- सचिन जवळकोटेकार्यकारी संपादक, लोकमत कोल्हापूर
गेले चार महिने आपल्यावरील अन्यायाविरोधात कागदावर कागदं रंगवून देखील तिला कोणीच सपोर्ट केला नाही. कदाचित त्यामुळेच तिचा कागदावरचा विश्वास उडाला असावा; म्हणून तिनं थेट आपल्या तळहातावर चार ओळी लिहून जीव सोडला. खरंतर तळहातावरच्या रेषा म्हणे एखाद्याच्या आयुष्याची दिशा दाखवतात; परंतु तिनं इथं फक्त तळहातावरच्या शाईवर विश्वास ठेवला. या शाईनं लिहिले होते फक्त चोवीस शब्द. मात्र, याच शब्दांनी कामाला लावलं आता संपूर्ण यंत्रणेला. हीच ती चोवीस शब्दांची अनटोल्ड डेथ स्टोरी. लगाव बत्ती...
‘डॉक्टर’ म्हणजे जणू जीव वाचवणारा देवदूत. मात्र, याच डॉक्टरवर जीव देण्याची वेळ येते तेव्हा हादरून जातो समाज. ‘फलटण’च्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तीन घटक रडारवर आलेले. पहिली ‘खाकी’. दुसरी ‘खादी’. तिसरा ‘पांढरा कोट’. ती गेले चार महिने बलाढ्य ‘सिस्टीम’विरुद्ध एकटीच लढत होती. तिनं आपल्या वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आणलेल्या. ‘अटकेतील आरोपी आजारी असेल तरीही त्याला फिट दाखवून आमच्या ताब्यात द्या’ असा दबाव आणणाऱ्या पोलिसांची नावंही तिनं या पत्रात लिहिलेली. या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तिनं वेळोवेळी कॉलही केलेला. मात्र, त्या अधिकाऱ्यानं तिचा नंबर चक्क ‘ब्लॉक’ केलेला. रुग्णालयात आणलेल्या आरोपी पेशंटला फिट सर्टिफिकेट द्यायचं की नाही हा अधिकार केवळ ड्युटीवरील डॉक्टरांनाच असावा, ही तिची तळमळीची भावनाही या पत्रातून तीनवेळा दिसलेली. याचा अर्थ स्वतःच्या पेशाबद्दलच्या ‘आत्मसन्माना’लाही तिला ठेच लागल्याचं या पत्रातून स्पष्ट झालेलं. हातावरची सुसाईड नोट तिच्याच अक्षरातील आहे का, याचाही शाेध सुरू. मात्र तिनं पूर्वी केलेल्या तक्रारीच्या लिखाणाची स्टाईल लक्षात आलेली. ती ‘पेशंट, कम्प्लेंट अन् चेक’ असे शब्द थेट इंग्रजीतच लिहायची. हातावरही ‘रेप’ हा शब्द तिनं इंग्लिशमध्येच लिहिलेला. आणखी एक विचित्र घटना म्हणजे ‘ती’ आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर संबंधित पोलिसांनी थेट एका ‘खासदारा’कडं धाव घेतलेली. खरंतर या हवालदारांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी हाेती; परंतु ‘गंगाजल’सारख्या चित्रपटातील समांतर न्याययंत्रणेला शोभेल असा विचित्र प्रकार ‘फलटण’मध्ये घडलेला. पोलिस थेट राजकीय नेत्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलेले. गंमत म्हणजे या ‘खासदारा’नं आपल्या दोन ‘पीएं’च्या फोनवरून तिला जाब विचारलेला, ‘तुम्ही बीडचे असल्यानं आरोपींना फिट देत नाही का?’ आता ‘ऊसतोड कामगार’ असणाऱ्या या आरोपींचा कुठल्या साखर कारखान्याशी संबंध आला होता. हा कारखाना कुठल्या खासदाराचा होता. या सर्व ‘उघड गुपितां’चा शोध घेण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या नातेवाइकांनी मीडियासमोर बोलताना आरोप केला की, ‘पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर फलटणमध्ये दबाव यायचा.’ खरंतर ‘पॉलिटिकल क्राइम’च्या बाबतीत ‘फलटण’ हे नेहमीच चर्चेत राहिलेलं. वादग्रस्त ठरलेलं. पूर्वी इथल्या नेत्यानं भुवई उंचावल्याशिवाय म्हणे ‘डायरी’ला कसलीच नोंद होत नसलेली. नकाे असलेल्या लाेकांविरुद्ध मात्र निरोप गेल्यानंतर म्हणे ‘कलमं’ लागली गेलेली. आता ‘नेतृत्व’ बदलल्यानंतर ‘परिस्थिती’ बदलेल असं सर्वसामान्य भोळ्याभाबड्या जनतेला वाटलेलं. मात्र, ‘परंपरा’ तीच राहिलेली. फक्त ‘आदेशाची दिशा’ बदललेली. लगाव बत्ती..
