‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:50 AM2023-12-06T05:50:23+5:302023-12-06T05:51:10+5:30

तीन राज्यांतील विजयामुळे पुढील लोकसभा निवडणूकही आपलीच, असे वातावरण भाजपमध्ये दिसते आहे, पण हा सरसकट निष्कर्ष बरोबर आहे का?

The myth of the 'hat-trick' and the truth of statistics; What is the need to rely on the result of assembly elections for Lok Sabha? | ‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा

‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा

योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया,
सदस्य, जय किसान आंदोलन

पंतप्रधान म्हणाले, हॅट्ट्रिक मग बाकी सगळे जण म्हणाले हॅट्ट्रिक. सकाळ होता होता देशभर असा संदेश गेला की तीन राज्यांतील विजयानंतर आता भाजपला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. भाजपचे समर्थक आत्तापासूनच विजयोन्माद दाखवत आहेत. विरोधीपक्ष तोंड पाडून बसलेत. कोणालाही हे विचारण्याची फुरसत नाही की असा निष्कर्ष काढणे बरोबर आहे का? 
मनोवैज्ञानिक खेळ अशाच प्रकारे खेळले आणि जिंकले जातात. एका छोट्याशा सत्याचा इतका मोठा फुगा फुगवा की त्यात सर्व प्रकारचे विरोधाभास झाकले जातील. लढाई सुरू होण्याच्या आधीच विरोधकांची उमेद ढासळेल. सामन्यात वॉक ओव्हर मिळून जाईल. म्हणून शांत डोक्याने आपण या दाव्याची छाननी करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम निवडणूक आयोगाची वेबसाइट उघडा. चार राज्यांत सर्व पक्षांना मिळालेली एकूण मते किती ते पहा. विजयाचा शंखनाद करणाऱ्या भाजपला एकूण ४,८१,३३,४६३ मते मिळाली आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाला ४,९०,७७,९०७ मते पडली. याचा अर्थ भाजपच्या तुलनेत काँग्रेसला एकूण सुमारे साडेनऊ लाख मते जादा मिळाली आहेत. असे असूनही चहूदिशांना चर्चा अशी की भाजपने काँग्रेसला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे.

तीनही राज्यांतील जागांची संख्या पाहिली तर सगळीकडे भाजपच भाजप दिसतो. परंतु मतांमध्ये फार मोठे अंतर नाही. राजस्थानात भाजपला ४१.७ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला ३९.६ टक्के मते पडली. म्हणजे फरक फक्त दोन टक्क्यांचा आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये हे अंतर चार टक्के आहे. भाजपला ४६.३ टक्के मते मिळाली तर काँग्रेसला ४२.२ टक्के. केवळ मध्य प्रदेशमध्ये हे अंतर आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भाजपला ४८.६ टक्के, तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळाली. तीनही राज्यांत हरूनसुद्धा काँग्रेसजवळ ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते आहेत.

तेथून पुन्हा मैदानात उतरणे फार कठीण नाही. तीन हिंदी भाषिक राज्यात भाजपला एकूण जितकी जास्त मते मिळाली त्याची भरपाई फक्त एका तेलंगणाने होऊन जाते. तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाला ३९.४ टक्के (९२ लाखांपेक्षा जास्त) मते मिळाली; भाजपला १३.९ टक्के, (३२ लाखांपेक्षाही कमी) मते मिळाली. ज्या राज्यात २०१८ नंतर काँग्रेस निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकले जाण्याच्या स्थितीत होते तेथे त्याचे शीर्षस्थानी पोहोचणे राजकीय उभारी आणि विजिगिषू वृत्तीचा संकेत आहे. दुसरे पाऊल म्हणजे हॅट्ट्रिकवाल्या मिथकाची छाननी करण्यासाठी जरा इतिहासाची समीक्षा करा. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीनंतर काही महिन्यातच लोकसभेची निवडणूक गेल्या दोन दशकांपासून होत आली आहे. मागच्या वेळी २०१८ मध्ये भाजप या तिन्ही राज्यांत हरला होता. परंतु तेव्हा पंतप्रधान किंवा माध्यमांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची हार निश्चित झाल्याचा दावा केला नव्हता.

