खतरनाक ‘द रॉक’ तुरुंग पुन्हा सुरू होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:01 IST2025-05-17T07:01:02+5:302025-05-17T07:01:33+5:30

अल्काट्राझ तुरुंग. अमेरिकेतला सर्वांत खतरनाक तुरुंग म्हणून या तुरुंगाची ख्याती.

the dangerous the rock prison will reopen | खतरनाक ‘द रॉक’ तुरुंग पुन्हा सुरू होणार!

खतरनाक ‘द रॉक’ तुरुंग पुन्हा सुरू होणार!

अल्काट्राझ तुरुंग. अमेरिकेतला सर्वांत खतरनाक तुरुंग म्हणून या तुरुंगाची ख्याती. या तुरुंगातले कैदीही तसेच गिनेचुने होते आणि अतिशय गंभीर गुन्ह्यांखाली त्यांना अटक केल्यानंतर या तुरुंगात त्यांची रवानगी केली जायची.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या किनाऱ्यापासून साधारण एक मैल अंतरावरील बेटावर हा तुरुंग आहे. या तुरुंगातून कोणताही कैदी पळून जाऊ शकत नाही, अशी या तुरुंगाची ख्याती होती, त्यामुळे त्याला ‘द रॉक’ असंही म्हटलं जात होतं. अमेरिकेतील सर्वांत खतरनाक कैदी या तुरुंगात ठेवले जात. 

इथली सुरक्षा व्यवस्थाही अतिशय कडेकोट होती. या तुरुंगात कैदी आला म्हणजे आपली आता खैर नाही, याची त्या कैद्यांनाही खात्री असायची. या तुरुंगातील कैद्यांना एकमेकांशी बाेलण्याची परवानगी नव्हती. अनेक कैद्यांना अनेक महिने, तेही एकट्यानं अंधाऱ्या खोलीत कैद करून ठेवलं जायचं. त्यामुळे या तुरुंगातील बहुतांश कैदी नैराश्य आणि मानसिक व्याधींनी त्रस्त होते. सुटकेचा कोणताच मार्ग नसल्यानं आणि मानसिक व्याधींनी जर्जर झाल्यामुळे या तुरुंगातील अनेक कैद्यांनी आत्महत्या केल्याचाही इतिहास आहे. १९३४ ते १९६३ या काळात या तुरुंगाची कैद्यांना आणि गुंड-पुंडांना अक्षरश: दहशत होती. पण हा तुरुंग चालवण्यासाठी येत असलेला प्रचंड खर्च आणि देखभालीच्या कारणास्तव २१ मार्च १९६३ रोजी हा तुरुंग बंद करण्यात आला. तेव्हापासून हा तुरुंग बंदच आहे. पण हा तुरुंग आता पुन्हा सुरू करण्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. 

अल्काट्राझ तुरुंग पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेतील राजकीय, गुन्हेगारी वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्येही नवी चर्चा सुरू झाली आहे. याच तुरुंगाच्या संदर्भात त्यावेळचा एक किस्साही आता पुन्हा चर्चेत आला आहे. 

या तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न आजवर कोणी केलाच नाही, असं नाही, पण ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला, ते एकतर पकडले गेले किंवा पळताना मारले गेले.  ११ जून १९६२चा किस्सा मात्र याला काहीसा अपवाद ठरावा. फ्रँक मॉरिस, जॉन एंगलिन आणि क्लेरेन्स एंगलिन हे तिघे गुन्हेगार मात्र या तुरुंगातून पळण्यात यशस्वी ठरले होते. त्यांच्या पलायनाचा किस्साही हृदयाचे ठोके चुकवणारा आहे. कारण केवळ काही चमचे आणि ड्रिलच्या सहाय्यानं त्यांनी तुरुंगात भुयार खणून पलायन केलं.

ही कहाणी सुरू झाली १९६०मध्ये. फ्रँक मॉरिसला या तुरुंगात आणल्यानंतर त्यानं जॉन एंगलिन, क्लेरेन्स एंगलिन आणि ॲलन वेस्ट या तेथील कैद्यांशी दोस्ती केली. चौघांनी मिळून या तुरुंगातून कसं पळता येईल याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला. त्यांच्या लक्षात आलं, तुरुंगातल्या खोलीत व्हेंटिलेशनसाठी असलेल्या जाळीपर्यंत पोहोचता आलं तर तिथून सटकता येऊ शकेल. त्यासाठी त्यांनी काही महिने चमचांच्या सहाय्यानं खोदकाम केलं, भुयाराच्या बाहेर येऊन व्हेंटिलेशनच्या जाळीपर्यंत पोहोचले आणि तिथून पाइपच्या सहाय्यानं खाली उतरले. काही रेनकोट जोडून त्याचा त्यांनी नावेसारखा वापर करून समुद्र ओलांडायचा प्रयत्न केला. भुयार खोदून ते बाहेर पडले खरे, पण समुद्र ते पार करू शकले की नाहीत हे आजही गूढ आहे. कारण त्यानंतर त्यांची ना काही खबर मिळाली, ना त्यांचे मृतदेह सापडले!

Web Title: the dangerous the rock prison will reopen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.