तिच्या जबाबात तब्बल बारा नावं आलेली; परंतु..‘कुणाला आत टाकायचं.. कुणाला सोडायचं’ हे आधीच ठरवणाऱ्या ‘खाकी’विरोधात तिनं अनेकवेळा तक्रार केेलेली. वेळोवेळी फाॅलोअपही घेतलेला. शेवटी कंटाळून ‘माहितीच्या अधिकारा’खाली ‘डीवायएसपीं’कडे अर्जही केलेला. ‘माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती मिळावी म्हणून..’ पहा.. आजपावतो सरकारी यंत्रणेविरुद्ध सर्वसामान्यांना या अधिकाराचा वापर करावा लागायचा. मात्र, एका सरकारी महिला डॉक्टरलाही नाइलाजानं याचा आधार घ्यावा लागलेला; परंतु, याचाही शेवट काय झाला? बिचाऱ्या अभागिनीचा दुर्दैवी मृत्यू. तिच्या आत्महत्येनं साऱ्यांनाच कामाला लावलेलं. तिच्या जबाबात ‘फलटण-साताऱ्या’शी संबंधित बारा नावांचा उल्लेख आलेला. ‘धुमाळ, केशव, ननावरे अन् निगडे’ या डॉक्टरांची तिनं नावं घेतलेली; तर ‘जायपत्रे, महाडिक, चतुरे, अभंग, मठपती, पाटील अन् बदने’ या पोलिसांचाही संदर्भ आलेला. यातला ‘बदने’ हा एक साधा फौजदार. मात्र, ‘सरकारी रुग्णालयात येऊन तो थेट ड्युटीवरील डॉक्टरच्या खुर्चीत बसतो अन् तिलाच धमकी देतो’ अशी तक्रार करूनही तिला शेवटपर्यंत न्याय काही मिळालाच नसलेला.
तिच्या आत्महत्येमुळे निर्ढावलेली सरकारी यंत्रणा जशी चक्रावलेली, तशीच तटस्थपणे जगणारं समाजमनही हळवं झालेलं. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न आ वासून उभे ठाकलेले. हेच ते पाच प्रश्न. 1️⃣ ती ज्या रूममध्ये राहत होती तिथून बाहेर पडून आत्महत्येसाठी रात्री एक वाजता तिनं हॉटेल का गाठलं? राहती जागा तिला एवढी असुरक्षित का वाटली असावी? 2️⃣ सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलमध्ये असताना जेवणाच्या डब्यासाठी कॉल आला, तेव्हा तिनं ‘सांगते नंतर..’ असं उत्तर दिलं. याचा अर्थ तोपर्यंत आत्महत्या करण्याचं निश्चित नसावं. मग त्यानंतर असं काय घडलं की, तिनं स्वतःच्या स्कार्फनं पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 3️⃣ आरोपी क्रमांक दोनच्या बहिणीनं आपली बाजू मांडत असताना सांगितलं की, ‘डॉक्टर मॅडम अलीकडे सतत टेन्शनमध्ये होत्या. याबाबत त्यांच्या आई-वडिलांनाही याची सूचना दिली होती.’ मग रोज शेकडो रुग्णांचं अचूक निदान करणाऱ्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या एका सहायक डॉक्टरची अस्वस्थता ओळखता आली नव्हती काय? 4️⃣ जेव्हा पोलिसांनी या डॉक्टरविरुद्ध तक्रार केली, तेव्हा तिच्या चौकशीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं चौकशी समिती नेमली होती. तेव्हा तिनं या समितीसमोर कळवळून सांगितलेल्या जुन्या घटनांची शहानिशा केली गेली काय? असेल तर तिला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं वागवणाऱ्या ‘सिस्टीम’बद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती भूमिका घेतली? 5️⃣ तिच्याविरुद्ध तक्रार करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी ‘पुरुष’ होते. ती मात्र आपल्या महिला वरिष्ठांचा दाखला जबाबातून देत आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहिली. अशावेळी केवळ ‘डॉक्टर’ म्हणून नव्हे, तर ‘स्त्री सहकारी’ म्हणून वरिष्ठांनी तिला किती सपोर्ट केला?
Web Summary : A Falton doctor's suicide note reveals police harassment and systemic pressure. Her complaints against officials were ignored, leading to despair. The case exposes corruption, political interference, and raises questions about support for female professionals facing injustice.
Web Summary : फलटण की एक डॉक्टर के सुसाइड नोट से पुलिस उत्पीड़न और व्यवस्थागत दबाव का पता चलता है। अधिकारियों के खिलाफ उसकी शिकायतों को नजरअंदाज किया गया, जिससे वह निराशा में डूब गई। मामला भ्रष्टाचार, राजनीतिक हस्तक्षेप को उजागर करता है, और अन्याय का सामना करने वाली महिला पेशेवरों के लिए समर्थन के बारे में सवाल उठाता है।