जेव्हा संसदीय निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने ही तिन्ही राज्ये आणि बाकी हिंदी पट्ट्यात जबरदस्त विजय मिळवला. तिकडे २००३ मध्ये जेव्हा काँग्रेस या तीनही राज्यांमध्ये पराभूत झाली होती. त्याच्यानंतर काही महिन्यांतच २००४च्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते. सांगायचा मुद्दा हा की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे गणित भिन्न असते आणि सरळ सरळ विधानसभेवरून लोकसभेच्या बाबतीत निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. जर भाजप हा निकाल बदलू शकतो तर काँग्रेस का नाही? 

तिसरे म्हणजे २०२४ मध्ये सत्ता परिवर्तनाची समीकरणे पहा. भाजप हिंदी पट्ट्यातील या तीन राज्यांवर निर्भर आहे. परंतु विरोधी पक्षांची उमेद त्यांच्या आधारे टिकलेली नाही. इंडिया आघाडीचे निवडणूक गणित कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल या राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी करण्यावर उभे आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील ६५ जागांपैकी भाजपच्या खात्यात ६१ जागा आधीपासूनच आहेत. आणि कॉंग्रेसकडे फक्त तीन जागा. याचा अर्थ भाजपपुढे हे आव्हान आहे की तो पक्ष या सगळ्या जागा पुन्हा मिळवील आणि शक्य झाले तर तेलंगणामध्ये ज्या चार जागा जिंकल्या होत्या त्यातही वाढ करील. दुसऱ्या बाजूला कॉँग्रेसचा विचार करता त्या पक्षाकडे या राज्यात गमावण्यासारखे काही नाही. मुद्दा असा की या विधानसभा निवडणुकात भाजपला काहीही नवे हाती लागलेले नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसला २३च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली तितकीच मते मिळाली तर आकडेवारी पुढीलप्रमाणे असेल. राजस्थान-भाजप १४, काँग्रेस ११, छत्तीसगड-भाजप आठ, काँग्रेस तीन, मध्य प्रदेश-भाजप २५ आणि कॉंग्रेस ४, तेलंगणात काँग्रेस नऊ, भाजप शून्य, बीआरएस सात आणि एमआयएम एक. मिझोराम-जेएमपी एक जागा. एकूण विधानसभा निवडणुकीच्या हिशेबानुसार भाजपला ८३ पैकी ४६ जागा आणि कॉंग्रेसला २८ जागा मिळू शकतात. याचा अर्थ फायदा होण्याऐवजी विधानसभा निकालाच्या हिशेबाने भाजपचे जागांचे नुकसान होऊ शकते, तर कॉंग्रेसला २२ जागांचा फायदा मिळू शकतो.

आता काँग्रेसला फक्त एवढेच पाहायचे आहे की जी मते पक्षाला विधानसभेत मिळाली तेवढी मते लोकसभा निवडणुकीतही मिळाली पाहिजेत. आता कोणी म्हणेल की हे तर अगदी साधे सरळ गणित आहे. आपण मोदी मॅजिकचा हिशेब नाही केला. मोदी जादू चालली तर या सर्व राज्यांत भगवा फडकेल आणि काँग्रेसचा सुपडा साफ होऊन जाईल. परंतु जर ‘मोदी है तो कुछ भी मुमकिन है’ तर त्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच हॅट्ट्रिकची भाषा करण्याची काय गरज आहे? जादूवर विश्वास आहे तर तशी श्रद्धा बाळगा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेण्याची काय गरज?

Web Title: The myth of the 'hat-trick' and the truth of statistics; What is the need to rely on the result of assembly elections for Lok Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.