लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

By नंदकिशोर पाटील | Published: October 17, 2023 04:26 PM2023-10-17T16:26:28+5:302023-10-17T16:26:46+5:30

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल.

The 'India' alliance will have to think so that the Congress does not remain 'disadvantaged' in the Lok Sabha | लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणात ऐन दिवाळीत फटाके फुटणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल असेल. सध्या क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळ आले आहे. राजकीय पक्षांनी आपापली टीम बांधायला सुरुवात केली आहे. समोर भाजप सारखा तगडा प्रतिस्पर्धी आहे. भाजपने सलग दोन वेळा ‘लोकसभा चषक’ जिंकला आहे. यावेळीही ते प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखे शतकी ‘ओपनर’ आहेत. एकहाती सामना जिंकण्याची त्यांची क्षमता आजवर सिद्ध झालेली आहे. शिवाय, ऐनवेळी कमकुवत खेळाडू बदलण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मग तो कोणी-कितीही मोठा असला तरी! याउलट काँग्रेससह इतर पक्षांना खेळाडू शोधण्यापासून तयारी करावी लागते. अनेकदा तर ऐनवेळी त्यांचेच खेळाडू टीम बदलून प्रतिस्पर्धी संघाकडून मैदानात उतरतात! निवडणूक जवळ आली की, अशा दलबदलू खेळाडूंना चांगला ‘भाव’ मिळतो. ‘आयपीएल’सारखी बोली लागत नाही इतकेच. भविष्यात तेही होऊ शकते.

यावेळची लोकसभा निवडणूक वेगळी असेल. त्याची रंगीत तालीम पाच राज्यांच्या निवडणुकीत होईल. या निवडणुकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. कारण या पाच राज्यांत लोकसभेच्या ६३ जागा आहेत. शिवाय, या निवडणुकीपाठोपाठ लोकसभा असल्याने तो टेम्पो देशभर कायम राहू शकतो. तसे पाहिले तर रात्र थोडी आणि सोंगे फार, अशी राजकीय पक्षांची गत झाली आहे. भाजप बारमाही निवडणूक मूडमध्ये असतो. प्रश्न इतर पक्षांचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी उभी राहिली आहे. या आघाडीतील सामील पक्षांची संख्या आणि नावे पाहिली तर आजघडीला कागदावर तरी ही आघाडी मजबूत दिसते. भाजप प्रणित एनडीएच्या घटक पक्षांची संख्या कमी होत आहे. अण्णा द्रमुक, तेलगु देसम, शिरोमणी अकाली दल यासारखे एकेकाळचे जुने सहकारी भाजपला सोडून जात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव अलीकडच्या काळात एनडीएत सहभागी झालेला नवा पक्ष आहे.

दक्षिण भारतातील एकही राज्य भाजपच्या ताब्यात नाही. उत्तरेतील मध्यप्रदेश हे राज्य देखील हातून जाण्याची शक्यता आहे. ओपिनियन पोलचे अंदाज तेच सांगतात. राजस्थानची आशा आहे. पण तिथे काहीही घडू शकते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट भाजपवर नाराज असल्याचे सांगतात. छत्तीसगडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला अनुकूल वातावरण आहे. विरोधकांनी एकजुटीने एकास एक उमेदवार दिला तर सामना चुरशीचा होऊ शकतो. पण राज्या-राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.

महाराष्ट्राचेच उदाहरण घेऊ. एका बाजुला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे संघ आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या दोन्ही संघात नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचितची आघाडी झाली आहे. पण वंचित ‘इंडिया’ आघाडीत नाही! असे हे त्रांगडे आहे. ‘वंचित’ला कमी लेखून चालत नाही. गेल्यावेळी याच वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादीची वाट लावली होती.गेल्या लोकसभेत मराठवाड्यातील नांदेडच्या जागेवर वंचितमुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर मतदारसंघात होती. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. वंचित सोबत असेल तर मराठवाड्यातील लोकसभेच्या किमान चार ते पाच जागा विरोधकांच्या आघाडीला मिळू शकतात.

Web Title: The 'India' alliance will have to think so that the Congress does not remain 'disadvantaged' in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.