकरू टाकणं, मालकाला ती जागा स्वतः वापरण्याची तत्काळ गरज निर्माण होणं, त्या जागेत बांधकाम करायचं असणं... इत्यादी.
भाडेकरुला समन्स पाठवल्यानंतर आणि त्याला तो मिळाल्यानंतर भाडेकरूला ३० दिवसांत ॲफेडेविट द्यावं लागतं. त्यात तो आपलं म्हणणं मांडू शकतो. पुरावे, साक्षीदार, अहवाल इत्यादी तपासले गेल्यानंतर घरमालकाचं म्हणणं योग्य असेल तर ‘कब्जा - वसुलीचा आदेश’ जारी केला जाऊ शकतो. तरीही भाडेकरू आदेश पाळत नसेल तर अधिकृत अधिकारी भाडेकरूला बलप्रयोगानं काढू शकतात.
कुलूप तोडणं, धमकी देणं, भाडेकरुचं सामान बाहेर फेकणं अशा कृती घरमालकांनी करू नयेत. असं करणं कायद्यानं गुन्हा ठरू शकतं. तोंडी किंवा मौखिक भाडेकरारापेक्षा कराराची नोंदणी करणं, त्याचं रजिस्ट्रेशन करणं केव्हाही हिताचं. यासंदर्भात वकिलाचा सल्ला अवश्य घ्यावा.