तेंदूपत्ता मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:29 IST2025-05-20T11:28:04+5:302025-05-20T11:29:05+5:30
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल का? वाघ असतो, अस्वल असतं आणि त्यांच्या रूपाने दबा धरून बसलेला मृत्यू!

तेंदूपत्ता मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट
राजेश शेगोकार, वृत्तसंपादक लोकमत, नागपूर -
पूर्व विदर्भातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला की, निसर्गाच्या कुशीत राेजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता हे केवळ पान नाही, तर आदिवासींसाठी तो घराचा तांदूळ, औषधांचा खर्च, मुलांच्या भविष्यासाठी एक आशेचा किरण आहे. पण, या आशेच्या अन् राेजगाराच्या पानांवर आता वाघाच्या पंजाचे आणि अस्वलासह इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्याचे रक्तरंजित ठसे उमटू लागले आहेत. चंद्रपूरमध्ये एकाच वेळी तीन महिलांच्या नरडीचा घाेट घेणाऱ्या वाघाने या हंगामात आतापर्यंत आठ बळी घेतले. हे केवळ आकडे नाहीत, तर दररोज जिवाची बाजी लावून उपजीविकेसाठी जंगलात उतरलेल्या मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षातील मृत्यूची ही रेषा दिवसेंदिवस अधिक गडद हाेत असल्याने हे संकट उभे ठाकले आहे.
तेंदूपाने संकलन हा हमखास हंगामी रोजगार आहे. मे महिनाभराच्या कालावधीत पूर्व विदर्भात लाखभर अधिक लोकांना यातून रोजगार मिळतो. तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना ७० पानांच्या शंभर पुड्यांमागे ८०० ते ९०० रुपये मजुरी मिळते. एक कुटुंब ५० ते ६० हजार रुपये कमाई करते. तेंदूपाने संकलन हे दोन पद्धतीने केले जाते. पेसा (२००६) कायद्यान्वये ग्रामसभांना तेंदूपाने संकलन, लिलाव व विक्रीचा अधिकार आहे. बिगर पेसा क्षेत्रातील गावांमध्ये वनविभागाच्या देखरेखीखाली वनसमित्यांच्या मदतीने संकलन होते. २०२५ या वर्षासाठी वनक्षेत्रातून प्रतिगोणी ४ हजार २५० रुपये तर खासगी क्षेत्रातून ४ हजार ३०० रुपये प्रतिगोणी दर शासनाने जाहीर केला आहे. या आधारभूत किमतीच्या कमी दराने ठेकेदारांना तेंदूपाने विकत घेता येत नाहीत. यंदा प्रतिगोणी दरात ८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, या दराबाबत शासनाचे धोरण निश्चित नाही, मजुरांचा विमाही काढला जात नाही. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात टाकून मजूर जंगलात वन्यप्राण्यांच्या दहशतीत तेंदूपाने संकलित करीत असतात.
दक्षिणेकडील राज्यांत या पानांचा विड्या बनविण्यासाठी वापर केला जातो. राज्यातील ३५ टक्के तेंदू एकट्या गडचिरोलीच्या जंगलातून बाजारात जातो. मात्र, तेंदूपत्ता मिळणाऱ्या काेणत्याही जिल्ह्यात तेंदूपानांवर आधारित कुटीरोद्योग किंवा प्रक्रिया उद्योग नाही. मजुरांना शाश्वत मजुरीचे धोरणही नाही. त्यामुळे तेंदूमजुरांच्या नशिबी परवड कायम आहे. दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने साधारणत: दोन महिने चालणारा तेंदूपत्ता हंगाम यंदा लवकरच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी वाघाने १८ बळी घेतले असून, गेल्या तीन वर्षांत तेंदू हंगामातील बळींची संख्या २१ आहे. पूर्व विदर्भात वाघ व मानव संघर्ष आता ऐरणीवर आला आहे. वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आहेत आणि मानव पोटासाठी त्या अधिवासात शिरतो आहे. हाच संघर्षाचा धागा आहे. वाघांची संख्या वाढत असताना, संरक्षित जागा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे मानवाचे जीवन धाेक्यात आले आहे.
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली व्यक्ती संध्याकाळी घरी परत येईल का, याची खात्री कुटुंबाला नसते. वाघ असतो, अस्वल असतं आणि सगळ्यात भयंकर असताे ताे म्हणजे दबा धरून बसलेला मृत्यू. तेंदूपत्ता संकलन थांबवणं शक्य नाही; पण, ते सुरक्षित करणं शक्य आहे. प्रश्न एवढाच की शासन, समाज आणि वनविभाग किती तत्पर आहे? जंगलात गेलेले मजूर परत आले पाहिजेत, त्यांच्या हातात तेंदूपत्त्यांची गाठोडी असावीत. या गाठोड्यांमध्ये ‘पानं’ असावीत; त्या गाठोड्यांतून मजुरांचे कलेवरच घरी येऊ नये.
rajesh.shegokar@lokmat.com